॥ हरि ॐ ॥
गुरुक्षेत्रम मन्त्र आपण बघतोय जो अंकुरमन्त्र आहे. त्याच पद आहे ॐ श्रीरामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:। ह्या पदात निरनिराळी पदं, चिन्ह, संकेत आपण बघतोय आणि त्यातून ही रामवरदायिनी कशी कार्य करते ते आपण बघितलं.
आपण निसर्गाकडे बघितलं तर कुठला संकेत, चिन्ह आहेत का? आपण वस्तूवर बघतो made in japan, made in china देवाने असे केलंय का? परमेश्वराने कधी गहू, तांदूळ, फळं, फुलांवर छाप मारली आहे का? परमेश्वर लोकांना कळला कसा? माणसाला देवाचं अस्तित्व समजलं कसं? परमेश्वर माणसाला समजला कसा? माकडाचा जेव्हा माणूस झाला तो वेगवेगळ्या ठिकाणी झाला असेल ना, मग प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी देव भेटला का? नक्की अशी वेळ कुठली की ज्यावेळी देव भेटला? मग त्याचा कुठे record कसा नाही? हे प्रश्न उद्भवले नाहीत तर आपण समजू शकणार नाही. आपल्याला difficulties येतात त्याच मुळी अधिक ज्ञान मिळविण्यासाठी. प्रश्न उद्भवले पाहिजेत. शाळेत पुस्तकात आम्ही उत्क्रांतिवाद वाचला होता त्यावरून कळतं माकडाचा माणूस कसा झाला इतकंच.
आम्ही म्हणतो ‘आम्ही देवाला मानतो’ ‘आम्ही गुरु केला’ अरे देवाला मानणारे तुम्ही कोण? म्हणजे देवाला तुमच्या मान्यतेची गरज आहे? तुमच्या मानण्या न मानण्याने काही होणार नाही. तो देव आहे. मग आम्ही असं म्हटलं तर पाप लागेल का? नाही. गोष्ट simple आहे. ‘देव आम्हाला मानतो’, ‘देव आमचं करतो’ असं म्हणायचं. कोणी तुमचं आयुष्यभर केलं नसेल, इतकं देव तुमचं करतो. ‘आम्ही देवाचं करतो’ हा शद्ब पुसून टाका.
शिवलीलामृतमधली आपण गोष्ट बघतो, तो पारधी नुसती बेलाची पानं तोडून शिवलिंगावर टाकत असतो त्याच्यानेसुद्धा शिव प्रसन्न होतो. बापू तुम्ही सांगता ‘भाव तोचि देव’ मग इथे मनात भाव नसला तरी देव पावतो. मग बापू ही कथा खोटी, देव खोटा की हा बापू खोटा?
हा देव म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. वेद आपल्याला सुस्पष्टपणे सांगतात परमेश्वराची जाणीव, त्याच्या आहेपणाची जाणीव, त्याच्या अस्तित्वाची जाणीव मनुष्याला कशी झाली?
तो परमेश्वर निर्गुण निराकार स्वरूपात असतो तेव्हा त्याच्यात ती आदिमाता ‘अदिति’ स्वरूपात अस्पंद अवस्थेत असते. प्रथम स्पंद स्वरूपात प्रकटली ती गायत्री स्वरूपात. गायत्री म्हणजे परमेश्वराची ‘मी परमेश्वर आहे’ ही जाणीव म्हणजेच ती जगदम्बा, पराम्बा, ब्रह्मत्रिपुरसुंदरी. ह्या आदिमातेने तीन पुत्र उत्पन्न केलेत सृष्टी निर्माण करण्यासाठी - दत्तात्रेय, किरातरुद्र आणि परमात्मा.
जाणीव हीच गोष्ट माणसाच्या सर्व पातळीवर काम करत असते. परीक्षेला जाण्यासाठी १०.०० वाजता घरातून निघतो कारण ११.०० वाजता तिकडे पोहचायचं आहे ही जाणीव असते. भूक लागते म्हणजे भुकेची जाणीव आहे. प्रत्येक कार्य जाणीवेतून घडतं, अजाणतेपणाने अपघात घडतो. चालताना सापावर चुकून पाय दिला तर तो चावणार. नुकतंच जन्माला आलेल्या बाळालासुद्धा आई छातीशी धरत नाही तोपर्यंत ते बाळ शांत होत नाही कारण त्याला आईच्या गर्भात आईच्या हृदयाच्या स्पंदनाची जाणीव झालेली असते.
जन्म आणि मृत्यूपर्यंत एकच गोष्ट समान असते ती म्हणजे जाणीव. शरीर बदलतं, अवयव बदलतात, मनातल्या गोष्टी बदलतात, status बदलतं, वृत्ती बदलते पण जाणीव समानपणे असते. प्रत्येक प्राण्यांमध्येही जाणीव असते. अमिबा एकपेशीय प्राणी आहे. त्याला अवयव नाही, नाक, कान नाहीत, त्याला वास घेता येत नाही तरीही पाण्यात जास्त शेवाळ आलं की अमिबा त्यापासून दूर जातो, त्याला कळतं ते पाणी चांगलं नाही. माझ्यासाठी चांगलं काय वाईट काय? ह्याची निवड जाणीव करून देते. अमिबासारखा एकपेशीय प्राणी वाईट गोष्ट घेत नाही, पण मनुष्य सगळे हानिकारक पदार्थ घेत राहतो.
बापू सांगतात रोज एक तास चाला, कोण चालतं? शताक्षी गोळी, सकाळी उठल्यावर गुळण्या करणं, पाणी पिणं ह्यापैकी आम्ही काय करतो? किती गोष्टी आम्ही पाळतो? आमची जाणीव ह्या अमिबापेक्षाही खालच्या दर्जाची आहे. मनुष्याजवळ बुद्धी असते, तरीही आमच्यामधली जाणीव चांगलं-वाईट ओळखण्यासाठी आम्हाला मदत करत नाही. आम्ही चांगल्या जाणीवा धुडकावून लावतो, कारण मनुष्याजवळ बुद्धी आहे. मनुष्य स्वत:ची बुद्धी वापरतो. जे प्यायचं नाही ते पितो, जे डॉक्टरने खाऊ नकोस म्हणून सांगितलेलं असतं तेच खातो.
बुद्धी देवाने आंम्हाला आमची जाणीव अधिक बलवान करण्यासाठी दिलेली असते, रस्त्यात डोंगर लागला तर त्यामधून वाट काढण्यासाठी दिलेली असते. मनुष्य आणि प्राण्यांत एक गोष्ट अजिबात समान नाही. ती कोणती? मनुष्य बुद्धीचा वापर ज्या गोष्टीसाठी करतो ती गोष्ट प्राण्यांमध्ये नाही. हा एक गुणधर्म कुठल्याही प्राण्यांमध्ये नाही फक्त माणसांमध्येच आहे. तो गुणधर्म म्हणजे ‘असत्य’ ही गोष्ट कुठल्याही प्राण्यांमध्ये नाही. प्राणी असत्य बोलू शकत नाहीत आणि ते जे काय वागतात ते त्यांच्या स्वभावगुणधर्मानुसार वागतात त्यांना बुद्धी नसते त्यामुळे ते खोटं वागत नाहीत. माणूस असत्य बोलत असतो आणि वागतही असतो. असत्य ही गोष्ट कुठल्याही प्राण्याकडे नाही. असत्य बुद्धीशिवाय तयार होऊ शकत नाही. ही गोष्ट मनुष्य स्वत:च्या बुद्धीने तयार करतो. ज्याप्रमाणात मनुष्य असत्याने वागतो, बोलतो त्याप्रमाणात त्याच्या जाणीवा बोथट होतात. सत्य आणि वास्तव ह्यात फरक आहे. मी नेहमी तुम्हाला जी गोष्ट सांगतो तीच पुन्हा सांगतो. एक मुलगी धावत येऊन तुमच्याकडे मदत मागत असेल. तिच्यामागे गुंड लागलेले असतील. तुम्ही तिला लपायला जागा दिली. पण त्या गुंडांना तुम्ही सत्य म्हणून ती मुलगी इथेच लपली आहे हे सांगितलंत तर ते ‘असत्य’ ठरेल. त्यामुळे त्या मुलीचे पावित्र्य सुरक्षित राहणार नाही. Truth आणि Fact मध्ये फरक आहे. ‘सत्य’ म्हणजे असं वास्तव ज्यातून फक्त पावित्र्य तयार होतं. ‘असत्य’ म्हणजे अपवित्रता व दु:ख निर्माण करते ती गोष्ट. ज्याप्रमाणात अशा असत्यासाठी बुद्धीचा वापर मनुष्य करतो त्याप्रमाणात त्याच्या जाणीवा अशुद्ध, क्षीण व्हायला लागतात. त्यामुळे डोळे असूनसुद्धा समोरचं संकट दिसत नाही. देवाने मारलेली हाकही ऐकू येत नाही. देवाची हाक तुम्हाला सावध करण्यासाठी. ज्या खोटं बोलण्याने दुसर्यावर अन्याय होतो, ज्यामुळे तुम्ही अपवित्र बनता ते ‘असत्य’ आहे. हे असत्य ज्याप्रमाणात बोलतो, वागतो त्याप्रमाणात जाणीवा अशुद्ध, क्षीण होतात. त्याप्रमाणात परमात्म्याच्या सहाय्याचा response आम्हांला मिळू शकत नाही. परमात्मा तुम्हाला हाक मारतो ते तुम्हाला सावध करण्यासाठी, संकटातून वाचविण्यासाठी. माझ्याकडून माझ्या खोट्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे, कोणावर अन्याय होणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. इतके लोक खोटं वागतात ते त्यांना वागू दे. समजा तुम्हाला ताप आला आहे आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ताप नाही आला, तर तुम्ही तुमच्या तापावर औषध घ्या. बाकीच्यांना ताप का आला नाही? असं ओरडत बसलात तर तुमचा ताप कमी होण्याऐवाजी आणखी वाढेल. प्रत्येक जीवाचा मार्ग वेगळा आहे. असत्य मनुष्याचा घात करतं. देवाने मनुष्याच्या विकासासाठी जाणीव दिली आहे. असत्य वागताना आपण स्वत:चा अधिकाधिक घात करतो.
मनुष्याने भौतिक प्रवासात आजूबाजूला बघितल्यावर त्याला निसर्गाचं सौंदर्य दिसलं. त्या सौंदर्याने तो सुखी झाला. त्याला फळं, फूलं दिसली. फळं त्याने चोरली त्यामुळे त्याला दु:ख झालं. ह्या सुखदु:खाच्या चक्रात त्याने निसर्गाचं चक्र अनुभवलं. त्याची स्मृती तयार झाली. उन्हाळा गेला की पावसाळा येतो, पावसाळा येण्यासाठी उन्हाळा येणं आवश्यक असतं हे त्याला समजलं. निसर्गाचा ऊन-पावासाचा खेळ बघितल्यावर त्याला जाणीव झाली की हे सगळं एकमेकांशी संबंधित आहे. आणि मग तो आपल नातं निसर्गाशी जोडू लागला. अशा रितीने पुढे जात असताना त्याच्या जाणीवा वाढत गेल्या. त्याला कळायला लागलं की, शेतात साप असणं गरजेचं आहे कारण उंदीर, घुशी येऊन शेत खातात त्यांना हे साप खातात. त्याला हेही माहीत होतं की साप मनुष्याला चावला की मनुष्य मरतो. त्याला जाणीव झाली की हे सगळं आपोआप घडत नाही. हे कुठल्यातरी गरिमाने connect केलं पाहिजे. त्याने नदीचे पूर बघितले, तेव्हा त्याला कळलं की आपण निसर्गावर मात करू शकत नाही, निसर्गाला जिंकू शकत नाही. ह्या निसर्गावर कुणाचीतरी सत्ता आहे. ही सत्ता सगळं सुरळीत चालवत आहे. सत्ता definately आहे जी फुलामध्ये काम करते तीच बेडकामध्ये तीच माणसामध्ये. मग त्याला रोजच्या जीवनात मदतीची जाणीव झाली. त्याला हात दिसत नव्हता पण सत्तेची जाणीव होऊ लागली होती. परस्परविरोधी गोष्टींवर एकच सत्ता कार्य करते ह्याची त्याला जाणीव व्हायला लागली. हा एकचपणा, त्या सत्तेचा त्याने ओळखला. पूर येऊन गेल्यावर गाळाने जमीन सुपीक झाली. वाईटातून चांगलं घडलं. ही सत्ता निर्गुण आहे. हीच ती परमेश्वराची जाणीव. मनुष्याला परमेश्वराची जाणीव जाणिवेतून झाली. परमेश्वराची ओळख पटणं ही त्या आदिमातेचीच कृपा आहे.
स्वत:चं जीवन सुखी करण्यासाठी मनुष्य कायम झटत असतो. प्रत्येक जीवन सुखी करायचं असतं. मग दु:खी का होतो? जे करायचं नाही तेच करतो. कारण आमच्या जाणीवांची ताकद कमी झालेली असते. परमेश्वराचा हात आम्हाला दिसू शकेल, आम्हाला त्याच्या हाकेला प्रतिसाद देता येईल त्यासाठी आम्हाला जाणीव पक्की करायला हवी. ही जाणिव पक्की करण्यासाठी काय करायला हवं?
आपण मंगलप्रसंगी रांगोळी काढतो त्यात वेगवेगळी शुभचिन्ह असतात - मंगल कलश, स्वस्तिक, गोपद्म, शंख, चक्र, कमळ, त्रिशुळ, श्री, ॐ, कासव. सगळ्यात सोपं चित्र कुठलं? तर - सूर्य आणि चंद्र.
ही शुभचिन्ह काढताना एकाच वेळेस काढतात. नुसता चंद्र किंवा नुसता सूर्य काढत नाहीत. दोन्ही एकत्र असल्यानेच त्याला शुभचिन्ह मानलं जातं. एकटा सूर्य किंवा एकटा चंद्र असेल तर ते शुभचिन्ह मानलं जात नाही.
सूर्य हे अग्नीचं म्हणजे प्राणतत्त्वाचं प्रतीक आहे. तर चंद्र हे शोमाचं म्हणजेच सौम्यतेचं प्रतीक आहे. प्राण हे शरीरात असतात. प्राण गेले की शरीरातला अग्नी निघून जातो. सूर्य प्राणतत्त्वाशी जोडलेला आहे. तो तेज:पुंज, प्रखर आहे. चंद्र सूर्याकडून प्रकाश घेतो पण तो सौम्य आहे. चंद्र पंधरा दिवस वाढतो आणि कमी होतो परत वाढतो. निसर्गाच्या अनिवार्य क्रमबद्धतेचं प्रतीक हा चंद्र आहे. अनिवार्य क्रमबद्धता म्हणजे द्वितीये नंतर तृतीय, चतुर्थी येते आधी द्वितीय नंतर चतुर्थी नंतर तृतीया येत नाही. क्रमबद्धता कोणीच नाकारू शकत नाही. जेव्हा प्राणतत्त्व क्रमबद्धता जाणून उचित दिशेने कार्य करतं तेव्हा जाणीव प्रबळ होते.
जाणीवा अधिक शुद्ध आणि प्रबळ करण्याची चिन्हं म्हणजे सूर्य आणि चंद्राचं एकत्रित चित्र. पण हे चित्र नुसतं काढून काही होत नाही. ही तत्व जीवनात स्वीकारली पाहिजेत.
मी नेहमी तुम्हाला ‘नामस्मरण’ करायला सांगतो. नाम उच्चारण आणि स्मरण करणं ह्यात फरक आहे. नामाचं स्मरण करा असं मी तुम्हाला सांगतो. आठवण म्हणजे काय - नाव घेण्याची आठवण नाही. नाम उच्चारताना ‘हे नाम भगवंताचं आहे, त्याच्या आईचं हे नाम आहे जिची सत्ता ultimate आहे’ हे स्मरण असणं आवश्यक आहे. स्मरण ही जाणीव आहे. नामाच्या नुसत्या जपाचा प्रभावही होतोच. पण आम्ही स्मरणपूर्वक नाम घेतो तेव्हा स्मरण ही जाणीव असल्यामुळे त्याचं कार्य आमच्या जाणीवेवर होतं आणि आमची जाणीव शुद्ध होते.
प्रत्येकजण म्हणतो - मला माझं जीवन बदलायचं आहे. जीवन कोण बदलू शकतं? जी जीवन निर्माण करते तीच जीवन बदलू शकते.आम्ही प्रयास केला पाहिजे. नदीपर्यंत जाऊन पाणी पिण्याची जबाबदारी माझी. नदीत पाणी आहे की नाही हे बघणं तिचं काम आहे.चण्डिकेचं, तिच्या पुत्राचं नाम घेताना विश्वास असला पाहिजे की ही आमचं जीवन बदलू शकते, हिचा पुत्र आमचं जीवन बदलू शकतो. हे स्मरण असणं आवश्यक आहे. हे माहीत असणं आवश्यक आहे. सूर्य आणि चंद्र, दिवस आणि रात्र. दिवस म्हणजे प्रकाश असणं आणि रात्र म्हणजे प्रकाश नसणारी वेळ. अमावास्येच्या दिवशी एक चंद्र नसतो पण सगळे तारे दिसतात. जेव्हा वाटतं आशेचा एकही किरण नाही, त्यावेळी लाखो प्रकाशाचे किरण असतात.
सूर्य-चंद्र ह्यांच्याशी दिवस-रात्र आणि प्राणाची क्रमबद्धता जोडलेली आहे. ह्या दोघांशी जोडलेली कोणती गोष्ट आहे? तर प्राणतत्त्व आणि क्रमबद्धता. प्राणशक्ती आणि निसर्गशक्ती ह्या दोन्ही जिथे एकत्रित गुंफल्या गेलेल्या आहेत. प्राणतत्त्व जेव्हा सौम्यत्व धारण करून क्रमबद्धतेने विकास करत त्यावेळी जाणीवा दुप्पट होतात.
खर्याखुर्या नामस्मरणात ही गोष्ट असते. पण एकाग्रतेने नामस्मरण होत नाही. त्यासाठी आम्हाला हनुमन्ताची आवश्यकता आहे. तो महाप्राण आहे आणि सगळे क्रमही तोच सांभाळतो. हा महाप्राण असताना प्राणतत्त्वही आहे.
‘ब्रह्माण्डाभोवते वेढे वज्रपुच्छे करु शके । तयासी तुळणा कैची ब्रह्माण्डी पाहतां नसे ।’
त्याचं वज्रपुच्छ म्हणजे वज्राइतकं कठीण पुच्छ. त्याच्याकडे अशी क्रमबद्धता आहे की जो ब्रह्माण्डाचा क्रम आहे त्या सगळ्या अनंत ब्रह्माण्डांना तो वेढे घालू शकतो.
हनुमन्ताची ब्रह्माण्डात कोणाशीही तुलना करता येत नाही. हा महाप्राण आहे. म्हणून तोच सगळी क्रमबद्धता ठेवतो. महाप्राण निर्जीव वस्तूत त्यांची स्थिती maintain करतो आणि मनुष्याला त्याचा विकास, अभ्युदय घडविण्यासाठी मार्गदर्शन करतो. हा क्रमनियंता आहे. एका महाप्राणात दोन्ही गोष्टी समान आहेत. ह्यात प्राणतत्त्व आणि निसर्ग क्रमबद्धता आहे. ह्यात सूर्यत्व आणि चंद्रत्व आहे. तो सूर्यही आहे आणि चंद्रही आहे. ह्यालाच हठयोग म्हणतात. ‘ह’ म्हणजे सूर्य आणि ‘ठ’ म्हणजे चंद्र.
हनुमानचलिसा असं स्तोत्र आहे की जेव्हा तुम्ही हनुमन्ताचं स्मरण करत हनुमानचलिसाचं पठण करता, जेव्हा त्यातली एकेक ओळ आठवायला बघता तेव्हा ती घटना तुमच्या आयुष्यात घडत असते.
‘दुर्गम काज जगत के जेते । सुगम अनुग्रह तुम्हरे तेते।’
हे जग जिंकणार्या म्हणजे जे सगळ्या जगाला दुर्गम आहे ते फक्त तुमच्या अनुग्रहाने सुगम होते. ह्यावेळी आपलं जे काम अडलं आहे त्याचा विचार करू नका. त्यावेळी समुद्र उड्डाण करणारा, राम-जानकीसाठी उड्डाण करणारा हनुमन्त दिसला पाहिजे.
‘संकट ते हनुमान छुडावै । मन क्रम बचन ध्यान जो लावै ।’
वचन काय आहे, ह्याच्यात जो क्रम दिलेला आहे त्याचं जो ध्यान लावतो त्याच्या जीवनातले सगळे क्रम दुरुस्त होतात. हनुमन्ताने दिलेलं वचन आहे.
वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा ह्या एका महिन्यात एकदा तरी १०८ वेळा हनुमानचलिसा म्हणा. तुमच्या जीवनातले सगळेच्या सगळे बिघडलेले क्रम तो हनुमन्त दुरुस्त करेल. तुलसीदासीजींनी हनुमन्ताजवळ मागितलं होत की, लोकांच्या पाप-पुण्याचा हिशोब न करता हे कार्य करा.
आपल्या शरीरातील जी १०८ शक्तिकेंद्र आहेत ती जाणिवेची आहेत. ३६+३६+३६. ‘तिहुँ लोक’ म्हणजे प्राणमय, मनोमय आणि भौतिक देह ही केंद्र जाणिवेच्या सत्तेखाली आहेत. ह्या तीन देहातला बिघडलेला क्रम दुरुस्त हनुमानजी करतो.
वडाची पूजा करणं गैर नाही, वडाची पूजा नवर्याला बडबडत करणं काही उपयोगाचं नाही, आणि नवरा काळजी घेत नसेल तर त्यासाठी वटपौर्णिमेला पूजा करण्याची आवश्यकता नाही.
यम हा सूर्यपुत्र आहे. आणि हनुमान हा सूर्यालाही गिळणारा आहे. यमाच्या बापालाही भारी आहे. सगळं चैतन्य निघून गेलेल्या अशा पतीला आपल्या पातिव्रत्याने आणि प्रेमाच्या जोरावर सावित्रीने परत आणलं.
वटवृक्ष कसा असतो. त्याची फांदी निघते, ती खाली येते, तिला मुळं फुटतात त्यापासून वृक्ष तयार होतो. हा क्रम कोण ठरवतो. त्याच्यामागे असणारा महाप्राण ठरवतो. आधार मिळाला की आपण म्हणतो ना आधारवड.
अशी ही वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरु सगळं द्यायला खुलेपणाने बसलेला असतो, प्रत्येकाला त्याच्या क्षमतेपेक्षाही जास्त देतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण विश्वात मनापासून जो कोणी स्मरण करतो त्या व्यक्तीच्या जीवनासाठी आवश्यक असणारी शक्ती गुरु देतो.
१०८ वेळा हनुमानचलिसा म्हणताना हनुमन्ताचं जे आठवेल ते रूप आठवा, चित्र आठवा. दुर्गम काज जगत के जेते म्हणताना उड्डाण करणारा हनुमन्त आठवा. संकरसुवन केसरीनंदन म्हणताना केसरीचा पुत्र दिसायला हवा. कानन कुंडल कुंचित केसा म्हणताना त्याच्या खांद्यावरचं जानवं दिसलं पाहिजे. कल्पना केली पाहिजे. कल्पना केली तरी ते चित्र दिसत. हनुमन्ताच्या कथा वाचतो, जी कथा ऐकलेली असते ती आठवा.
सूर्य-चंद्र, प्राणतत्व आणि क्रमबद्धता. तुम्हाला दोन विरुद्ध दिशेला ओढणार्या जाणिवाचं स्वरुप म्हणजेच सूर्य-चंद्र. हे केल पाहिजे- हे केल नाही पाहिजे अशा विरुद्ध जाणिवा आपल्याला आपल्या भल्यासाठी वापरायला हव्यात, ह्यांचा क्रम चुकला की कष्ट पडतात.
प्रत्येकवेळी नामजप करताना, साई-साई म्हणताना, एकदा तरी साईबाबा दिसले पाहिजेत, आठवले पाहिजेत, एखादी गोष्ट, अनुभव आठवला पाहिजे.
जे एकदाही १०८ वेळा म्हणणार नाहीत त्यांच्या घरी मी एक दिवस जाणार नाही. मी एक दिवस घरी येणार नाही म्हणजे मी तुमच्या घरी रोज येतो.
मनुष्य अनेकवेळा जीवनात हतबल होतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी माझ्या आईने अनेक मार्ग दिले आहेत त्यातला हा सोपा आणि सुंदर मार्ग आहे.
हा हनुमन्त सूर्यही आहे आणि चंद्रही आहे. हा मूलाधारचक्र ते सहस्त्राकारचक्र उड्डाण करतो. सूर्य-चंद्र ह्यांचं एकरूपत्व करतो. ह्याचा आरंभ होण्याचा दिवस अतिशय पवित्र प्रेमाचा दिवस आहे ह्या दिवसापासून ते सद्गुरुतत्त्वाच्या दिवसापर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत एकदा तरी १०८ वेळा हनुमान चलिसा म्हणा.
॥हरि ॐ ॥