॥ हरि ॐ ॥
ॐ मंत्राय नम:। श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र - ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:। algorithms म्हणजे गणित उचित प्रकारे सोडवण्याची पद्धती. गणितं किती प्रकारची असतात? आपण आयुष्यात किती गणितं सोडवलीत? यशस्वीरित्या सोडवलीत? ह्या प्रश्नाचं खूप कमी उत्तर येईल. प्रश्न-कोडी अनेक पडतील. गणित सोडवताना आज सापडलेलं उत्तर बरोबर आणि चांगलं आलं, ते पुढे बरोबर आणि चांगलं असेलच असं नाही. मग पुन्हा हरि ॐ, परत सुरुवात करायची. पण बरेचदा मनुष्याला आयुष्यात प्रत्येक गोष्ट नव्याने करता येत नाही. संधी प्रचंड उपलब्ध आहेत. समजा ५०व्या वर्षी शाळेत तुम्हाला admission घ्यायचं आहे. तुम्हाला शिक्षण घ्यायची संधी मिळेल पण लहान वयात के.जी. मध्ये बसून शिक्षण घेण्याचं जे feeling होतं, तेच ५० व्या वर्षी असेल का? नाही येणार. भूक लागलेली नाहीये आणि तुम्ही जेवायला बसलात, तर तुम्ही किती खाऊ शकणार? नाही खाऊ शकणार. प्रचंड भूक लागलेली आहे आणि तुम्हाला कोणी गाणं गायला सांगितलं तर तुम्हाला गाता येईल का? नाही येणार.
प्रत्येक गोष्टीची स्वत:ची अशी वेळ असते. ती गोष्ट वेळच्या वेळी करण्यात खूप सौंदर्य असतं, सहजता असते. सगळेच प्रश्न गणितं असतात का? हाही विचार केला पाहिजे. समजा एका मुलासाठी चार मुली सांगून आल्या आहेत. ह्या चौघींमधून निवड करणे हे गणित आहे असं मानलं तर, पहिल्यांदा हुंड्यावरून मार्कस् दिले गेले, नंतर दिसण्यावरून मार्कस् दिले गेले, नंतर education वरून मार्कस् दिले गेले. अशा प्रकारे मार्कस् देऊन बायको निवडता येईल का? ही गणितं अशी सोडवली जातात का? तर नाही.
बापू, आमच्या जीवनात algorithm तुम्ही सांगता ते आम्हाला समजतात, आम्ही ते उतरवायला ही बघतो पण जीवनातलं गणित म्हणजे काय? प्रश्न म्हणजे गणित आहे काय?
जगातला कुठलाही प्रश्न हा गणितच असतो, पण ते गणित आहे हे आपल्याला समजत नाही.
मला काय हवंय?
माझी स्वत:ची लायकी काय?
आणि माझ्या जीवनाची गरज काय?
म्हणजे मला सुखाने जगण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? या तीन गोष्टींवर विचार करून महत्वाचे मुद्दे काढून ते एक एक tally करणं महत्वाचं असतं. दहापैकी किमान पाच तरी जुळलेच पाहिजेत तर त्याला अर्थ आहे.
एस.एस.सी. किंवा १२ वीत चार विषय आहेत, प्रत्येक विषयाला दोन तास द्यायचे ठरवलेत. एखादा टॉपिक तीन तासात पूर्ण होईल, दुसर्या टॉपिकला एक तास लागेल. तीन तास लागणार्या विषयाला दोन तासच दिले तर अभ्यास नीट होईल का? ही गणितं सोडवण्याची पद्धत नाहीये.
आम्हाला गणितं सोडवण्याची पद्धत माहीत असली पाहिजे. नाहीतर गणित गणितच उरत नाही तर तो मूर्खपणा किंवा काथ्याकूट बनतो.
स्त्रीला एक साडी घ्यायला किती वेळ लागतो? आणि पुरुषांला एक शर्ट घ्यायला किती वेळ लागतो? असं का होतं? पुरुष शर्ट-पॅन्ट घेताना काय बघतो? त्याचं टेक्श्चर, मटेरियल, रंग बस्स ! हे सगळं बघूनच तो घेतो. पण स्त्री साडी घेताना काय बघते? तर साडीचा रंग, बॉर्डरचा रंग, डिझाईन, साडी पूर्ण भरलेली आहे का, साडीचा पदर, साडीचं मटेरियल, बजेट हे सगळं तिला बघायचं असतं. पण आणखी काही ती बघत असते. महत्त्वाचा मुद्दा काय बघायचा तर प्रत्येक बाई ही साडी मला कशी दिसेल? ह्याचा नीट विचार करते आणि तो आवश्यकही असतो. हा विचार करून जी स्त्री खरेदी करते तिच्या पैशांचं चीज होतं. त्याच्यामुळेच तिला जास्त वेळ लागतो. शिवाय ती साडी तिच्या जवळ असणार्या दागिन्यांवरही सूट होईल का हाही प्रश्न असतो. बजेटमध्ये बसणारी हवी असते.
म्हणजे काय ही सगळी पारख केली जाते. हे गणित आहे. तिच्याकडे सगळे मुद्दे तयार असतात. स्त्री असो की पुरुष असो, आपण एवढेच चोखंदळ असलं पाहिजे. हे अत्यंत आवश्यक आहे. चोखंदळपणा म्हणजे जे right, bestest, उचित आहे आणि जे माझ्या capacity मध्ये आहे त्याच्याबद्दल आपण आग्रही असणं. हा चोखंदळपणा जीवनात महत्त्वाच्या गोष्टीत तरी आपण दाखवतो का? हो बापू, ब्लॉक घेताना, नोकरी शोधताना आम्ही चोखंदळपणा दाखवला.
शाळेत असताना समतोल आहार शिकवला जातो, Carbohydrates, Proteins म्हणजे प्रथिनं हे सारे शिकवले जाते.
Calculation and Mathematics म्हणजे गणित आणि हिशोब ह्यात खूप मोठा फरक आहे, खूप मोठे अंतर आहे. आपल्या जीवनातले प्रश्न सोडविण्यासाठी हिशोब नाही तर गणित आवश्यक आहे. हिशोबात १ + १ = २ होतात, तर जीवनातल्या हिशोबात १ + १ =२ हे उत्तर बरोबर नाही. १ + १=१ पण असेल, १० पण असेल, ११,२१,५६ पण असेल. १ पती आणि १ पत्नी बरोबर जेवढी मुलं होतील तेवढी. आमच्या काळी १२-१२ मुलं असायची. तसंच १ चांगला विद्यार्थी + १ चांगला शिक्षक ह्याचं उत्तर काय येईल? तर दोन चांगले विद्यार्थी आणि दोन चांगले शिक्षक. दोन अधिक चांगले शिक्षक आणि विद्यार्थी, दोन अधिक उत्कृष्ट शिक्षक आणि विद्यार्थी. चांगला शिक्षक मिळाल्यावर विद्यार्थी चांगला बनत जातो. म्हणून ही Algorithms, जीवनाची गणितं सोडवण्याचं काम तिचं आहे. हे आतून कळतं. कोणी कितीही म्हटलं देवाचा आवाज मला ऐकू येतो, हे असं काही ऐकलं की जमत असेल तर सरळ त्याच्या कानाखाली वाजवायची, जमेत नसेल, त्यात interest नसेल तर सरळ आपले कान बंद करायचे. देव असा कोणाच्या कानात खुसपूस करत नाही. तिला आणि तिच्या मुलाला ह्याची गरज वाटत नाही. कोणालाही तिच्या मुलांचा आणि तिचा व्यक्तीश: आवाज ऐकू येणार नाही, पण आतून guideline नक्कीच मिळते. मला जे वाटतं ती आमची feelings असतात, स्वत:च्या इच्छा असतात, भावना असतात.
इथे Personality आणि Individuality हे शब्द महत्त्वाचे आहेत. Personality म्हणजे व्यक्तिमत्त्व आणि Individuality म्हणजे एक स्वतंत्र/ वेगळी व्यक्ती. प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तिपेक्षा वेगळी आहे. त्या व्यक्तीचं वेगळेपण, स्वभाव म्हणजे Personality. Individuality म्हणजे त्या व्यक्तीच व्यक्तित्व. स्वभावातूनच व्यक्तिमत्व घडत असतं म्हणजे personality म्हणजे व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्वाच्या मागे दडलेलं व्यक्तित्व म्हणजे त्याची speciality त्याचं वेगळेपण म्हणजेच Individuality.
व्यक्तिमत्व दाखवू शकता पण एखाद्या व्यक्तिचं व्यक्तित्व शोधण्याचा प्रयत्न केला तरी शोधू शकत नाही. व्यक्तिमत्व फसवं असतं, तर व्यक्तित्व खरं असतं. Personality चांगली किंवा वाईट असू शकते. पण व्यक्तित्व चांगलंच असतं. स्वभाव वाईट असू शकतो. मनुष्य कितीही पापी किंवा पुण्यवान असो त्याचं व्यक्तित्व चांगलंच असतं. कारण ते तिच्या पुत्राने आणि तीने बनवलेलं असतं. आमच्या व्यक्तित्वातला सद्गुण हा त्या आदिमातेनं फिट केलेला असतो.
ह्याच्यासंबंधित सुचितदादांच्या आईचं आणि वडिलांचं उदाहरण देतो. काकांचं व्यक्तिमत्व कसं होतं तर प्रसन्न, रसिक स्वभाव, कर्तव्यनिष्ठ साईभक्त ही त्यांची personality, स्वभाव होता. त्यांच व्यक्तित्व म्हणजे ते एकनिष्ठ आहेत, आपल्या देवाशी, मुलांशी, पत्नीशी, कामाशी. हा गुणधर्म देवाने बहाल केलेला गुणधर्म त्यांनी पूर्णपणे वापरला. ते best पती झाले, best पिता झाले, भाऊ, सासरे, भक्त, आणि संतही ठरले. त्यांनी त्यांची individuality त्यांची निष्ठा पूर्णपणे पाळली.
सुचितदादांच्या आईचा स्वभाव मवाळ होता. माशीलाही हड म्हणणार नाही. प्रत्येक गोष्टीत स्वत:चं मत मागे. पूर्णपणे पतीनिष्ठ होती. कोणाचा मत्सर, द्वेष करायचा नाही. प्रत्येक गोष्ट करायची त्यात सेन्टर पति आणि पुत्रच होते. नवर्याची मुलांची सेवा करायची. प्रेमळ, कर्तव्यदक्ष, प्रापंचिक गृहिणी ही तिची personality होती. त्यांच्या व्यक्तित्वात ठामपणा, दृढनिश्चयता होती. माझी आई खूप लहानपणी गेली, माझ्या मुलांना त्यांची आई मिळूदेत काकांनी फक्त इच्छा व्यक्त केली. माझ्या पतीची इच्छा आहे, तिने पटकन नोकरी सोडली व घरात बसली. देवाने तिला ठामपणा दिला होता. ती personality मध्ये मृदु वाटते. अतिशय मृदु बोलणारी ही किती ठाम, strong असू शकते. पतीला / मुलांना चहाची आवड आहे म्हणून ती पंधरा-पंधरा वेळासुद्धा चहा करायची.
काका गेल्यावर मी (परम पूज्य बापू) आणि ती दोघंच होतो. माऊलीने आक्रोश केला नाही. मी काय करू? राहू नाही शकत पण देवाने ठेवलंय मग रहायला तर पाहिजे.
बापू :काका नोकरीला जायचे तेव्हा काय करायचीस?
आई (सुचितदादांची आई) : त्यांची वाट पहात दिवसभर काम करीत रहायचे.
बापू : वेळ येईल तेव्हा तुलाच ऑफिसला जायचंय.
आई : माझी वेळ आली की मला अडवू नका.
जुईनगरला समाधी सोहळा होता. तेव्हा ही माऊली उठली, माझी वेळ आली, मला आता जायचंय, मला अडवू नका. दादांच्या पायाखालची जमीन सरकली.
शरण जाताना ठामपणे शरण जा. शरण जाण्यात ठामपणा हवा. अगतिकपणे शरण जाऊ नका. ह्याला शरण जाताना हा विश्वास ठेवा की ह्याला शरण जाण्यातच माझं भलं आहे.
प्रत्येकाला एकच गुण परमेश्वराने दिलेला असतो. तो वापरायचा कारण तो परमेश्वरी गुण असतो. तो वापरला गेला की, होणार्या सार्या चुका तोच दुरूस्त करतो. बाकीच्या गोष्टी आपोआप घडतात. सगळी गणितं तुमच्या बरोबरच येतात. सगळ्या चुकीच्या गोष्टी आपोआप सुधारतात. लाईट आला की, फ्रिज, टी.व्ही. कसे आपोआप लागतात. परमेश्वराने मला बहाल केलेलं व्यक्तित्व जागृत ठेवून, कार्यरत होणं महत्वाचं आहे. पण आमचं व्यक्तित्व कार्यरत होत नाही कारण व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व ह्यांत आपण ब्रीज बांधत नाही. हे connection कोण जोडू शकतं? हा bridge कोण बांधू शकतो? आनंदाने जीवन जगण्यासाठी जो गुण आवश्यक आहे तो गुण म्हणजेच व्यक्तित्व. आम्हाला आमचं व्यक्तित्व काय आहे हे कसं कळणार? आमच्या व्यक्तित्वाचा कोणता गुण आहे हे कसं कळणार? प्रत्येकाचं व्यक्तित्व काय आहे हे तिला आणि तिच्या पुत्रालाच माहित असतं. कोणाचं connection कुठे जोडायचं हे त्यांना माहीत असतं.
व्यक्तित्व जे आहे ते सुंदर आहे. माझ्या पूर्व कर्मानुसार मला माझ्या प्रगतीसाठी, जीवनविकासासाठी आवश्यक असणारं, दोन जन्माचं पाप-पुण्य सहन करण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी देणारा गुणधर्म म्हणजे व्यक्तित्व. व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व जोडणं महत्त्वाचं काम आहे. हे जोडण्याचा मार्ग म्हणजे तीन महावाक्यं आहेत म्हणजेच algorithms आहेत. हा ब्रीज तीन वाक्यांचा आहे. ही वाक्यं जीवनात रुजली पाहिजेत, पसरली पाहिजेत, विस्तारली पाहिजेत आणि आपल्या जीवनापेक्षा मोठी झाली पाहिजेत.
पहिलं वाक्य आहे - "माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहते”. हे वाक्य ऐकणं म्हणजे एक तृतीयांश काम झालं.
दुसर वाक्य आहे - एक विश्वास असावा पुरता । कर्ता हर्ता गुरु ऐसा ॥
तिसरं आणि महत्त्वाचं वाक्य आहे. “हे मायबाप, गुरु सर्वकाही तुमच्या इच्छेनुसार होवो”.
मातृदेवो भव । पितृ देवो भव । आचार्य देवो भव । हा तो भाव आहे.
त्याला निमंत्रण करा. इथे माय-बाप-गुरु वेगवेगळेही आहेत आणि एक ही आहेत.
माय म्हणजे चण्डिका आई-मोठी आई, The Ultimate Mother.
तात म्हणजे,
कहेहु तात अस मोर प्रनामा । सब प्रकार प्रभु पूरनकामा ॥
दीन दयाल बिरिदु संभारी । हरहु नाथ मम संकट भारी ॥
तिचा जेष्ठ पुत्र असणारा दत्तात्रेय-हनुमंत भक्तीमार्गावरील आधारस्तंभ पिता आहे.
गुरु म्हणजे चण्डिकेचा तृतीय पुत्र परमात्मा.
हे तिघेही जण एकाच वेळेस simultaneously present every where. एकाच वेळी ते एकत्र असतात. They present simultaneously. घडलं तर असंच घडतं, नाही तर नाही. All OR None Phenomenon. They are constantly together. एकाच समयाला एकत्र.
हे तिघंही जण तुमच्या जीवनात एकाच वेळेस असतात. Their movements, presence, functions are simultaneous. त्यांचं कार्य, उपस्थिती, तुमची काळजी घेणं हे एकत्रित आहे. चण्डिकाकुल एकाच वेळेस उपस्थित असतंच. जेव्हा तुम्ही एकाला हाक मारता तेव्हा सगळेच्या सगळे तिथे हजर असतातच. ही तीन वाक्य आयुष्यात मनोभावाने घ्या.
I Love You My Dad always and You are always present with Your Mother with me. हे वाक्य algorithm explain करणारं वाक्य आहे.
बाबा, माझं तुमच्यावर खू SSS प प्रेम आहे आणि तुम्ही तुमच्या आईबरोबर माझ्या जीवनात सदैव राहता.
फोटो किंवा लॉकेटमध्ये नव्हे तर जिवंत रूपात.
पहिलं वाक्य म्हणजे आईचं प्रेम आहे. दुसरं वाक्य म्हणजे त्या आईवर-चण्डिकाकुलावर आपलं आपण प्रेम आणि विश्वास व्यक्त करतो. आणि तिसरं वाक्य म्हणजे I Love You My Dad always and You are always present with Your Mother with me. with me हे विसरून चालणार नाही.
जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती । चालवीसी हाती धरुनिया ।
होणार तर तसंच होईल ही माझी Guarantee आहे. I Am Alive मी जिवंतपणे तुमच्याबरोबर आहे. ही ग्वाही चण्डिकाकुल देतंय. केवळ भाव, मूर्ती, कुबडी बनून नाही, तर जिवंतपणे तुमच्याबरोबर आहे.
हे algorithm महत्त्वाचे आहे. ह्यामुळे जी Individuality आम्हाला दिली आहे, जो bestest गुण दिलायं तो कार्य करायला सुरुवात करेल. पण उपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे विश्वास महत्वाचा आहे. उपासना, मंत्र ही सगळी साधनं आहेत.
पहिलं वाक्य - "माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहते". ती असं म्हणत नाही की तुम्ही चांगले असाल तर मी तुमच्यावर प्रेम करेन. हा तिचा तुमच्यावरचा विश्वास आहे. ही माझी बाळंच आहेत. चुकलीत तरी ही माझीच बाळं आहेत.
दुसरं वाक्य - एक विश्वास असावा पुरता । कर्ता हर्ता गुरु ऐसा ॥ जे काय चांगलं करणार आहे ते तोच करणार आहे. जर माझ्यावर आलेलं संकट तो टाळू शकत नाही, तर कोणीही टाळू शकत नाही. त्याने हे संकट टाळलं नाही म्हणजे हे संकट येणं आवश्यक होतं. ते आलं नसतं तर खूप गोंधळ झाला असता.
तिसरं वाक्य - हे मायबाप गुरु सर्वकाही तुमच्या इच्छेनुसार होवो. मग ठामपणे म्हणायचं - I Love You My Dad always and You are always present with Your Mother with me.
बाबा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही तुमच्या आईबरोबर माझ्या जीवनात सदैव राहता.
ही तीन वाक्य म्हणजे तुमचं व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व ह्यांना बांधणारा ब्रीज. व्यक्तित्व म्हणजे एकच गुण असा असतो जो सगळ्या गुणांना भारी पडतो. त्या-त्या व्यक्तीच्या प्रारब्धानुसार ह्या जीवनात काय-काय गणितं सोडवायची आहेत. त्याचं साधन म्हणजे व्यक्तित्व. जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमचं व्यक्तित्व देऊ शकतं.
चण्डिकाकुल अनेकवेळा निमंत्रणाशिवाय काम करतात. हा महत्वाचा algorithm लक्षात ठेवा. त्रिविक्रमाची तीन पावलं म्हणजे ही तीन महावाक्यं. ह्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की, त्रिविक्रमाबद्दल काही महत्वाचं सांगणार आहे. ते हेच आहे. त्रिविक्रमाच्या तीन पावलांची पाच-सहा उदाहरणं दिली आहेत, हे सातवं आणि महत्वाचं आहे.
त्रिविक्रमाची पावलं आपल्या तीनही लोकांत कार्य करतात. आमचे तीन लोक म्हणजे आमचे प्राणमय, मनोमय, स्थूल शरीर. आमचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ.
चण्डिका आणि तिचे पुत्र कधीही कोणालाही फसवत नाहीत. कोणाचंही दु:ख/ वाईट त्यांना पाहवत नाही. ही वाक्यं मनात, बुद्धीत, वापरात उतरली पाहिजेत. मला भीती वाटते म्हणजे मी भित्रा होत नाही. मला चांगले मार्कस् मिळत नाहीत म्हणजे मी फालतू आहे असं होऊ शकत नाही. आम्ही माणूस आहोत, चुका असणार. भीत्या असणार. मनातनं सगळं काढून टाका.
तुमचा चण्डिका आईवर आणि तिच्या पुत्रांवर विश्वास हवा. हनुमंत सेतू बांधण्यात expert आहे. तिने विश्व उत्पन्न केलं, तिचा पुत्र ॐ कार रूपाने सर्वत्र व्यापलेला आहे. गुरु म्हणून हृदयस्थ आहे. आम्ही चुकीचं वागतो म्हणून आम्हाला भीती वाटते. लहान बाळाची शी-सू आई-बाप काढतात आणि मुलं मोठी झाल्यावर तेच आई-बाप सांगताता नं दरवाजा लावून घे म्हणून. तुमचा तुमच्या बापावर विश्वास असेल तर तो पापाकडे चुका म्हणून बघतो. तो समर्थ बाप आहे. तुम्ही त्याला आमंत्रण दिलं नाही तरी त्याला सगळं कळतं.
कुठेही असा, काहीही करा । इतके मात्र सदैव स्मरा ।
तुमच्या कृतीच्या इत्यंभूत खबरा । मज निरंतरा लागती ॥
हे साईनाथांचं वाक्य कधीच विसरू नका. ही वाक्यं जीवनात घट्ट धरून चालायचं. नाही धरलीत तर पहिलं प्रेमाने समजवीन, नंतर ओरडून सांगेन, तरी नाही कळलं तर कानाखाली खेचेन. पण ती वेळच येऊ देऊ नका. पण कानाखाली प्रेमाने खाल्ली तर जी मजा येईल ती मजा एकदा तरी अनुभवावी. आईने दिलेला मार किती सुखद, गोड वाटतो. ते प्रेम जिवंत असतं. आईचा मार = जिवंत प्रेम
गजर :
जय जगदंब । जय जगदंब । जय जगदंब । जय दुर्गे ॥
ह्या गजराच्या प्रत्येक वाक्याबरोबर तुम्ही कुठेही असाल तिथे मी तुमच्याबरोबर गातही असणार, नाचतही असणार. हा गजर कधीही कुठेही ह्या तीन महावाक्यांबरोबर algorithm बरोबर निरंतर चालू ठेवा.
॥ हरि ॐ ॥