॥ हरि ॐ ॥
Happy New Year जे इथे आहेत आणि ऐकताहेत त्यांना, आणि जे इथे नसतील, ऐकू शकत नसतील पण ज्यांचा दृढभाव आहे त्यांच्यासाठी बरोबर ३१ डिसेंबरच्या रात्री १२.०० वाजून शून्य मिनिटांनी मी प्रत्येकाला Happy New Year wish केलंय. पण बापू आम्हाला ते ऐकू आलं नाही. डायरेक्ट ऐकू आलेलं खूप छान असतंच.
आपल्याला काहीवेळा काही गोष्टी कळत नाहीत. कळत नाहीत ह्याचा अर्थ माहिती आहे, की माहिती नाही ह्याचं प्रमाण बघायला हवं. जे माहीत आहे तो भाग किती मोठा आहे हे आपल्याला पहायचं आहे.
इंटरनेटमध्ये असलेल्या माहितीपुढे आपल्याला माहीत असलेली माहिती टाकली तर, ती ०.०००००००...........मध्ये येईल. कळत असलेल्या भागापेक्षा नकळतचा भाग मोठा असतो. ज्ञानापेक्षा अज्ञानाचा भाग मोठा असतो. रस्त्यावर चालताना आपल्या पुढचा माणूस, बाजूचा माणूस दिसतो पण आपल्या मागून चालणारे किती असतात तुम्हाला माहीत आहे का? माहीत नसतं म्हणून पाकीट मारलं जातं.
रस्त्यावरून चालताना नुसतं शुक-शुक केलं तरी किती जणं मागे बघतात. जोसेफ नाव असणार्या व्यक्तीला हाक मारली तरी जनार्दन नाव असणारा माणूसही बघतो. ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. ती आपोआप घडते.
आदल्या दिवशीची सोळा तासातली प्रत्येक गोष्ट आठवायला कोणालाही जमणार नाही, जो साक्षात्कारी असेल त्यालाच जमेल. माहीत नसणं खूप सुंदर असतं. बापू तुम्ही अग्रलेखातून सांगता, प्रत्यक्षमध्ये सांगता की, नवीन technology ची माहिती करून घ्या आणि आता सांगता की माहीत नसणं खूप सुंदर आहे.
माहीत नसणं खूप चांगलं असतं, जर ते तुम्हाला माहीत नसलं तर. आपल्याला काय माहीत नाही हेच माहीत नसतं. कोणी पैसे खाल्लेत, कोणी नाही खाल्लेत, मी कोणाशी खोटं, कोण माझ्याशी खोटं बोललं हे आपल्याला माहीत असतं.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की, मला काय माहिती नाही हे माहीत असलं पाहिजे. माहीत नाही अशा अनंत गोष्टी आहेत. मला काय माहीत असणं माझ्यासाठी आवश्यक आहे, अनिवार्य आहे हे माहीत असलं पाहिजे. त्यात मला काय माहीत नाही हे जाणवावं लागतं, ओळखावं लागतं मग ते शिकता येतं.
डिसेंबर महिन्याची दहा तारीख गेली की, काय फास्ट गेलं हे वर्ष, कसं गेलं कळलंच नाही, असं का वाटतं आपल्याला. ह्याचा अर्थ ह्या वर्षात जे काही करायचं होत ते राहून गेललं असतं. परीक्षा देऊन आल्यावर आपण सांगतो पहिला प्रश्न लिहिताना वेळ गेला म्हणून बाकीचे दोन प्रश्न लिहायचे राहून गेलेत.
जिथे प्रवास आहे तिथे अनपेक्षित गोष्टी घडणारच. मी ठरवलं तसंच घडणार असतं, तर परमेश्वराने माणसं न बनवता रोबोज् बनवले असते. सगळंच्या सगळं आपल्याला आखीव-रेखीव पाहिजे असतं. ९.५० ची गाडी माझ्या वेळेला ९.५२ ला आली पाहिजे. माझा डबा रिकामा असला पाहिजे. मला किमान थर्ड सीट मिळाली पाहिजे. माझं स्टेशन यायच्या आधी डब्यातले सगळे जण उतरलेले असले पाहिजेत त्यामुळे मला उतरताना गर्दी होणार नाही. माझी गाडी, बाईक सिग्नल जवळ आली की ग्रीन सिग्नल पडलाच पाहिजे. आपण ह्याच कल्पना घेऊन जगत असतो.
अपेक्षित गोष्टींपेक्षा आपल्या जीवनात अनपेक्षित गोष्टीच घडत असतात आणि अनपेक्षित गोष्टींची आम्हाला सवय नसते. अनपेक्षित येऊन आदळतं तेव्हा मनुष्य दचकतो आणि मग कृती करायला बाचकतो. दचकतो म्हणजे एक पाऊल मागे जातो आणि बाचकतो म्हणजे पुढे पाऊल टाकू शकत नाही. असं दचकत-बाचकत जीवन घालवायचं का? शंभरपैकी एखाद्या गोष्टीपासून आपण दचकतो तर हरकत नाही. पण आपण लहान-सहान गोष्टींतही दचकत-बाचकत असतो. अनपेक्षितरित्या गोष्टी घडत असतात. ह्याचा मनाने स्वीकार करत नाही. माझ्याच मला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी असतात. मी सामान्य मनुष्य आहे माझा मला माहीत नसलेल्या अनेक गोष्टींशी संबंध आहे. - एक मिनिटापूर्वी मी हेच वाक्य बोललो पण मी माझा शब्द कधी बदलत नाही. तरी तुम्ही बाचकलात आणि दचकलात. आपण ही गोष्टी स्थूल, सूक्ष्म, तरल पातळीवर बघूया.
स्थूल पातळीवर Mr.X आहे. त्याला शेजारी-पाजारी आहेत, ऑफिसमध्ये जातो आहे. नॉर्मल माणूस आहे. वर्षानुवर्ष एका ठिकाणी तो चहा-वडापाव रोज खात असतो, एक दिवस तिथला वडापाव खातो आणि त्याला दुसर्या दिवशा डायरिया होतो. त्याला खाताना कळतं का की आज जे खाल्लं आहे त्याच्यामुळे डायरिया होणार आहे म्हणून? इतकी लोकं तिथे वडापाव खात होते त्यांना काही झालं नाही ह्यालाच का झालं? एक सेकंदापूर्वी माशी येऊन त्या वडापावर बसली होती आणि तिने त्याच्यावर आपली विष्ठा टाकली होती. त्या विष्टेत बॅक्टेरिया तयार झाले होते. त्या Mr.X चा त्या माशीशी काही संबंध असतो का? त्या वडापाववाल्याशी त्याचं काही वैर होत का? तरी घटना घडलीच ना.
तोच डायरिया झालेला मनुष्य दुसर्यादिवशी त्या वडापाववाल्याशी जाऊन भांडतो. त्या एका घटनेमुळे त्याने त्या दिवशीचा वडापाववाल्याचा धंदा बसवला. इथे त्याला वडापाववाला डायरेक्ट माहीत आहे.
समजा infection वडापाव मधून गेलंच नसतं तर. जिन्यावरून जाताना कठड्यावर हात ठेवला असेल ज्याला कुणीतरी नाकाचा शेंबूड पुसला असेल आणि त्याच हाताने डबा खाल्ला तरी त्याला डायरिया होईल.
ट्रेनमधून जाताना एखाद्या मुलाला तुमचा धक्का लागला आणि त्याचं हॉलतिकीट बाहेर पडलं तर तुम्ही दोषी की तो मुलगा दोषी? तुम्ही त्याला मुद्दाम धक्का मारला नव्हता पण घटना तर घडली आहे. त्याने दुसर्या दिवशी येऊन तुमचे दोन दात पाडले. तुम्ही dentist कडे गेलात. त्या dentist त्याच्या प्रेयसीबरोबर appointment होती. तुम्ही त्याच्या ओळखीचे म्हणून तो तुमच्यासाठी थांबतो. त्यामुळे तो त्याच्या प्रेयसीला भेटायला जाऊ शकला नाही. त्यामुळे तो तिला प्रपोज करू शकला नाही. त्यामुळे त्याच्या प्रेयसीने लग्न मोडलं. त्याला जबाबदार कोण? तुम्ही.
त्या dentist च्या प्रेयसीने मग दुसर्या माणासाशी लग्न केलं तो मनुष्य फसवणारा निघाला त्यामुळे तिच्या आयुष्याची वाट लागते. त्याला जबाबदार कोण? तुम्ही.
म्हणजे एक छेद कुठपर्यंत जाते त्याचा विचार करा.
एक मुलगा एक दगड घेऊन सहज पायाने फेकतो. तो दगड एका बकर्याला लागतो. तो बकरा लंगडत-लंगडत त्याच्या कळपाकडे येत असतो. त्याला लंगडत येताना बघून धनगराचा मुलगा धावत येतो तोही पडतो. त्याला लागतं त्यामुळे तोही लंगडत-लंगडत चालतो. लंगडत चालल्यामुळे धनगराचा मुलगा आणि बकरा मागे राहतात. त्यांना यायला रात्र होते. वाटेत वाघ समोरून येतो. वाघाला बघून बकर्याला तिथेच टाकून पळत सुटला. बकरा पळताना ओरडायला लागला. त्यामुळे वाघाचं तिथे लक्ष जातं. पण वाघाच्या आधी तरस तिथे येतं आणि बकर्याला पकडतं. वाघाच्या तावडीत तो धनगराचा मुलगा सापडतो. वाघाला नरमांसाच्या रक्ताची चटक लागते त्यामुळे तो आणखी नरमासांचे बळी घेतो. एवढ्या सगळ्या गोष्टींना कारण तो डोंगरावरून मस्तीमध्ये दगड मारणारा मुलगा आहे. त्याला माहीत आहे का, माझ्या एका दगड उडवण्याने इतका भयंकर परिणाम घडणार आहे. अनपेक्षित घडणार्या घटनांची जबाबदारी आपल्यावर नसते. चुकीच्या गोष्टी करत असू तर जबाबदारी आपल्यावरच पडते.
सूक्ष्मपातळीवर बघूया. नवरा-बायकोचं भांडण होतं. नवरा रागात ऑफिसमध्ये जातो. तो boss असतो. ऑफिसमध्ये केबिनमध्ये येणार्या पहिल्या माणसावर तो वसकन ओरडतो. एका व्यक्तीवरचा राग दुसर्या व्यक्तीवर निघतो. मग तो मनुष्य त्याच्या मनात राग धरून ठेवतो. मनाने शत्रुत्व घेतो. सगळ्या गोष्टी मनात घडताहेत.
आता तरल पातळीवर बघूया. रस्त्याने तुम्ही चाललात तुम्ही टॅक्सीत बसणार तितक्यात दुसरा कोणी येऊन टॅक्सीत बसतो. तुम्ही त्याला बडबडता. पुढे काय घडलं? काही नाही. बरेचदा अनेक घटना घडल्या त्या घडल्या नसत्या तर वाईट घडलं असतं हे लक्षात घेतलं पाहिजे.
बाबा एका व्यक्तीला सांगतात की, आज घराबाहेर पडू नकोस, पडलास तर अमूक एक मंत्र म्हणत रहा. ती व्यक्ती घराबाहेर पडते. सगळा दिवस त्याचा व्यवस्थित जातो. त्यामुळे तो म्हणतो बाबा काय उगाचच सांगतात. पण बाबांनी सांगितलेली उपासना करून जर तो बाहेर पडला नसता तर त्याचा दिवस चांगला गेला नसता.
ते घडल नसतं तर काय घडलं असतं. ह्याचा विचार आपण करत नाही. अनेक गोष्टी देवाने घडवलेल्या असतात म्हणून त्याचा शांतपणे स्वीकार करायचा.
पाकीट मारलं म्हणून वाईट वाटतं, पण पुढे आयुष्यभर त्या स्पॉटवर गेल्यावर आपल्या मनात तीच भीती राहता कामा नये. अनेक अनपेक्षित घटनांना मनुष्य जे दचकतो-बाचकतो त्यामुळे माणसांच्या मनात भयगंड तयार होतो.
१५ डिसेंबरला आपण नेहमी म्हणतो की, आता हे वर्षे नवीन राहिलेलं नाही. आपण दचकतो-बाचकतो. मग म्हणतो आपण काही कामाचे मनुष्य नाही. आपण दरवर्षी ठरवतो पण काहीच घडत नाही. काहीही करत नाही. आपण फालतू, बेकार आहोत. ह्या विचारांनी मनात घर केलं की पुढच्या वर्षाची आखणी करताना आपण बाचकतो, दचकतो. पुढे पुढे तर आपण काहीच करू शकणार नाही असंच मन तयार होतं. आतापर्यंत काहीही केलं नाही तर आता काय करणार?
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरचे वाक्य मला खूप आवडत :
Start Wherever You Are. With Whatever You Have. Make Something of it. Be happy but never be satisfied.
आपल्या हातून सगळंच चुकत असेल. So What, बापू आमचं वय ८० वर्षे चालू आहे. तुम्ही जिवंत आहात, तुमचा श्वास तो देव - महाप्राण पुरवतो आहे. ह्याचा अर्थ त्याला आमच्या जीवनातला हेतू वाढवत न्यायचा आहे. त्याची खात्री आहे की हा विकास करू शकतो. जोपर्यंत महाप्राणाला वाटतं की हा विकास करू शकतो, तोपर्यंत महाप्राण आपल्याला श्वास पुरवत असतो. आमचा श्वास चालू आहे, नकळतपणे आमचे हार्ट बीटस् चालू आहेत ह्याचा अर्थ महाप्राणाला प्रत्येक मनुष्याच्या विकासाची खात्री असते. तो त्रिविक्रम तुमच्या जीवनात तीन पावलं चालतो. त्या हनुमंताला, त्रिविक्रमाला अजूनही hopes आहेत, त्यांना खात्री वाटते आहे की, मी सुधारू शकतो. आज माझ्याकडे शून्य असले तरी मी उद्या लाखो मिळवू शकतो. म्हणून स्वत:ला कधीही hopeless म्हणून घेऊ नका.
आम्ही ह्यावर्षी ही चुकू शकतो पण संकल्प करायचा सोडू नका. ९९% गोष्टी नाही घडल्या तरी चालतील, पण संकल्प करा. जगातलं सगळ्यात मोठं failure प्रयास न करण्यात आहे. तो परमात्मा साई आम्हाला किती मार्क पडले नाहीत, ह्याची गणती करत नाही. जर आम्ही त्याला देव मानतो मग त्याचीच पद्धती आम्ही वापरली जाते. प्रत्येक वर्षी संकल्प करा आणि त्या आईला सांगा, “आई, माझा संकल्प पूर्ण होत नाहीए. मला संभाळून घे.” कितीवेळा संकल्प केलेत आणि तुटलेत तरी घाबरायचं नाही. २० वर्षे त्याच-त्याच चुका केल्यात तरी पुन्हा २१व्या वेळी संकल्प करायचा.
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला नववर्ष समजा. डिसेंबरची १५ तारीख आली तर विचार करा, १५ दिवस आहेत अजून. पहिल्या अडीच तासापेक्षा शेवटच्या अर्ध्या तासात speedने पेपर लिहेन. अपयशाची व्याख्या बदला. १००% पैकी २०%, ५०% यश मिळालं ह्या भाषेत बोला. Failure हा शद्बच काढून टाका. बेस्ट क्रिकेटरही शून्यावर पण आऊट झालेला आहे. आज झिरो वर आऊट झालो म्हणून त्यांनी क्रिकेट खेळणारच नाही असं केलं नाही. १००%, ९०% यश आहे आनंद तितकाच आनंद ४०% २०% तही आहे.
जे मिळालं आहे ते घट्टपणे धरा नाहीतर तेलंही गेलं आणि तूपही गेलं अशी स्थिती होईल.
Failure हा शब्द श्रद्धावानांच्या आयुष्यात असूच शकत नाही. मोजायचं ते फक्त success मोजायचं मग ते १००, ९० की ५०. जो माझा आहे तो कधीच ५०% पेक्षा कमी असूच शकत नाही. Start wherever you are - तुम्हाला ५०% पासून सुरुवात करायची आहे. १०० पैकी थेअरीचे ५० मार्कस् तुम्हाला मिळाले आहेत. आमच्या जीवनात failure येऊच शकत नाही. Our progress start with 50%. माझी बाळं माझ्यावर कधीच फटके मारायची वेळ आणू देणार नाहीत.
॥ हरि ॐ ॥