॥ हरि ॐ ॥
‘ॐ मंत्राय नम:।’ विष्णुसहस्रनामावलीतील अतिशय सुंदर नाम आपण बघतोय. त्यात आपण बीजमंत्र बघितलेत. आता अंकुरमंत्रामध्ये ‘ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:।’ हे पद बघतोय. ह्या महिषासुरमर्दिनीने, या दुर्गेनेच सगळं उत्पन्न केलं, पहिल्यांदा उत्पन्न होणारी, पहिल्यांदा प्रसवणारी तीच. हे एकमेव दैवत असं आहे, जिचं नाव तिच्या शत्रूच्या नावावरून येतं, तिचं मूळ नाव तिच्या शत्रूच्या नावावरून आहे. तरल अवस्थेमध्ये ती गायत्री आहे, सूक्ष्म अवस्थेमध्ये ती महिषासुरमर्दिनी आहे, स्थूल अवस्थेमध्ये ती अनसूया म्हणून वावरली आणि वावरतेय. ह्या तिघी जणी वेगवेगळ्या असल्यातरी एकच आहेत. बापू, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ह्या तिघी वेगवेगळया उभ्या असलेल्या आम्ही प्रसन्नोत्सवात बघितल्या आहेत. ही तीनही रूपं वेगवेगळी आहेत.
बाळाला खाऊ घालते, न्हाऊ घालणारी माता ती अनसूया, त्याच बाळाला कोणी मारायला आले तर बाळाच्या शत्रुवर हल्ला करणारी माता म्हणजे महाकाली, ह्या दोघीही एकच आहेत. हे कळतं पण वळत नाही. जे दिसतं तेच बरोबर आहे असं वाटतं. कानापेक्षा डोळ्यांवर विश्वास ठेवावा. काना-डोळ्यामध्ये अंतर असतं. पण विज्ञानाच्या युगात तर डोळ्यांनी पाहण्यावरही विश्वास कसा ठेवायचा?
दत्तगुरु, दत्तात्रेय हे एकच आहेत. एका स्त्रीचे वडील त्याच स्त्रीच्या पोटी मुलगा म्हणून जन्माला आले. दत्तगुरु - चण्डिका - दत्तात्रेय तेच नातं आहे. आजोबा आजोबा म्हणून मान आहेच, तोच मुलगा म्हणून प्रेमही आहे.
महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी ह्या तिघींची रूपं वेगळी असली तरी त्या एकच आहेत.
जल म्हणजे पाणी त्या पाण्याची वाफ बनते. त्यामधूनच बर्फ बनतो. ह्या तिघांची केमेस्ट्री H2O च आहे. तिघांचं Chemical Analysis केलं तर H2O च मिळणार, म्हणजे त्यांचं मूळ रूप काय तर - H2O. पाणी असो, बर्फ असो की वाफ असो. पाणी हे मूळ रूप मुळीच नाही. पाणी वाफेतून निर्माण होतं. मग आधी काय? तर H2O. जगात वावरताना बर्फ जे काम करतो ते काम वाफ करेल का? जे काम वाफ करू शकते ते बर्फ करेल का? बर्फ, पाणी, वाफ ह्यांच केमिकल एकच असलं तरी प्रत्येकजण भिन्न आहे. वाफेला गोठवल्यावर बर्फ होतो. ह्या तिघांचं कार्य वेगळं असलं तरी त्यांचं मूळ रूप एकच आहे. त्याचप्रमाणे तिघींची कार्य वेगवेगळी असली तरी, ती एकच आहे.
पाण्याचा बर्फ, बर्फापासून पाणी, पाण्याची वाफ हे माणूससुद्धा करू शकतो. Yes we can. तो हनुमन्त, दत्तात्रेय, आदिमाता, दत्तगुरु हे सगळे एकच आहेत. संपूर्ण चण्डिकाकुल एकच आहे. कारण ते एकाच मटेरियलने बनलेले आहेत. त्यामुळे एकाला आवाहन केलं तरी सगळे येतात. आम्हाला वेगवेगळी connections जोडण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळ्यांची स्तोत्रं प्रेमाने म्हणू, जे रूप जास्त आवडतं त्याचं आवाहनही करू. पण आदिमाता, दत्तात्रेय, परमात्मा, हनुमन्त ह्यांच्यातल्या कोणा एकालाही अमान्य केलं तर केलेली पूजा इतर कोणालाही पोहचत नाही. पूजन एकाचं केलं तरीही, चण्डिकाकुलातील बाकीचे मान्य असले पाहिजेत. विश्वास सगळ्या कुलावर असला पाहिजे. कोणाला एकालाही वगळलं तरी उपासना फळणार नाही.
आदिमाता ही Head of The Family आहे आणि तिच्या कुटुंबातला प्रत्येक जण माझा आप्त आहे हा विश्वास असेल तर, एकाशी connection जोडलं की सर्वांशीच प्रेमाने घट्ट बांधले जाता, सगळ्यांशी आपोआप connection जोडलं जातं. ह्यांच कुलं आहे. कुल म्हणजे एकमेकांशी घट्टपणे बांधलेल आहे. ज्यांचा शब्द एकमेकांना अनुकूल आहे. तो एकमेकांसाठी अनुरूप आहेत. म्हणून ह्यातल्या प्रत्येकाची कार्यपद्धती आमच्यासाठी वेगळी आहे कारण आम्ही मानव कर्मस्वातंत्र्यामुळे जे काही उद्योग करतो ते निस्तरण्यासाठी त्यांना प्रत्येकासाठी वेगळा मार्ग काढावा लागतो.
हे कुल आहे, संकुल आहे. संकुल म्हणजे colony. एकमेकांपासून वेगळे असूनही अविभक्त (एकत्र असणारी) अद्भुत एकमेवाद्वितीय family आहे. हा विश्वास ठेवू तेव्हाच आपलं connection चण्डिकाकुलातील सगळ्यांशी आपोआप जोडलं जाईल.
आम्हाला जीवनात सुखं हवं असतं, दु:ख नको असतं. दु:ख, प्रारब्ध कर्मानुसार येतं. दु:ख म्हणजे काय? वेदना होते ते दु:ख आहे, पैशाला loss, प्रिय व्यक्तीचा विरह, हे सगळं दु:ख आहे. नानाविध प्रकारची दु:ख आहेत. म्हणून सगळ्या दु:खांवर, अडचणींवर, संकटांवर मात करण्यासाठी मनुष्य प्रयास करीत राहतो. ह्या प्रयासालाच पुरुषार्थ म्हणतात. आपल्या जीवनाचा विकास करण्यासाठी जे काही करतो तो पुरुषार्थ आहे.
जे कमी आहे ते अधिक करण्यासाठी, जे चुकीचं वाढलेलं आहे, व्यर्थ - अनावश्यक आहे ते कमी करण्यासाठी, जीवन सुखी करण्यासाठी जे काही करतो ते सगळं पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ करण्यासाठी मन, बुद्धी, प्राण, शरीर सगळं काही सक्षम असलं पाहिजे. मन strong असेल पण शरीर दुबळं असेल तर उपयोग काय? शरीर strong असेल पण मन दुबळं असेल तर उपयोग काय? आज आपण जो algorithm बघणार आहोत तो अतिशय सुंदर आहे. ह्याला दुर्गामंत्र म्हणतात -
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तु ते ॥
ह्यात दुर्गा शब्द नाही, तरी हा दुर्गामंत्र आहे. ह्यात महिषासुरमर्दिनी हे नावही नाही. तरीही ह्यात दुर्गा आणि महिषासुरमर्दिनी ही नामंही आहेत. आम्ही पुरुषार्थ करण्यात का हरतो, हे explain करणारा हा algorithm आहे.
सर्व मंगलांचं मंगल असणारी. जे शुभ, सुंदर, मधुर, सुखकारक, हितकारक, दु:खनाशक आणि पवित्र आहे, ते सगळं मंगल. हे सात शब्द मिळुन मंगल. ह्या शब्दांनी मंगल हा शब्द तयार झाला आहे.
मधुर म्हणजे केवळ गोड नाही. सगळंच्या सगळं उचित असणारं म्हणजे इंग्लिशमध्ये Harmony. Harmony म्हणजे माधुर्य. सर्व मधुर आणि सुखकारक असणं. शुभ, सुंदर, मधुर, सुखकारक, हितकारक, दु:खनाशक आणि पवित्र ह्या सगळ्या मंगलांच मंगल असणारी.
सर्व म्हणजे प्रत्येक प्रकारचं मांगल्य देणारी. पूर्ण शुद्ध असणारी, जी पूर्ण शुद्ध आहे, आणि पूर्ण शुद्ध असेल अशी शिवा.
सर्वार्थसाधिके म्हणजे सर्व पुरुषार्थ सिद्ध करून देणारी म्हणजे प्रत्येक पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी लागणारी ताकद पुरविणारी. मनाचं, बुद्धीचं, प्राणाचं, शरीराचं सामर्थ्य सिद्ध करून पुरविणारी.
आम्ही नेहमी देवाकडे मागतो - ‘देवा, आम्हाला ताकद दे’ पण ती ताकद वापरायची कशी हे आमचं आम्हीच ठरवणार. आम्ही मागतो - ‘देवा, मला घर दे’ पण असं कधी म्हणत नाही की - ‘देवा, त्या घरात तू रहायला ये. ते घर तुझंच असू दे.’ हे मागत नाही. ‘देवा, मला परीक्षेत पास कर.’ हे मागावं पण त्याचबरोबर ‘देवा, मला अभ्यास करण्याची बुद्धी दे. माझ्याकडून तू अभ्यास करवून घे.’ हे कधी मागत नाही. ‘प्रमोशन मिळू दे’ असं म्हणतो, पण ‘प्रमोशन मिळाल्यावर मी कसं काम करायचं हे तू ठरव. तू माझ्याकडून काम करवून घे.’ हे मागत नाही. प्रमोशन मिळाल्यावर तुमचं वागणं जर देवाच्या मांगल्याविरुद्ध असेल तर ते त्याला आवडणार नाही. तुमचं मंगल करावं आणि इतरांचं अमंगल व्हावं अशी तिची वृत्ती नाही. आमच्या शत्रुंचा नाश कर असं आम्ही सांगतो, पण माझं काही चुकत असेल तर ते सुधारून दे. हे आम्ही सांगत नाही. काहीवेळा तर आम्ही देवाच्याच चुका काढतो.
गणपतीच्या रांगेत उभे आहोत. एवढे लोक आमच्या पुढे उभे आहेत. मला माहित आहे देवा, तु त्याचंच काम करणार कारण त्याने तुला सोन्याचा मुकुट दिलाय. तु माझं काही काम करत नाहीस.
आपण लक्षात घेत नाही, की आपण देवावर आरोप करतो. जोपर्यंत आमच्या मनाप्रमाणे सर्व चांगलं मिळत रहातं तोपर्यंत देव चांगला. जेव्हा एखादं मनाविरुद्ध घडतं तेव्हा देवाला आपण नावं ठेवतो. देव चूक दाखवतो तेव्हा तो वाईट. आपल्याला ह्याचीच भीती वाटत असते. त्यामुळे आपण पुरुषार्थापासून लांब जात राहतो.
मातृवात्सल्यविन्दानम् आणि मातृवात्सल्यउपनिषद् मध्ये महिषासुर आणि वृत्रासुर हयांचे वारंवार उल्लेख येतात.
महिषासुर हा शब्द कसा बनलेला आहे? महिष + असुर = महिषासुर. म इति मंगलम् पूर्ण मंगल. ‘म’ बीज हे पूर्ण मांगल्याचं बीज आहे. जेव्हा ह्याला ‘ह’ कार मिळतो तेव्हा त्याचा अर्थ हिंसा होतो. जे जे म्हणून मंगल आहे, सर्व मंगल आहे त्याची हिंसा करणारा तो महिषासुर. ‘ष’ इति षंढत्व. षंढत्व प्रदान करणारा. failure देणारा. जे काम मनुष्यासाठी आवश्यक आहे ते त्याला मिळू न देणं म्हणजे षंढत्व, अभ्यासापासून कर्तृत्वापर्यंत सगळं काही मिळू न देणं. सर्व मांगल्याची हिंसा करून मानवाला षंढत्व देतो तो महिषासुर. महिष शब्दाचा अर्थ म्हणजे जे अशुभ आहे, जे अनिष्ट आहे ते. महिष म्हणजे evil आणि महिषासुर म्हणजे devil. evil आणणारा तो devil. महिषत्व देणारा तो महिषासुर. महिषत्व म्हणजे मंगल गोष्टी नष्ट करून षंढत्व देणारा. षंढत्व म्हणजे पुरुषार्थ नष्ट करणारा. धर्म पुरुषार्थ, अर्थ पुरुषार्थ, काम पुरुषार्थ, मोक्ष पुरुषार्थ, भक्ती पुरुषार्थ, मर्यादा पुरुषार्थ ही नष्ट करणारा.
षंढत्व म्हणजे पुरुषार्थ नसणं. पुरुषार्थ करण्याची ताकद नसणं. हे महिषासुर करतो. जे-जे पवित्र मार्गावरून चालू इच्छितात त्यांच्या जीवनात दु:ख आणण्याचं, त्यांचा नाश करण. जे हित साधू पाहतात त्यांचं अहित करणं. ज्यांना सौंदर्य हवं आहे त्यांना कुरूपता देणं, जे शुभ आहे त्याला अशुभ करणं हे त्याच काम आहे. महिष म्हणजे जे पूर्णपणे अशुभ, evil आहे ते आणि devil म्हणजे महिषासुर.
भारतात रावणाची पाच देवळं आहेत. त्यांची जत्राही भरते. जो आम्हाला पाहिजे ते देईल तो देव म्हणून हिंदुस्थानचं नुकसान झालं आहे. आमच्याकडे पक्ष, जाती आणि देवही भरपूर आहेत. आमच्या गावचा शिव वेगळा, तुमच्या गावचा शिव वेगळा. साईबाबांना भजतो पण मुलगा fail झाला तर त्यांनी मुलाला fail केलं. मग आम्ही उद्या स्वामी समर्थांचे भक्त होऊ. आमचा विश्वास किती? ह्या अशा वृत्तीमुळे आम्ही चुकीच्या बुवांच्या/ बाबांच्या रांगेत उभे रहातो, चुकीच्या हातात सापडतो.
महिष म्हणजे काय हे नीट कळलं पाहिजे. लोक महिषासुराची पूजा का करतात? अशुभ मार्गाने स्वत: सुख मिळविण्यासाठी, जे संतुलन आहे, माधुर्य आहे ते फक्त मलाच मिळावं म्हणून, पावित्र्याचा भंग व्हावा म्हणून, जे हितकारक आहे ते फक्त माझंच व्हावं म्हणून. इतरांचं वाईट करून माझं चांगलं, भलं व्हावं म्हणून महिषासुराची पूजा केली जाते. उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीवर प्रेम आहे पण तीचं नाही, तिने दुसर्याशी लग्न केलं. तिचा नवरा मरू देत मग मी तिच्याशी लग्न करीन अशी इच्छा धरणारा महिषासुराची पूजा करतो.
आज आपण जो algorithm बघतोय. तो आहे -
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तु ते ।
शरण्ये त्र्यंबके गौरि, त्र्यंबका म्हणजे आईचा तिसरा डोळा जो आपण मागच्या वेळी बघितला. हा तिसरा डोळा संतुलन, Harmony आणतो, जे काही कमी आहे ते संतुलित करतो. तो उघडला गेला तरी तो त्र्यंबकच असतो. थेटपणे तीनही काळांमध्ये समानपणे जाऊन तीनही काळात simultaneously जाऊन बघतो.
ही आदिमाता तीनही काळात एकाच वेळी वास्तव्य करते. हा तिसरा डोळा तीनही काळात एकाचवेळी बघतो. ह्या तीनही काळात जे जलतत्व आहे, जीवनतत्व आहे - जिवंतपणा, रसरशीतपणाचं संरक्षण करत असतो. तिसरा डोळा हा तीनही काळात एकाच वेळेस बघून जे जिवंतपणाला हानिकारक आहे, त्याचं एकाच वेळेस नाश करतो. आमचं अपंगत्व, आमच्या जीवनात पुरुषार्थ उरला नाही म्हणजे आमच्या सुखाचा मृत्यू होणं, पुरुषार्थाचा, यशाचा, किर्तीचा, श्रीमंतपणाचा मृत्यू झाला. हे सगळं दु:ख देणारं आहे. तुम्ही जिवंत असताना तुमच्या जीवनामध्ये परलोकात सुख मिळेल हा तिचा सिद्धान्त नाहीये. प्रत्यक्ष हेच प्रमाण. इथे जिवंतपणा म्हणजे तुम्हाला ह्याच जीवनामध्ये तुमचं नशिब बदलून मी दाखवते. अहितकारक गोष्टींचा नाश होणं महत्वाचं, गरजेचं. तुमच्या जीवनातल्या शत्रुंचा एकाच वेळेस तीनही काळात जाऊन नाश करेल अशी ती आहे.
समजा तुमच्या घराच्या अंगणात एक विषारी झाड आहे. तुम्हाला ते तोडायचं आहे, तुम्ही ते मुळापासून उपटून टाकणं महत्वाचं. ते कापताना समजा त्या झाडाचं एखादं फळ मातीत पडलं तर त्याच्या बीया रूजणार. एखादाच पक्षी त्या झाडाची फळं समजा खात असेल तर त्याच्या विष्ठेतून त्या बीया इतरत्र पडून रुजणारच आहेत. मग हे विषारी झाड भविष्यातही माझ्या अंगणात रुजू नये म्हणून झाड कापताना मला काळजी घ्यावी लागते. तसंच तो पक्षीदेखील माझ्या अंगणात येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं.
शाळेत असताना अभ्यास केला नाही, फक्त पाचवीपर्यंत पास झालो, म्हणून वर्तमानकाळात कष्टदायक काम करावं लागतयं. पण भविष्यात मला चांगलं बनायचंय ही इच्छा उत्पन्न झाली तर मला मी शाळेत शिकलो नाही हे प्रारब्ध पुसलं गेलं पाहिजे. जर मला सुतारकाम आवडत असेल तर यासाठी सुताराकडे काम करुन त्याच्याकडे प्रत्येक गोष्ट शिकली पाहिजे. प्रत्येक गोष्ट शिकून मला expert सुतार व्हायला पाहिजे.
त्र्यंबका म्हणजे एकाच वेळी तीनही काळात बघून अहितकारक गोष्टींचा नाश करू शकणारी. म्हणून हीच महिषासुराचा नाश करू शकते. तीच दुर्गा आहे आणि तीच महिषासुरमर्दिनी आहे.
दुर्गा जी दुर्गम आहे, दुर्गम म्हणजे जी मिळण्यास अत्यंत कठीण आहे ती दुर्गा. दुर्गा म्हणजे दुर्गती नाशिनी - वाईट गोष्टी होऊच देत नाही. ती तुमच्या भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ ह्या तिघांमधल्या दुर्गतीचा नाश करणारी.
ती श्रद्धहीनांना, असुरांना मिळण्यास कठीण आहे. तिचं युद्ध असुरांशी, राक्षसांशी असतं, महिषासुराचा नाश करण्यासाठी असतं.
तिन्ही काळात जे काम दुर्गम आहे - दुर्गम काज जगत के जेते । सुगम अनुग्रह तुमरे तेते । तो हनुमन्त तिचा जेष्ठ पुत्र आहे.
पुरुषार्थ अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी तिन्हीं काळात रिपेरिंग व्हावं लागत. तीनही काळात जाऊन चुका दुरूस्त करणं हे दुर्गम, कठीण काम आहे म्हणून ती त्र्यंबका आहे. ते ती करते म्हणून दुर्गम आहे. आणि ती महिषासुराचा नाश करते म्हणून ती महिषासुरमर्दिनी आहे.
आपलं एक घर आहे, एखादा plot आहे, त्यावर दुसरा कुणीतरी दावा करतंय. केस लढलात, केस जिंकलात, घर मिळालं. भविष्यकाळात मला कागद नीट करायचेत, ७/१२ चा उतारा काढायचाय, घर नावावर करायचंय, Legal गोष्टी करायच्या. असं तुम्हाला सजग करायचं काम ती करते. तुमच्या चुका दुरूस्त करते. महिषाचा नाश करते.
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तु ते ।
गौरि - हे नाव पार्वतीचं आहे. ती भक्तमाता आहे. इथे गौरि हे नाम नाही, विशेषण आहे. गौरि म्हणजे गौर वर्णाची. पण हिचं कुठलंही रूप घेतलं तरी ती गौरवर्णाची नाही. ती शामे आहे म्हणजे ती शामवर्णाची, सावळ्या वर्णाची आहे. तिचा मूळ वर्ण शाम आहे. अनसूया बनून ती चाफ्याच्या फुलांच्या रंगांची बनू शकते. काली बनून ती गडद काळ्या वर्णाची बनू शकते. महालक्ष्मी म्हणजेच महिषासुरमर्दिनी बनून सुवर्णवर्णाची वा शेंदूर वर्णाची बनू शकते आणि सरस्वती बनून गुलाबाच्या पाकळीच्या रंगाची पण बनू शकते. पण तिचा मूळ वर्ण हा शाम वर्ण आहे. गौर वर्ण पण वेगवेगळा आहे, तिचा पूर्ण शुद्ध गौर वर्ण नाहीये.
गौरि शब्दाचा सुंदर अर्थ आहे. गौरि म्हणजे जे-जे म्हणून ह्या प्रगट विश्वामध्ये (दृश्य किंवा अदृश्य) पदार्थात जे प्रगटलेलं आहे, जे-जे म्हणून सगळं काही जसं असायला हवं ते ते सगळंच्यासगळं तसंच आहे ते गौर. गौर म्हणजे सर्वोत्तम, APTEST. Apt म्हणजे उचित आणि Aptest म्हणजे गौर.
डोळे म्हणेज दृष्टी भेदक असणं, नुसतं बघण्याची नाही तर observe करण्याची capacity असणं. डोळ्याचं काम नुसतं बघणं नाही, तर बघण्याची ताकद बेस्ट असणं, जे बघितलं ते समजण्याची ताकद बेस्ट असणं, त्याचप्रमाणे कृती करणं म्हणजे गौर. असं गौर देणारी ती गौरी. महिषासुर जे-जे करण्यास इच्छितो त्याच्याविरुद्ध करणारी ती गौरी.
हा मन्त्र त्या आदिमातेचा सगळ्यात मोठा दुर्गामंत्र algorithm आहे.
ह्यात महिषासुर म्हणजे काय? महिषासुराचा वध करणारी कोण आहे हे कळतं. भूतकाळात जाऊन तुमची पापं नष्ट करण्याची ताकद तिच्या आणि तिच्या पुत्रामध्ये आहे. हे आकाश-पृथ्वीचं नातं म्हणजेच हनुमन्त. ह्या नात्यामुळेच एकीकडे माणूस उभा आहे आणि दुसरीकडे लोंबकळत आहे असं होत नाही. हा मंत्र पहिल्यांदा हनुमन्ताने उच्चारलेला आहे. हा algorithm आम्हाला हनुमन्ताने दिलेला आहे. म्हणून हा algorithm कधीही बदलू शकत नाही. महिषासुरमर्दिनीच्या भक्तीनेच आम्ही आमचं जीवन सुंदर करणार. आपला पुरुषार्थ आपण करतच रहायचं. आपल्याकडे जे-जे काही कमी आहे ते-ते तिच्याकडे मागतच राहायचं. आपल्या आजीकडे, बापाकडे मागायला कसली लाज. जर तुम्ही मला Dad म्हणत असाल तर माझी आई तुमची आजी आहे.
एकनाथ महाराजांचा एक अभंग मला खूप आवडतो
राजयाची कांता काय भिक मागे । मनाचिये जोगे सिद्धी पावे ॥
आम्ही चण्डिका आईचे पौत्र आहोत आम्हाला कोणाकडेही भीक मागायची, कोणापुढे लाचार व्हायची गरज नाही. आम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही.
‘All Is Well’ हा फक्त पिक्चरचा, माणसाचा concept नाहीये. हा concept पूर्ण वैदिक आहे. ‘All is Well Dad, All is Well’ असं आपण म्हणूया. आता आपण आईचं स्मरण करूया.
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तु ते ।
॥ हरि ॐ ॥