॥ हरि ॐ ॥
आपण गुरुक्षेत्रम् मंत्र, त्यातील अंकुर मंत्र- त्यातलं ’ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:।’ हे पद बघतोय. हे सगळं विश्व ती उत्पन्न करते ज्याच्यापासून ते उत्पन्न करते त्या प्रणवाला तिनेच निर्माण केला आहे. म्हणून तिची सूत्रं, पवित्र चिन्हांची सूत्रं म्हणजे Algorithms बघत चाललो आहोत. त्याच्यावरून आपण तिची ओळख करून घेतो. जर अखिल विश्व तिने उत्पन्न केलं तर कुठल्याही प्रकारचं सायन्स कितीही advance झालं तरी ते तिच्या कक्षेतच असलं पाहिजे. आज आपण एका विश्वाचं रहस्य उलगडून बघणार आहोत. अति़शय सुंदर गोष्ट बघणार आहोत. गणित सगळ्यांना येत असतं, जे शाळेत गेलेले नाहीत त्यांना जितकं समजायचं आहे तितकं नक्कीच समजेल.
निसर्गात आपण परमेश्वराची शक्ती बघतो का? देव फक्त देवळातच दिसतो.
अनंतहस्ते कमलावराने देता घेशील किती दो कराने
तो अनंतहस्ते आपल्या जीवनात, सृष्टीत पण देत असतो.
निसर्गात अनेक सुंदर गोष्टी, चांगल्या गोष्टी सतत घडत असतात त्या घडतांना आपण स्वीकारतो का? स्वत:च्या जीवनात चत्मकार केव्हा घडतात, जेव्हा सृष्टीतले आम्ही न मागितलेले चमत्कार आपण स्वीकारतो तेव्हा.
कडकडीत उन्हात चालत असताना ढग आला आणि सावली मिळाली, वारा मिळाला की ‘ही सावली त्या आदिमातेची कृपा आहे, माझ्या सद्गुरुंचं माझ्यावरचं प्रेम आहे’ असं मला वाटतं का? ‘हा वारा म्हणजे पवनसुतच आला आहे’ असं आपल्याला वाटलं पाहिजे. आकाशात वीज लख्ख चमकते तेव्हा किती छान दिसते. वीज चमकते तेव्हा अंधारात मार्ग सापडतो. पण आपण कधी विचार करतो का आपल्याही जीवनात काळोख असताना अशीच वीज चमकलेली असते. ही आईची कृपा आहे, त्या परमात्म्याचं देणं आहे.
चालताना तुम्ही कुठचं पाऊल पुढे टाकता, मागचं पाऊल हे साधं उत्तर आहे. ही क्रिया आपोआप कशी घडते? हा balance नसेल तर मी चालू शकेन का? दोन डॊळ्यांनी वेगवेगळं पाहिलं तर ते विकृत होईल. हे संतुलन आवश्यक आहे. जगात सौंदर्य, सुख, शांती संतुलनात आहे. हा जो समतोल आहे, त्याला आपण harmony म्हणुया. आहारही संतुलित घ्यायला हवा. नवरा-बायकोचं भांडण होतं तेव्हा, आजी-आजोबांच्या काळापासून सगळं काढलं जातं. आपण एकमेकांवर जेवढे चिडचिड करतो तेवढंच एकमेकांवर प्रेम करतो का? पण प्रेम व्यक्त करताना, चांगलं करताना आपण तेवढ्याच intensity ने करतो का? हे संतुलन गमावतो म्हणून घरात शांती नांदत नाही. शांती कुठे विकत मिळत नाही, ती प्रयासाने मिळवावी लागते.
ही आदिमाता स्वत: कशी आहे - ‘या देवी सर्वभूतेषू मातॄरुपेण संस्थिता । नमस्तयै नमस्तयै नमस्तयै नमो नम:।’ आणि म्हणुनच सर्व निसर्गात अतिशय सुंदर harmony आहे.
आपण गणितात, physics मध्ये पाय बघतो -(π) ......... 22/7 ( π पाय म्हणजे २२/७) = ३.१४१२ हे समीकरण कसलं आहे. वर्तुळाच्या परिघाचं. वर्तुळाचा परिघ (circumference) भागिले व्यास (diameter).
परिघ (circumference) / व्यास = π = २२/७ = ३.१४१२
परिघाला व्यासाने भागलं की ती जी संख्या आहे ती π पाय म्हणजेच ३.१४१२ हा constant (नित्यांक) आहे. नित्यांक म्हणजे जो कधीच बदलत नाही तो. असे अनेक constants physics मध्ये आपण बघतो. कितीही प्रकारची, कशीही, कुठेही वर्तुळं काढा त्याच्यामध्ये हेच गुणोत्तर असणार आहे. सृष्टीमध्ये ह्याच्यात कुठलाही बदल होत नाही. π is always same.
हा पाय (π) हे ग्रीक भाषेतलं सोळावं अक्षर आहे. तर constant (नित्यांक) कुठेही वापरा, कुठलंही वर्तुळ घ्या उत्तर तेच राहणार आहे, ते बदलू शकणार नाही. म्हणजे मला ते बदलता येणार नाही. जे मनुष्य बदलू शकत नाही, ती त्याच्या कर्मस्वातंत्र्याच्या पलीकडची गोष्ट आहे. येथे मनुष्याचं कर्मस्वातंत्र्य शून्य. हे गुणोत्तर मनुष्य बदलू शकत नाही. अनेक जण पुस्तकात ..............phi (फाय) हे अक्षर वापरतात. हे ग्रीक भाषेतलं २१ वं अक्षर आहे. ह्या दोघांत बरीच तफावत आहे. ह्या दोघांत जबरदस्त मोठा फरक आहे. गुणधर्म सर्वस्वी वेगळे आहेत. ह्या दोघांत confusion होऊ देऊ नका कारण आपल्याला पावित्र्य हेच प्रमाण, हेच हवं आहे.
२२/७ हा आकडा कुठून आला? २२ आणि ७ कोठून आले? २२ च्या ऐवजी ४४ किंवा ११ वा ७ ऐवजी ३.५ का नाही? म्हणजे ११/३.५ किंवा ४४/१४ किंवा इतर कुठलाही अंक असू शकला असता. इथे आपल्या लक्षात आलं पाहिजे की नक्कीच काही रहस्य आहे.
एखादा श्लोक आठवतो का? रामदासस्वामींनी लिहीलेले मारूतीस्तोत्र
‘ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छें करुं शके।
तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥’
ब्रह्मांडाभोंवते म्हणजे अनेक ब्रह्मांडाभोंवते, वेढे म्हणजे एक नाही अनेक वेढे, वज्र म्हणजे जे अत्यंत कठीण आहे, पोलादापेक्षाही कठीण वेढा. अशा कठीण गोष्टीने वेढा कसा घालणार? वेढा घालण्यासाठी लागणारी वस्तू flexible / malleable असायला पाहिजे आणि वज्र flexible नाहीए. तरी रामदासस्वामीनीं म्हटलयं -
‘ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छें करूं शके।’
म्हणजे तो महाप्राण खरंच हे करू शकतो. वज्रासारखी कठीण असणारी शेपटी अख्ख्या ब्रह्माण्डाभोवती वेढे घालते. जो याज्ञवल्क्य आहे तोच रामदास आहे. त्याने ते बघितलंय म्हणून आम्हाला सांगतो. ब्रह्माण्ड जे सतत विस्तारतंय, जे प्रसरणशील आहे अशा ह्या सतत प्रसरण पावणार्या, विस्तारित पावणार्या ब्रह्माण्डाभोवती ह्या महाप्राणाच्या पुच्छाचा वेढा आहे. ह्याचं पुच्छ सतत वाढत राहतं म्हणून तो सहज ‘ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छें करुं शके।’ म्हणजेच ह्या समीकरणाचा आणि हनुमन्ताचा काहीतरी संबंध आहे. ब्रह्माण्ड लहान असलं तरी वेढे आहेत, आणि मोठं असलं तरी वेढे आहेत म्हणजेच ही गोष्ट constant आहे, कधीही बदलू शकत नाही. हा हनुमन्त constant आहे, त्याचे वेढेही constant आहेत. ही गोष्ट वर्तुळाशी निगडीत आहे.
वर्तुळाचा केन्द्रबिंदू म्हणजे काय? व्यास म्हणजे काय? ह्या सृष्टीचक्रात हे चिन्हं काय दाखवतं? हा जो केन्द्रबिंदु आहे तो केन्द्रबिंदु म्हणजे श्री म्हणजेच आदिमाता. तिच्यातूनच सगळं काही निर्माण होतं. हा जो तिचा पसारा आहे त्याभोवतीचं वर्तुळ म्हणजे हनुमन्ताचं पुच्छ (परिघ). मग हा व्यास म्हणजे काय? वर्तुळाचं परिघ म्हणजे हनुमन्ताचं पुच्छ आणि वर्तुळाच्या दोन बिंदुमधील maximum अंतर म्हणजे व्यास. मग व्यास म्हणजे काय? आठवा आठवा नीट आठवा आणि सांगा. आपल्याला देवाने बुद्धी दिलेली आहे म्हणजे काय? देव कसा असतो? हे जाणण्यासाठी. आपल्याला प्रत्येक गोष्ट बरोबर (right) लागते. म्हणजेच आपल्याला हवी असणारी गोष्ट चुकीची असू नये असं वाटत असतं. हा right angle म्हणजेच काटकोन - नव्वद अंशाचा कोन.
जेवढे जीवात्मे तेवढी ब्रह्माण्ड आणि प्रत्येकाचे ब्रह्माण्ड वेगळे. वर्तुळातले हे दोन बिंदू वर्तुळाच्या परिघावरील कुठल्याही बिंदूला जोडले की जो angle होतो तो नेहमीच right angle असतो, नव्वद अंशाचा कोन.
जेव्हा आपण आदिमातेच्या क्षेत्रात आलो आणि तो व्यास नीट ओळखला की सगळ्या गोष्टी काटेकोर होतात. आईच्या भोवती सगळं संतुलित आहे कारण परिघ स्वत: हनुमन्त काढतोय.
हनुमन्त म्हणजेच प्रथम पुत्र दत्तात्रेय शुभ्र प्रकाश.
आपलं सगळं काटकोनासारखं होतं. काटकोन म्हणजे काटेकोरपणे आपल्या जीवनातल्या चांगल्या गोष्टी चांगलंही काटकोनात म्हणजे काटेकोर हवं असतं आणि नको असलेलंही काटेकोर नको असतं. आपल्या जीवनातला व्यास नीट सांभाळला की त्याचा right angle (काटकोन) तयार होतो. पसारा कितीही विस्तारत गेला तरी व्यास परिघाबाहेर जात नाही, मग व्यास म्हणजे काय?
आईच्या परिघावरील दोन विरुद्ध टोकाच्या बिंदूंना एकत्र आणणारा व्यास म्हणजे काय? एकाच वेळी दोन विरुद्ध गोष्टींना एकत्र आणणारा व्यास म्हणजे त्रिविक्रम! त्रिविक्रम म्हणजे हरि-हर यांचे एकत्रित स्वरूप. त्रिविक्रम म्हणजे राम आणि हनुमन्त. म्हणून सुखसावर्णी त्याच्यासमोर व्हावी लागते. तो एकाच क्षणाला शौर्य दाखवून क्षमा दाखवतो. त्याने तलावारीने कापलं तरी ते सुखकारकच असतं, वेदना देणार नसतं. मात्र आमचा त्याच्यावर ठाम विश्वास असावा लागतो. परिघ हा वैदिक गणितातही असतो. मनुष्याच्या शरीरात आदिमाता कुठे राहते - मूलाधार चक्रात - महाकुण्डलिनी स्वरूपात सुप्तावस्थेत राहते. साडेतीन वेटोळे घालून ती असते.घाबरू नका उत्तर द्या. माझ्या बाळांपेक्षा एक मार्क कमी मिळेल एवढीच प्रश्नपत्रिका मी सोडवतो आणि आपल्या बाळाला पास करण्यासाठी तिला आधीच्यांना पास करावेच लागते. तुम्ही सगळ्यात ढ असाल तर तुमच्यापेक्षा मी ढ आहे.
शरीरातील नऊ चक्रांपैकी सात active आहेत आणि दोन सुप्तावस्थेत आहेत. प्रत्येक चक्रात तीन वेढे आहेत. एकंदरित वेढे (७ x ३) एकवीस आहेत. ॐ काराची अर्धमात्रा ही नित्य आहे. ही अर्धमात्रा म्हणजेच आदिमातेचं origional स्वरूप. निर्गुण निराकार म्हणून जगाला न कळणारे आणि सगुणसाकार म्हणून सगळ्यांना दिसणारे. ७ x ३ = २१ + १ (मूळ नित्य रूप) = २२.
तीन स्वरूपं म्हणजे महालक्ष्मी (सत्त्वगुण), महासरस्वती (दैवी रजोगुण), महाकाली (दैवी तमोगुण). ह्या प्रत्येक चक्रात ती वेगवेगळ्य़ा नावाने, वेगवेगळी शस्त्रे-आभूषणे धारण करून असते. सत्त्वगुण, दैवी तमोगुण, दैवी रजोगुण अशा तीनही रूपांनी ती सांभाळते. आदिमातेचं मूळ स्वरूप पहिलं नंतर बाकीची २१.
२२/७ मग हा सात आकडा कुठून आला? त्रिविक्रम तीन पावलं चालतो. मग सात हा आकडा कुठून आला?
थोडा विचार करा. तुमच्या खांद्यावर फक्त तुमचंच डोकं असावं म्हणून मी हे प्रश्न विचारतो. कारण आपली बुद्धी तल्लख असायला पाहिजे. विचार करण्याची क्षमता गमवायची नाही. मुंबईत आहात तर गुरुक्षेत्रम्ला महिन्यातून एकदा तरी या. ही संधी घालवू नका.गुरुक्षेत्रम् सर्वात पवित्रक्षेत्र आहे. तिथे आपण आत गेल्यावर काय पाहतो तर चण्डिकाकुलाचा फोटो आहे. त्यात कोण-कोण आहेत. आदिमाता, तिच्या चरणापाशी देवीसिंह, दत्तात्रेय, हनुमन्त, किरातरुद्र, शिवगंगागौरी आहेत. हे सगळे मिळून सहाच गोष्टी आहेत मग सात हा आकडा कुठून आला. गणपती म्हणजे चण्डिकाकुलाचा प्रत्येक बिन्दू आणि स्कंद म्हणजे पूर्णाकृती. सात आकडा म्हणजे उपनिषदामध्ये सांगितले गेलेले सप्तप्रदेश आहेत. मंगलस्थाने १८ आणि यात्रेचे सप्तप्रदेश आहेत. ह्या प्रदेशांची नांवे आठवतात का? म्हणजे त्रिविक्रम परशुराम, नित्यगुरुंना बरोबर घेऊन उत्तम, मध्यम, विगत आदिमातेच्या सप्तप्रदेशात जातो. हा सात आकडा सप्त प्रदेशाचा आहे. ह्या प्रत्येक प्रदेशात १८ मंगलस्थाने आहेत. ज्याला आपलं जीवन सुंदर करायचं आहे त्या प्रत्येकासाठी ही तीर्थयात्रा आहे. ही तीर्थयात्रा त्रिविक्रमाने केलेली आहे त्याचेच हे सामर्थ्य आहे. तो विगतालाही अर्ध्या कष्टात उत्तम आणि मध्यम सोबत घेऊन येतो. डोळ्य़ावर पट्टी बांधून आणतो म्हणजे चालण्याची जबाबदारीही त्याची नसते. आम्ही कितीही पापी असलो तरी तो आपल्यासाठी आपल्या आईला पाठवून देतो. डोळ्यावर पट्टी बांधणं म्हणजे कुठे जायचं, कसं जायचं ह्याची जबाबदारी आपल्यावर राहत नाही.
३.१४१२ हा नित्यांक असा आहे, श्रद्धावानाने एकदा का गुरुक्षेत्रम्ची कास धरली आहे, आदिमाता आणि तिच्या पुत्रांची कास धरली की त्याची ती यात्रा पूर्ण होणारच. फक्त प्रेमाने चण्डिका आई, तिचे पुत्र ह्यांच्यावरील प्रेमाने जीवन सुंदर करायचं. कुठेही गेलात तरी हा पाय (π) आहेच. भारतात हा पाय (π) कुठल्या चिन्हाने दाखवायचे - त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्हाने. हे चिन्ह त्या नित्यांकाची खूण आहे. परमात्म्याची तीन रुपं आणि त्यांचं एकत्रित स्वरूप ही आहे. अशी विद्या जी कधीच थांबू शकत नाही अशी अनिरुद्ध विद्या. जेव्हा मी हे चिन्ह गळ्यात घालतो तेव्हा हा आम्ही भौतिक स्वरूपात हा constant (नित्यांक) बरोबर बाळगत असतो. ही चिन्ह सातही पातळ्यांवर तीनही रुपात आहेत.
गुरुक्षेत्रम् सारख्या सुंदर स्थानाला महिन्यातून एकदा जाण्यालासुद्धा वेळ नाही. एवढे तुम्ही बिझी झालात काय. आपल्या संपूर्ण जीवनाला, विश्वाच्या प्रवासाला व्यापून उरणारा नित्यांक म्हणजे त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्ह. परिघाचं व्यासाशी असणार नातं. त्रिविक्रमाच्या यात्रेची फलश्रुती म्हणजे सामीप्य. तो जिथे आहे तिथे कधी पीडा, त्रास असूच शकत नाही. कुठलीही कृती नुसती करण्यापेक्षा त्याचं तत्त्व जाणून घेतलं तर आपण ती प्रेमाने करतो. त्याची स्मृती अधिक चांगली होते आणि सायन्सचं reason कळलं तर बुद्धी त्याला पकडून ठेवेल. निसर्गाचं हे गुणोत्तर ठायी-ठायी ठरलेलं आहे.
॥ हरि ॐ॥