॥हरि ॐ॥
आपण श्रीस्कंद चिन्ह बघितलं, स्वस्तिक बघितलं, गेल्यावेळी श्रीगुरुचरणमास आणि सूर्य-चंद्राचे नाते बघितले. ‘ॐ श्रीरामवरदायिनी महिषासुरमर्दिन्यै नम:।’ आज आपल्याला वेगळी गोष्ट बघायची आहे. स्वतिक, स्कंदचिन्ह ही फक्त शुभचिन्ह नाही आहेत, ह्या आदिमातेच्या खुणा आहेत. हे Algorithms आहेत. Algorithms म्हणजे कुठलेही समीकरण सोडविण्याच्या पायर्या. ही समीकरणं सुटायची कशी? मनुष्याचे जेवढे प्रयास तेवढीच त्याची आकलनशक्ती. समीकरण सोडविण्यासाठी पुरुषार्थ जेवढा आवश्यक आहे, तेवढेच चण्डिकाकुलाचे आकलन असणेही आवश्यक आहे. ही आदिमाता आहे कशी? हे चण्डिकाकुल, चण्डिकेचे पुत्र आहेत कसे हे समजणं आवश्यक आहे.
झाड सावली देत असते. आपल्याला झाडाची सावली हवी असेल तर झाड आपल्या पाठी पाठी येतं का? नाही. आपल्याला झाडाजवळ जायला हवं. नदी पाणी देते, त्यासाठी आपल्याला नदीजवळ जायला हवं. पाऊस दिवसा अजिबात पडायला नको, रात्री भरपूर पडू दे म्हणून पाऊस तुमच्या म्हणण्याप्रमाणे पडतो का? आपण शाळेत शिकलोत २१ जूनला दिवस मोठा असतो आणि २२ डिसेंबर दिवस लहान असतो. पण किती जणांना आठवण झाली २१ जूनला ह्या गोष्टीची. ही Algorithms तिची आहेत. तिनेच ह्या विश्वाची रचना केली आहे, तिचं सूत्र समजून घेणं आवश्यक आहे. परमेश्वराने जे काही आपल्यासाठी उत्पन्न केलेले असते ते त्याच्या जागी उचित असते. आम्हाला सावलीसाठी झाडापर्यंत चालत जायला हवे. तिनेच नदी उत्पन्न केली. नदीवर धरण बांधणं चुकीचं नाही, पण ते चुकीच्या जागेवर बांधणं अयोग्य. ते चुकीच्या जागेवर बांधून चालणार नाही. सावलीसाठी झाडापर्यंत चालत जायला पाहिजे. साधं घर आहे बघा. त्या घरात सावली मिळावी म्हणून मोठं झाड लावलं तर एक ना एक दिवस ते झाड कौल फोडून बाहेर येणार. ही साधी गोष्ट आहे, ती सहज शिकता येते. ही गोष्ट शिकण्यासाठी कुठल्याही scientific reason ची आवश्यकता नाही. झाड सावली देतं, नदी पाणी देते पण त्यासाठी आपल्याला नदीकडे, झाडाकडे जायला पाहिजे. जीवन जगत असताना आपण अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकत असतो. झाड, नदी ह्यांच्याकडून आपण ही गोष्ट शिकतो आणि ते तिथपर्यंतच मर्यादित ठेवतो. मीठ जास्त पडलं की खारट होतं हे माहीत असतं पण त्याचा reference आपण इतर ठिकाणी वापरत नाही. त्यावर आपण विचार करत नाही. जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत कोणीही शहाणा होत नाही. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ ही फक्त कल्पित गोष्ट आहे. ज्या गोष्टींनी अनेक लोकांनी ठोकर खाल्ली तरी आपण त्याच गोष्टी करत असतो. बापू गेले अकरा वर्षे सांगताहेत स्किममध्ये पैसे गुंतवू नका. कितींदा सांगितले तरी पुन्हा कोणीतरी नातेवाईक सांगतात म्हणून आम्ही पैसे गुंतवतोच. ठेच लागेपर्यंत सुधारत नाही.
तहान लागल्यावर विहीर खणून उपयोग नसतो पण आम्हाला संकट येईपर्यंत देव आठवत नाही, संकट आल्यावर देव आठवतो. आठवतो कशासाठी ‘देवा हे काय केलंस?’ अशी देवाची आठवण देवाशी भांडण्यासाठी करतो. देवाने आम्हाला मदत करण्यासाठी आम्ही देवासाठी काय करतो? आम्ही काय करणार देवासाठी ? मग आम्ही म्हणतो आम्ही सामान्य माणसं आहोत, आम्ही फालतू आहोत, आम्ही काय करणार? अशा पळवाटा शोधतो.
गणपतीला मोदक आवडतात पण गणपती दूध पितो म्हणून सगळे दुधाच्या वाट्या घेऊन त्याच्या सोंडेला लावायला गेलेत. हे फ्रॉड आहे. गणपती असले आचरट चाळे करायला तुम्हाला काय तो विदुषक वाटतो की जादूगार आहे? गणपतीला चमत्कारच दाखवायचा असेल तर मोदक खाऊन दाखवला असता तोही खर्याखुर्या भक्ताला, सगळ्यांना कशाला दाखवत बसेल? पण आम्ही आमचं डोकं वापरत नाही. देवाला असला चत्मकार करून दाखवायची आवश्यकता नाही.
देवाची प्रार्थना करताना, मागताना कसं मागितलं पाहिजे - सगळ्या भाषा देवानेच दिलेल्या आहेत, कुठल्याही भाषेत हाक मारा. वेड्यावाकड्या शब्दात साद घाला पण साद घालताना विश्वास असला पाहिजे की, ‘हा मला खराखुरा मदत करणारा आहे. ह्या देवामध्ये मला मदत करण्याचे सामर्थ्य आहे.’ ह्या विश्वासाने हाक मारायची असते. तुमचा विश्वास फलद्रूप होतो. चण्डिकाकुलाची प्रार्थना करताना चण्डिकाकुलावर विश्वास हवा,‘ही माझी आई अशीच आहे.’
आपलं कोणतंही प्राकृत, संस्कृत स्तोत्र घ्या. प्रत्येक स्तोत्रात सुरुवातीला काय असतं? ‘श्री’ असतं, ॐ असतो, आणि काय असतं? देवाचं नांव व देवाचं ध्यान असतं. म्हणून उपासनेत ध्यानमंत्र असतो. आधी इष्ट देवतेचं ध्यान करायचं असतं.
आपण साईसच्चरितात देशमुखीणबाईंची गोष्ट पाहतो. बाबांनी देशमुखीणबाईंना काय सांगितलं आहे? गुरुमंत्र हवा तोपर्यंत अन्नपाणी घेणार नाही, म्हणून तीन दिवस उपाशी राहते. तेव्हा तिला बाबा काय सांगतात? खूप सुंदर ओव्या आहेत त्या. बाबा तिला सांगतात, ‘माझ्या गुरुंनी माझे कान भरले नाहीत, तर मी तुझे कान कसे भरणार? माझ्या गुरूंनी मला सांगितले, तू माझ्याकडे अनन्यभावाने प्रेमाने पहा, मीही तुझ्याकडे प्रेमाने बघत रहातो. गुरुवर अनन्य प्रेम करायला शिक. तो तुझ्याकडे अनन्यपणे पाहिल.’
बाबा आणखी काय म्हणतात-
‘न करिता सगुणाचे ध्याना । भक्तिभाव कदा प्रकटेना ।
सप्रेम भक्ति जंव घडेना । कळी उमलेना मनाची ।
ते उमलल्याविण कांहीं । केवळ कर्णिकेस गंध नाही ।
ना मकरंद ना भ्रमर पाहीं । तेथ राहील क्षणभरी ।
‘वक्रतुण्ड महाकाय’ ह्यात नांव आहे. ‘सूर्यकोटी समप्रभ’ कोटी सूर्याएवढी ज्याची ताकद आहे, कोटी सूर्याचे तेज फिके पडेल असं तुझं तेज. आधी गणपतीची स्तुती केली मग ध्यान केलं. आपण सामान्य माणसं आहोत, आपण मोक्षापर्यंत पोहचलेलो नाहीत. देवाची स्तुती करून मस्का मारायचा नाही, मस्क्याने देव प्रसन्न होत नाही. स्तुतीत प्रेम हवं. हेमाडपंत म्हणतात - ‘साईच लिहविणारा आहे’
‘तुझी स्तुती तूच करिसी’ हा हेमाडपंतांचा भाव आहे.
आपल्याला ध्यानमन्त्र येत नसला तरी त्याच्या रूपाचे ध्यान करता आले पाहिजे. त्याच्या फोटोकडे बघायचं, डोळे बंद करायचे, जोपर्यंत फोटो दिसतो तोपर्यंत डोळे बंद ठेवायचे किती सोपं आहे. ट्रेनमध्ये सुद्धा हे ध्यान होऊ शकतं, पण त्यासाठी त्याच्यावर विश्वास हवा.
स्तोत्रात, मंत्रात पहिलं देवाचं नाम येतं मग ध्यान आणि देवाची स्तुती आहे. उपनिषदामध्ये त्या परमात्म्याचा नित्यगुरुवरचा कमालीचा विश्वास, परशुरामाचा आदिमातेवरचा विश्वास आपण बघतो. आपण म्हणतो देव माझ्याकडे बघत नाही का? तुला मी दिसत नाही का? ह्याचा अर्थ आपण देवावर शंका घेतोय. आपण म्हणायला हवं ‘देवा तू मला पहतोयस, सगळं बघत आहेस. चूक काय आणि बरोबर काय हे तुला कळतयं. मला ह्या चुकीच्या गोष्टीतून बाहेर काढ. तू मला ह्यातून बाहेर काढणार ह्याची मला खात्री आहे.’ जेव्हा असा विश्वास असतो तेव्हा सगळ्या गोष्टी आपोआप सुटतात.
भारतात पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अध्यात्म्यातील एक गोष्ट समान आहे. हा Algorithm जपण्यासाठी अध्यात्मामध्ये एक अशी गोष्ट आहे जी सगळीकडे समान आहे. शद्बही समान आहे व ती गोष्ट तुम्ही सगळ्यांनी अनेकवेळा केलेली आहे. अशी कुठली गोष्ट आहे?
आधी ध्यान मग गुणसंकीर्तन नंतर प्रार्थना ह्याक्रमाने हा algorithm पसरलेला आहे ही गोष्ट आहे - ‘आरती’
कुठलीही आरती घ्या. आरतीमध्ये काय आहे? आर्तता आहे. ह्या तीन गोष्टी कुठे आहेत
‘सुखकर्ता दु:खहर्ता । वार्ताविघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।’ ही स्तुती आहे. ‘लंबोदर पितांबर फणीवर वंदना’ ह्यात रूपाचं वर्णन आहे. ‘संकटी पावावे निर्वाणी रक्षावे’ ही प्रार्थना आहे.
इतके दिवस सांगतोय ‘संकटी’ म्हणून तरी आम्ही ‘संकष्टी’च म्हणतो. ज्या पोळीत तेल-तूप नसतं त्याला ‘चपाती’ म्हणतात आणि तेल-तूप आलं की ती ‘पोळी’ झाली. पण आम्ही सुधारणार नाही. आम्ही पोळीला चपातीच म्हणणार. शोले मध्ये एक डायलॉग आहे ‘हम ब्रिटिशोंके जमानेके जेलर है’ पण तुम्हाला सांगतो तुम्ही पाहिला नसेल त्या जमान्यापासून मी जेलर आहे.
दुर्गे दुर्घट भारी । तुजवीण संसारी ॥ अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी॥
वारी वारी जन्मामरणाते वारी। हारी पडलो आता संकट निवारी ॥
जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी । सुरवर ईश्वरवरदे तारक संजीवनी।
जय देवी जय देवी जय।
त्रिभुवनीभुवनी पाहता तुज ऐसी नाही । चारी श्रमले परंतु न बोलवे काही।
साही विवाद करिता पडिले प्रवाही । ते तू भक्तालागी पाविसी लवलाही ।
जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी । सुरवर ईश्वरवरदे तारक संजीवनी ।
जय देवी जय देवी जय।
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा । क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा ।
अंबे तुजवाचोन कोण पुरवील आशा । नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा ।
जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी । सुरवर ईश्वरवरदे तारक संजीवनी ।
जय देवी जय देवी जय।
तुजवाचून कोण? कुणीच नाही. महिषासुरमर्दिनीच्या आरतीत हक्काने, प्रेमाने मदत मागितली आहे. ‘तूच ह्या सगळ्या विश्वाची आई आहेस’ किती निर्धार आहे. Please, कृपया हे शद्ब वापरलेले नाहीत. ‘कृपया मला मदत कर देवा’ अशी प्रार्थना केलेली नाही. आरतीत भीक मागावी लागत नाही.
ज्या ऋषींनी ही algorithmची सूत्र ओळखलीत त्यानुसार त्याची रचना केली.
‘सुखकर्ता दु:खहर्ता....’ ही आरती रामदासांनी लिहिली आहे हे किती जणांना माहीत होतं? त्या आरतीत म्हटलेलं आहे - ‘दास रामाचा’.
आम्ही मेकॅनिकली आरती म्हणत असतो. वर्षातून एकदाच गणपती येतो. पण आरती म्हणताना अजूनही आमची पाठ नसते. गणपती येण्याच्या आधी तीन-चार दिवस आरत्या म्हटल्या तर काय बिघडणार आहे? आम्ही फक्त लोकांना दाखवण्यासाठी तोंडाने पुटपुटतो असे करून आम्हाला वाटते की आमची लाज राखली गेली. आम्ही देवासाठी नाही तर लोकांसाठी आरती म्हणतो. देवाला कळत नसेल का की हा शद्ब तुम्हाला येत नाही. तरी आम्ही तसेच वागतो. वारंवार ही चूक का घडते. आम्हाला वाटतं आमची लाज राखली गेली. एकदा का लाज राखली गेली हे कळलं की आम्ही निर्लज्जासारखे वागायला मोकळे होतो.
आरतीमध्ये त्याचं ध्यान आहे. तुम्हाला भीक मागावी लागत नाही. ती आई आहे ह्या हक्काने मागायचे. अग्नी, दीपाच्या साक्षीने केलेली प्रार्थना म्हणजे आरती. हा सोपा मार्ग आहे. आर्त म्हणजे मनाच्या तीव्र भावनेचा प्रभाव. आरती करताना मजा, आनंद करा पण मजेसाठी आरती करू नका. आरती करताना आनन्द करा. गणपती समोर उभं राहून आम्ही पांडुरंगाची आरती म्हणतो तेव्हा त्याचं connection चण्डिकाकुलाशी जोडलं जातं. तेजाच्या साक्षीने ध्यान, गुणसंकीर्तन व प्रार्थना एकत्रित केल जातं त्याला आरती म्हणतात.
आपण किती जण मनापासून किती वेळा देवाला प्रेमाने ओवाळतो. साधी उदबत्ती घेऊनसुद्धा ओवाळत नाही. आम्हाला देवाला नमस्कार करायलाही वेळ नसतो. जरा आम्ही बीझी झालोत, उशीर झाला की आमची पहिली गोष्ट थांबते ती - ‘उपासना’. माझी गुप्तचर यंत्रणा फार strong आहे. बिझी झाल्यावर उपासना सोडून तुम्ही काय काय करता ह्याची सगळी खबर मला असते. घरी गणपती आहे. घरात येणार्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत करतो. त्यांच्याशी गप्पा मारतो पण रात्र झाली की एकदा तरी गणपती शेजारी बसून कधी बोलता का? तो सगळं ऐकतो हे निश्चित आहे. त्याला प्रेमाने विचारतो का - तुला मी केलेला स्वंयपाक आवडला का? आपण एकदातरी स्वत:च्या हाताने दुर्वांचा हार बनवून घालतो का? ह्या गोष्टी स्वत:च करायच्या असतात. सगळ्या गोष्टी नाही पण एखादा हार, एक पदार्थ आपण गणपतीसाठी नक्की करू शकतो. हा साक्षात मंगलमूर्ती आहे. मग त्याच्या स्वागतासाठी स्वत: श्रमायला नको का? प्रत्येकाची क्षमता वेगळी असू शकते. स्वत:च्या हाताने साधी रांगोळी काढा. मनापासून त्या गोष्टी करा. त्याला आवडणारं आहे.
मनातला आर्त भाव देवापर्यंत लवकर पोहचतो, तुम्ही भावाने प्रार्थना करता तो परमेश्वरापर्यंत पोहचतोच. शुभचिन्ह म्हणून स्वस्तिक तसेच प्रेमाने आपल्याला आवश्यक सांगितलेली गोष्ट म्हणजे - ‘दीप’. हा दीप तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करतो. मुंज, पूजा, विवाह सारख्या मंगलविधीमध्ये दीप लावला जातो. त्याचप्रमाणे मृत व्यक्तीलासुद्धा ओवाळले जाते. ह्या दीपाच्या साह्याने आपण औक्षण करतो. दीप हा असा aglorithm आहे जो आपल्याला ध्यान, गुणसंकिर्तन व प्रार्थना ह्या तिन्ही गोष्टी दाखवतो. ह्यात प्रकाश, उष्णता, अग्नी आहे. अग्नी म्हणजे ह्या दिपाने आपण अगरबत्ती, मेणबत्ती लावू शकता म्हणून अग्नी म्हणून हयाचा वापर होतो. प्रकाश म्हणजे ध्यान. प्रकाश आम्हाला दिसतो. म्हणून प्रकाश ध्यानाचं रूपक आहे. उष्णता ही क्रियाशक्ती आहे. गुणसंकिर्तन हे परमेश्वराच्या क्रियेचं आपण आपल्या भाषेत केलेलं स्तवन आहे. अग्नी हे प्रार्थनेचं रूपक आहे. अग्नी पाचक आहे. अग्नी आहे तरच प्राण आहेत. अन्न पचवायला जठराग्नी लागतो, जेवण शिजविण्यासाठी अग्नी लागतो. अग्नीशिवाय transformation होत नाही. वस्तू रूपांतरित करण्यासाठी अग्नी आवश्यक आहे. अग्नी एका स्थितीतून दुसर्या स्थितीत रूपांतरित होण्यासाठी, ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीतून चांगल्या स्थितीत नेण्यासाठी, वाईट स्थितीतून दूर जाण्यासाठी प्रार्थना - transformation.
देवाला ओवाळताना आम्हाला प्रश्न पडतो कसं ओवाळायचं? कसंही ओवाळा. पण देवाकडे बघत ओवाळा. ओवाळताना ज्योत विझली तरी काहीही वाईट होणार नाही. देव वाईट नाही. ज्योत विझली तर परत प्रज्वलित करायची. ओवाळताना शांतपणे आपल्या मोठ्या आईचं, सद्गुरुचं स्मरण करायचं. एवढ्या साधेपणाने आरती करायची. आरती करताना काय दिसलं पाहिजे हे लक्षात घ्या. आपण आरती करताना जी ज्योत आहे तिची प्रभा त्या देवाच्या चेहर्यावर, त्या मूर्तीवर असतेच असते. हे तेजोवलय पाहणे आवश्यक आहे. स्वच्छ धुतलेल्या तबकात चांगला दीप, देवाला आवडेल ते फूल आणि अक्षता ठेवून आरती करा, जे करायचे ते पूर्ण प्रेमाने, विश्वासाने करा. देवाला तुम्ही केलेले आवडणारच आहे ह्या विश्वासाने करा. तुम्ही मुद्दाम चुकीचं कराल तर ते देवाला आवडणार नाही. आज आपण आरती करायला शिकलोत. आरती मध्ये जय शद्ब असो किंवा नसो, आरती हा basically जयजयकार आहे. आम्ही इथे काय म्हणतो परमेश्वराचा जय असो. माझ्या आयुष्यात वृत्रासुराचा विजय होऊ नये. विजय महिषासुरमर्दिनीचा, परमात्म्याचा, साईचा असो.
मन: - नम: प्रमाणे जय - यज आहे. यज म्हणजे होम. देवाचा जयजयकार करणं हे देवाचा होम करण्याइतकचं पवित्र आहे. जयजयकार मोकळ्या मनाने, उच्चरवाने, भरलेल्या अंत:करणाने करायला हवा. आजपासून आम्ही आरती ह्या भावाने करणार. सुरुवातीलाच शंभरापैकी शंभर मार्क मिळतील असं नाही. ती शंभरापैकी शंभर मार्कही देऊ शकते आणि शंभरापैकी हजारही देऊ शकते. तुम्ही म्हणाल बापू शंभरापैकी हजार कसे? तर तो तुमचा प्रांत नाही. ते तिचं काम आहे ते ती बघेल.
॥ हरि ॐ॥