॥ हरि ॐ॥
आज पहिल्यांदा आपल्या घरच्या गणपतीचे अत्यंत प्रेमाने आमंत्रण देणार आहोत. गणपतीचं आमंत्रण एकदाच दिलं जातं. हे आमंत्रण जे नवीन आले आहेत त्यांच्यासाठी आहे. अनेकांच्या गावी गणपती असतो, इच्छा असते गणपतीसाठी गावी जाण्याची, अनेकांची गावांशी नाती तुटलेली असतात, कधी वादविवादांमुळे गावी जाता येत नाही. त्यामुळे काही कुळाचार राहून गेलेले असतात. इथे आल्यावर, ह्या गणपतीचं दर्शन घेतल्यावर, सगळे दोष दूर होतात. हा प्रत्येकाचा घरचा आहे. कोणाला घरात गणपती आणायचा असतो पण काही कारणास्तव शक्य होत नाही, त्यांचसुद्धा सगळं इथे complete होईल पण भाव पाहिजे - हा माझाच गणपती आहे.
आणखी एक विनंती आहे, लिफ्टचा वापर ज्यांना खरंच गरज आहे त्यांनीच करावा. दोन लिफ्ट आहेत. जेवढा minimum वापर करता येईल तेवढा कमी करावा. ज्यांना गरज आहे त्यांनी जरूर करावा. ही माझी मनापासून विनंती आहे.
श्रीस्वस्तिक्षेम संवाद..................
॥ हरि ॐ॥
ह्या अग्रलेखातली नावं ग्रीक भाषेसारखी आहेत. ह्याचा संबंध ग्रीक-इजिप्त संस्कृतीशी आलाय. मनापासून अग्रलेख वाचा, जतन करा. ह्याविषयी मोठं literature net वर available आहे पण त्यात गोंधळ घातला गेलाय. काही लोकांनी साईटस् सुंदर बनवल्या आहेत पण त्यांना फक्त अर्धा भागच माहिती आहे. ह्याचा संबंध आपल्या दररोजच्या जीवनाशी येऊन ठेपलेला आहे. आपल्या चार भारतीय धर्मांनी हा इतिहास जपलाय. हिंदू, जैन, शिख, बौद्ध. कॅथलिक धर्माने बायबल मधून हाच सगळा इतिहास जपलाय. हे आपल्याला आज समजलं पाहिजे. बॉम्ब हिंदूवर पडला काय, बौद्धावर पडला तरी बॉम्ब बॉम्बचं काम करणार आहे. भारतीय संस्कृतीत अनेक राज्य आहेत, धर्म आहेत. भारतीय संस्कृती अशी का घडली त्याचा इतिहास जाणणं गरेजचं आहे. प्रत्येक राज्याची, गावाची संस्कृती वेगळी. culture म्हणजे नक्की काय? समानता आहे कुठे? हळद, कुंकू, अक्षता, फुलं, नारळ पाहिलं की आपल्या लक्षात येतं - इथे भारतीय पूजाविधी चालू आहे. ह्या चारही धर्मांमध्ये ही संस्कृती आहे. तसंच ह्या चारही धर्मांना गंगा ही अतिशय पवित्र आहे, गोमाता ह्यांना पूज्य आहे. चारही धर्मांमध्ये आई-बाप-गुरु ह्यांची महती आहे. ह्यांच्या पाया पडण्याची, आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. तो एकच आहे पण प्रत्येकाने आपल्या भावानुसार वेगळे नाव दिले, वेगळी मूर्ती तयार केली.
आम्हाला मूळ परिस्थिती समजली, आम्ही कुठल्या परिस्थितीतून गेलो, त्यातुन आमचं काय-काय चांगलं करण्यासाठी कुठल्या शक्ती धावून आल्या, हे कळलं की आपल्याला जीवन जगणं सोपं होतं. ह्या लेखमालेतला बराचसा भाग वैज्ञानिक आहे. आम्हाला वाटते १६०० वर्षांपासून औद्योगिक क्रांती सुरू झाली पण त्याच्या हजारो वर्ष आधी ह्या जगातला मानव हजारो पट विकसीत होता. आजचं जे सायन्स आहे त्याच्याही पेक्षा हजारोपट प्रगत होतं. त्या काळापासून आजपर्यंत काय चुका झाल्या हे कळलं की काय चुका टाळायच्या हे सोपं होतं. ‘स्त्री नरकाच द्वार’ हे आमच्या मनावर नकारार्थी विचार बिंबवले जात. ह्या चुकीच्या संकल्पना आहेत. चुकीच्या संकल्पनांमुळे भय निर्माण होतं. आत्मविश्वास निघून जातो. आई मला शिक्षा कर असं तुम्ही मागता कामा नये. तुम्हाला वाटतं जगात काही चुकीचं घडलं तर शिक्षा व्हायला पाहिजे. जगाला जन्म तुम्ही दिलात का? मला निर्माण कर म्हणून application नेली होती का तिच्याकडे? आम्हाला तिने जन्माला घातलं, कर्मस्वातंत्र्य दिलं आणि त्या कर्मस्वातंत्र्याच्या आड परमेश्वरी आणि तिचा पुत्र परमात्मा दोघंही येत नाहीत.
मोबाईल बाळाला खेळायला दिलाय आईने, आणि तो मोबाईल बाळाच्या हातून खाली पडला आणि फुटला तर काय आई-बाप त्या बाळाला तुरुंगात पाठवणार काय? चाबकाने फोडून टाकणार काय? शिक्षा देणारी आई नसते. तिच्यासाठी आणि तिच्या पुत्रासाठी तुम्ही बाळचं आहात. तुमच्या हातून चांगलं घडलं की त्याचं ते कौतुक करायला बसलेत. चूक घडली तर बोट धरायला ते बसलेत.
दिवा विझला की कोणीतरी चाललं - असं कोणत्या ग्रंथात लिहिलेलं आहे? आम्ही देवाला काय मानतो - काय नियम लावतो तर चूक झाली की देव सजा देतो. चुकीची सजापण तो श्रद्धावानांना अशा प्रकारे देतो की त्यांच कल्याण होतं. श्रद्धाहीन जर श्रद्धावानाच्या वाटेला आलेत तर त्याची आणि तो वाटेल त्या टोकाला जातात.
जर मी तिला माझी आजी आणि तिच्या पुत्राला माझा बाप मानतो, तर मी कुठल्याच तुरुंगात अडकणार नाही. हे उदाहरण साईसच्चरितामध्ये पण दिलंय. पोपट सोन्याच्या पिंजर्यात असतो एक दिवस त्या पिंजर्याचं दार उघडलं जातं आणि त्याला बाहेरच जग कळतं. पेरुच्या असंख्य झाडावर तो मोकळेपणाने ह्या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारतो. आम्हीही असेच पिंजर्यात अडकलेले असतो. ह्या झाडावर बसलास तर पाप लागेल, त्या झाडावर पुण्य.
महाराष्ट्रामध्ये कार्तिकेय ब्रह्मचारी, तर दक्षिणेत गणपती ब्रह्मचारी. संतोषीमाता पिक्चर आला तेव्हा संतोषी मातेचं व्रत सुरू झालं. तीर्थयात्रा, पूजा, व्रत करा पण भीतीपोटी करू नका. भीतीपोटी केलेली गोष्ट देवापर्यंत पोहचत नाही. हे कसं होतं - राहता सैतानाच्या घरात आणि न्याय देवाकडे मागता. देवाला सजा करणारा मानणं म्हणजेच सैतानाच्या राज्यात राहणं.
वृत्रासुराचा मानवाशी संबंध कसा जोडला हे ह्या लेखातून कळणार आहे. तुरुंगातलं १०० वर्षाचं जीवन जगायला मिळाल, तर काय अर्थ आहे. मी नेहमी सांगतो, ‘तुमच्या खांद्यावर तुमचंच डोकं असलं पाहिजे.’ आम्ही प्रयास करतो पण अपयश येतं. मग आम्ही नशिबाला दोष द्यायचा, मागच्या जन्मीची पाप-पुण्य आहे. पण आम्ही विसरतो - “एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा । परि हरि कृपे त्याचा नाश आहे।’ आमची भक्ती कमी पडते म्हणून असं होतं. आमची भक्ती कमी पडते, सबुरी कमी पडते मग देवाकडे अधिक सबुरी, भक्ती दे. बाळ जर आईकडे हक्काने मागतं त्या हक्काने मागायला शिका. जी गोष्ट हवीशी आहे ती मागता. माझं धैर्य वाढवं, श्रद्धा वाढवं मागा. माझं नशिब वाईट आहे - असं कधीच म्हणू नका. माझं नशीब चांगलं आहे ते अधिक चांगलं होऊ दे. तुम्ही त्याची सख्खी बालकं आहात. अनाथाश्रमातील बालक नाही आहात. प्रत्येक जण त्यांना समान आहे. एका मुलाला चांगले मार्कस् मिळतात. दुसर्या मुलाला कमी मार्कस् मिळतात. कमी मार्कस् मिळणार्या मुलावर अधिक प्रेम असतं. आम्हाला खात्री पाहिजे की आम्ही त्याची सख्खी बाळं आहोत.
जीवनात संकटं येतात, संकटे येणे हा सहजभाव आहे.. जमिनीवर आपण का चालू शकतो? गुरुत्वाकर्षणामुळे जमीन विरोध करते म्हणून आपण चालू शकतो. हा सहजभाव आहे.
चंद्रावर माणूस गेला हे कसे खोटे आहे हे आता शास्त्रज्ञानांनी Prove केलंय ना! असं आपल्याला अज्ञानात ठेवलं जातं. अज्ञान म्हणजे अंध:कार. हा अंध:कार आहे. आपल्याला जीवनात दैवी प्रकाशात जगायच. आपल्या चुकीच्या कल्पानांमुळे, निगेटिव्ह संकल्पनांमुळे संकटं निर्माण होतात.
परीक्षेला जाताना उजळणी करताना विसरलोत तर, मनात विचार येतात पेपर लिहिताना हे आठवलंच नाही तर? मग सारखा विचार करतो, परीक्षेला विसरलो तर, विसरलो तर पास व्हायच्या इच्छेपोटी निगेटिव्ह विचार करत राहतो आणि शेवटी तेच होतं.
निगेटिव्ह विचार दूर करण्याची ताकद भक्ती देते. वेदांमध्ये भक्ती हा शब्द नाही. उपनिषदांमध्ये हा शब्द आला आहे. मधल्या काळात काय घडलं हे जाणायचंय आपल्याला. मानवाला भक्ती का दिली देवाने हे कळावं म्हणून अग्रलेखाची ही मालिका सुरू केलीय. हे सगळं तिचं आहे ह्या जगदंबेचं, ह्या महात्रिपुरासुंदरीचं, ह्या गायत्रीचं, अनसूयेचं, महिषासुरमर्दिनीचं. हा सगळा कारभार तिचा आहे. तिच्या कारुण्याचा प्रुफ हवा असेल तर ...मला बघा! एका बाजूला एम.डी. डॉक्टरही आहे, मार्शल आर्ट पण शिकवतो. हे तिने मला घडवलंय, मला सांभाळतेय. माझा प्रत्येक शब्द ती ऐकतेय.
आई ती आई अति मायाळू । लेकरा लागी अति कनवाळू ।
परि लेकरेच निघता टवाळू । कैसा सांभाळू करी ती॥
ही आपली आदिमाता सगळ्यांचा सांभाळ करायला समर्थ आहे. ती कधीही कोणाकडे दुर्लक्ष करत नाही. हा इतिहास समजून घेतला की आजच्या काळात घडणार्या गोष्टी कळतील.
भीती शब्दाने नाही अनुभवाने जाते. भीतीपासून पळायला गेलात तर ती अधिक जवळ येते. म्हण आहे ना - ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ जेवढे तुम्ही भीतीपासून लांब पळता तेवढी ती मागे लागते. ग्रंथराजामध्ये ती दोन कुत्र्यांची गोष्ट आहे सुख आणि दु:ख. What you resist that persist हा फिलॉसॉफीचा महान सिध्दान्त आहे. ज्याला तुम्ही विरोध ती गोष्ट तुमच्या आयुष्यात अधिक प्रबळ बनते. विरोध सकारात्मकदृष्ट्या करता आला पाहिजे आणि तो कसा करायचा हेच आपण आपल्याला प्रत्येक प्रवचनातून शिकत असतो. नाहीतर आयुष्यात जी गोष्ट नको असते तीच समोर येते.
अध्यात्म खूप सोपं सुलभ आहे. आम्ही स्वत:च ते कॉम्प्लिकेट करून ठेवतो. संकट आलं की आम्ही म्हणतो, ‘देवा, माझं संकट किती मोठं आहे.’ हे चुकीच आहे. ‘हे संकटा माझा देव तुझ्यापेक्षा खूप strong आहे’ असं म्हणा. हे positive आहे. Positive पुस्तक वाचून कोणी positive होत नाही. साधासुधा वारकरी ही positive असतो. कारण संतांचे अभंग ऐकून तो तयार झालेला असतो. सोयराबाई, चोखामेळा ह्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं नव्हतं तरीही ते सांगतात- ‘अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग।’ ‘पाहते पाहाणे गेले दूरी।’ पाहता पाहता पाहण्याची क्रिया निघून गेली.
अध्यात्मासाठी कुठल्याही जातीची आवश्यकता नसते. ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्या कराव्यात. भाव मात्र प्रेमाचा असला पाहिजे. प्रेम आणि भय एकत्र नांदू शकत नाही. प्रेम आणि आदर एकत्र नांदतात.
ही लेखमाला भयातून मुक्त करणार आहे. कुठल्या आईबापाला बाळ depended राहिलेलं आवडेल. किती प्रेमाचं बाळ असलं तरी ते एक वर्षाने चालायला शिकलचं पाहिजे.
आदिमातेलाही वाटतं की बापाची आणि आजीची आठवण प्रेमाने व्हायला हवी. छोट्या-छोट्या भीतीमुळे बाळांनी हाक मारू नये असं वाटतं. आम्हाला नेहमी त्याचं स्मरण असायला हवं, पण दिवसभर नामस्मरण करत बसलात तर व्यवहार कसा करणार. म्हणून मी सांगतो, maximum नामस्मरण करा.
आदिशंकराचार्यांनी देवी क्षमामापन स्त्रोतामध्ये सांगितलंय, बाळाला भूक लागली की त्याला आईचीच आठवण येते. दुसर्याच्या दारात बाळ जात नाही ते आईकडेच जातं.
एकदा का ‘पावित्र्य हेच प्रमाणा’शी connection जोडलं गेलं की ते तुटत नाही. भीती त्या काळात निर्माण केली गेली. त्या काळात मानवाने जे काही अनेक पिढ्या भोगलं- त्याकाळात मानवाचं ३५०-४०० वर्षे वय होतं ते सगळ जीन्समधून आलंय. ती भीती तुमच्या जीन्समधून transfer होत आलीय. मला ते जीन्सच बदलायचंय, काढून टाकायचंय. तुम्हाला कडेवर घेऊन झो-झो करणारं मला चालणार नाही. मी खाली उतरवणार आणि तुम्हाला चालायला लावणार. मला तुम्हाला प्रत्येकाला बेदरकार - भीती नसलेला बनवायचयं. ‘बाप से बेटा सवाई’ व्हायला हवा ही माझी इच्छा आहे.
॥ हरि ॐ॥