॥ हरि ॐ ॥
गरम झालं की आपण म्हणतो का कधी की, ‘देवा, किती उकडतं रे’, ह्याने ही खूप फरक पडतो. देवाला लहान-सहान गोष्टी सांगायला शिका.
॥ हरि ॐ ॥
उपनिषद् वाचताना मणिव्दीपाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. तुम्हाला ह्या प्रतिमेसमोर बसल्यावर वाटलं पाहिजे की तुम्ही मणिव्दीपात मोठ्या आईसमोर बसलात. त्यावेळी माझी लायकी आहे की नाही ह्याचा विचार करायचा नाही. तुम्ही तुमच्या जीवनाचे ट्रस्टी असता, मालक नाही. आम्ही तिच्या प्रतिमेसमोर बसतो तेव्हा मणिव्दीपातच बसलेलो आहोत अशी कल्पना करा, असाच भाव ठेवा.
चद्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह।
भारतीय संस्कृतीने सगळ्या गोष्टी साधेपणाने, अत्यंत सुंदरपणे मांडल्या आहेत. लोपामुद्राचा प्रत्येक शब्द तिचाच आहे, महालक्ष्मी आणि लक्ष्मीसाठी तिने लिहिला आहे.
‘चद्रां’ जिचा प्रकाश चंद्राप्रमाणे सौम्य पडतो. ह्या श्रीविद्येचा मंत्र १५ अक्षराचा आहे आणि १६ वे अक्षर महालक्ष्मी शिवाय कोणी देऊ शकत नाही. ह्याचा उच्चार वेगळा आहे, तो शिकावा लागतो. ही १५ बीजं आहेत. ह्यांना नित्या म्हणतात. ह्या १५ नित्यांची उपासना पूर्ण झाली की १६ वी नित्यनित्यावी कला प्रकटते. चंद्राच्या कला प्रतिपदा ते पौर्णिमा - १५ कला आहेत. आपण लक्ष्मीचा अभ्यास करतोय ती चंद्रा आहे. ती आम्हाला अनपगामिनीम् म्हणून हवी असते. अनपगामिनी म्हणजे अन-अप-गामिनी म्हणजे जी आमच्याकडून कधीच दूर जाणार नाही. चंद्राची कला दिसते न दिसते अशी स्थिती द्वितीयेला असते मग हळूहळू पूर्ण दिसते. चंद्राची कला जशी थोडी-थोडी कमी होत जाते. त्याच्या बरोबर आकाशातले तारेही लखलखत जातात. अमावास्येला सगळे तारे लखलखतात.
आम्हाला लक्ष्मी कशी हवी असते? चुटकी वाजवली की, ती यायला हवी म्हणजे आपल्याला कमी श्रमात आणि कमी वेळेत लक्ष्मी हवी असते. आम्हाला कमी काळात जास्त पैसा हवा असतो. पण तो लक्ष्मीचा मार्ग नाहीच! अनपगामिनीम् लक्ष्मी हवी असेल तर चंद्राचा मार्ग स्वीकारावा लागतो म्हणजे आई थोडं-थोडं चंद्राला प्रकाशवित जाते. अमावास्या म्हणजे चंद्र भिकारी होत नाही. त्याचा कुठला भाग दाखवायचा आणि कुठला दाखवायचा नाही हे आई ठरवते.
आम्हाला पैसा चटकन हवा असतो. गेली सोळा वर्षे मी सांगतोय की झटपट पैसा मिळणार्या स्किममध्ये पैसा गुंतवू नका तरीही तुम्ही पैसे गुंतवता. आमच्या डोक्यावर मोहामुळे पडदा पडतो, गंज चढलेला असतो. आम्ही पैसे गुंतवत राहतो आणि मग ‘२० वर्षांनंतर जागा नाही मिळाली’, पैसे परत मिळाले नाही की देवाला शिव्या घालतो. ‘स्पेशल२६’ ह्या पिक्चरमध्ये जसं चालतं तसं ९९.९९% सगळीकडे चालतं. ते इंग्लिशमध्ये फाडफाड बोलतात आणि आम्ही फसतो. ब्रिटिश पण इंग्लिशमध्ये बोलत आले आणि भारताला गुलाम केलं.
झटपट पैसा मिळवण्याची स्किम तुमच्याकडे आली तर, त्यांना सरळ हात जोडायचे. कारण त्यात success (यश) कधीच नसतं. बिझनेस करणारा कोणीही माणूस चॅरिटी करत नाही. ‘कमी श्रमात, कमी वेळात पैसा’ हा शब्द आला की फ्रॉड आहे म्हणून समजा. पण तुमचा मोह तुम्हाला शांत बसू देत नाही. हा धंदा गेली हजारो वर्ष चालू आहे. ह्यांना पूर्वी ठग म्हणायचे. त्यांच्या टोळ्या असायच्या. ही माणसं पॉश माणसंच असायची. गावात दोन घरं ठगांची आहेत हे कोणालाही माहीत नसायचं. माणसांमध्ये असे अनेक ठग फिरत असतात आणि आम्ही आमच्या लोभीपणामुळे त्यांना बळी पडतो. कष्टानेही भरपूर पैसा मिळतो. तुमचं नशीब कोणी चोरू शकत नाही.
‘लक्ष्मी’ अनपगामिनीम् असण्यासाठी आवश्यक आहे ‘चंद्रमा’, म्हणजे stepwise प्रगती.
कोणी सांगितलं की ८०० कोटी बँकेत ट्रान्सफर करायचे आणि हे काम केलं की ८० कोटी मिळणार हे ऐकल्यावर तोंडाला पाणी सुटतं. ज्याने तीन-चार वेळा कर्ज घेऊन ते वेळेवर फेडलंय आणि त्याचा बिझनेस चांगला चाललायं अशा व्यक्तीला परत कर्ज देताना बँकेची माणसं स्वत:हून त्याच्या घरी येतात. मग हे ८०० कोटी ट्रान्सफर करण्यासाठी कोणतीही बँक आनंदाने तयार होईल. पण आमच्या हे लक्षात येत नाही.
‘सात दिवसात इंग्लिश बोलायला शिका’ - असं शक्य नाही. असं कधीच शक्य नाही कारण .. spoken & written language (बोलणं आणि लिहीण्याचं केंद्र एकच आहे. कोणी कितीही हुशार असलं, तरी त्याला इंग्रजी चांगल्या प्रकारे येण्यासाठी त्याला कमीतकमी सहा महिने लागतातच! मेंदूत भाषेचं केंद्र एकच आहे. त्याच्यामध्ये जी भाषा शिकता त्या सगळ्या ह्या केंद्रातच राहतात. कोणालाही नवीन भाषा चांगल्यारित्या बोलण्याइतकी शिकण्यासाठी कमीतकमी सहा महिने लागणारच.
आम्ही ह्याच्या मागे जातो आणि आपल्याला ‘अनपगामिनी’ हवी असते, पण येतं कोण? तर त्या लक्ष्मी ची बहिण अवदसा येते. आणि ती चुकीच्या मार्गाने पैसे आणते.
आम्हाला हवी असते अनपगामिनीम् आणि येते जेष्ठा अमावास्या. ती कुठल्याही मार्गाने येते आणि जातेही. लक्ष्मी एक धक्का देते-सावध हो, दुसरा धक्का देते-सावध हो आणि तरीही आम्ही सावध नाही झालो तर अमावास्या येईल. ‘माझी बाजू खरी आहे’ असं प्रत्येकाला वाटत असतं. पण आपण चिटिंग करायला लागलो की देव चिटिंग करत नाही, तर तो अलिप्त राहतो. ‘त्याच्या’शी आणि ‘त्याच्या’विषयी कधीही खोटं बोलू नका.
दामूअण्णा कासार मित्राच्या सांगण्यावरून व्यापार करायला जातात. मित्र सांगतो, बाबांना काय कळतंय. दामूअण्णा स्वत: बाबांना भेटायला आले. दामूअण्णांनी बाबांची पाती (कमिशन) बाजूला ठेऊ का विचारलं. बाबा म्हणाले, ‘दहापट मिळतील, शंभरपट भरावे लागतील, मला तुझी पाती नको’. दामूअण्णांनी तो व्यवहार केला नाही. काही काळानंतर त्यांचा business partner (व्यवसाय भागीदार) धुळीला मिळतो पण दामूअण्णांच नुकसान नाही होत! त्यांचे पन्नास हजाराचे लाख झाले नाहीत, पन्नास हजार तसेच राहिले पण ते हॅप्पी होते.
कष्टाचा पैसा कष्टाचाच असतो आणि तोच टिकतो. चिटिंग करून कमावलेला पैसा कामाला येत नाही. डॉक्टर बनण्यासाठी आधी पहिलीत admission घ्यावी लागते, मग दहावी, अकरावी, एम.बी.बी.एस. हे सगळं करावं लागतं. आईलाही नऊ महिने बाळ होईपर्यंत थांबावं लागतं.
‘चन्द्रां’ ह्याचा मुळ अर्थ आहे ‘जे काही ह्या सृष्टीमधे चांगलं होतं’, ते म्हणजे ‘ऋत’. म्हणजे जी आपला ‘ऋत’ maintain (व्यवस्थित) करते ती, जी आपला श्वास maintain (नीट) करते ती, म्हणजे ‘चंद्राम्’.
पाऊस पडून गेला, तर जमीन लगेच कोरडी होते का? नाही नां, काही वेळ जायलाच पाहिजे. हा त्या निसर्गाचा नियम राखलाच पाहिजे. तुमच्या घरात दागिने असतील तर ते तुम्ही लॉकरमध्ये नेऊन ठेवता. तुमच्यासाठी दागिने अदृष्य होतात, पण ते सुरक्षित असतात.
हिचं अस्तित्व चंद्रासारखं आहे. जे आपल्याला योग्य आहे ते ते ती देणार आहे. पण आपला धीर रहात नाही.
मग आपण इथे त्या त्रिविक्रमाला आवाहन करायचं आहे.
आणि ती लक्ष्मी क्रमशील मार्गाने येणार आहे. कारण त्या त्रिविक्रमाच्या नावातच क्रम, विक्रम आणि त्रिविक्रम आहे.
‘चन्द्रां’ म्हणजे ह्या विश्वाचे नियम, ॠत. जे-जे चांगलं आहे ते ज्या-ज्या मार्गाने मिळवता येतं त्या मार्गाचे नियम. चद्रांमा म्हणजे ॠत धारण केलेली. जी पृथ्वीची गती, तुमचा श्वास, पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर, गर्भधारणेचा काळ मेन्टेन करते ती ‘चन्द्रां’. माझा क्रांती नाही तर उत्क्रांतीवर विश्वास आहे. एका क्षणात बदल घडत नाहीत. बदल घडायला काही काळ जायला पाहिजे. हा ‘ऋ’चा नियम नीट आचारायला हवा.
तुम्ही तुमचे जे दागिने लॉकरमध्ये ठेवता, जे पैसे तुम्ही गुंतवता ते अदृश्य होतात पण चांगल्यासाठी, अधिक वाढण्यासाठी. हिचं अस्तित्व पूर्णपणे सुवर्णमयीच आहे. आम्हाला आवश्यक आहे तेवढी संपत्ती ती देणारच आहे पण आम्हाला धीर नसतो.
ही लक्ष्मीमाता क्रमशीलतेने येते कारण त्रिविक्रमाच्या नावातच क्रम आहे. क्रम, रांग सोडून कुठलीही गोष्ट unnatural च आहे. ह्या त्रिविक्रमाच्या नावातच क्रम आहे, विक्रम आहे. म्हणून ती जगदंबा त्रिविक्रमाची माता आहे. जेष्ठा अलक्ष्मी आली की जीवनातलं सगळं निघून जातं.
केवळ एखादा माणूस श्रीमंत झाला तर त्याच्यावरच्या मत्सराने, जेलसीने कधीच असं म्हणायचं नाही की ‘त्याने वाईट मार्गाने पैसा कमावलायं’ कारण जर त्याने प्रामाणिकपणे पैसा कमावला असेल तर तो लक्ष्मीचा अपमान आहे. हे कधीही विसरू नका. तुम्ही लक्ष्मीला दोष देत असता. तिला दिलेला दोष महाविष्णूला कधीही आवडणार नाही. तेव्हा असं म्हणा, ‘देवाला माहीत’ आणि तेव्हा जय जगदंब जय दुर्गे असं म्हणुन सोडून द्यायचं. कारण जिथे महाविष्णू नसेल, तिथे ती लक्ष्मी नसेलच.
घरचं जेवण हे घरचं जेवण असतं पण तुम्हाला देवाने मातृत्वाचं, वात्सल्याचं जे वरदान दिलंय ते जपा. दररोज स्वयंपाक करून स्त्री कंटाळलेली असते. एक दिवस तिला कोणी स्वयंपाक करून दिला तर तो तिला आवडतो. एक दिवस तिला आयतं ताट मिळावं ही अपेक्षा असते. रोजच्या खिशाला परवडेल तिथे जा. जे माहीत आहे की हानिकारक आहे तरी ते खात राहणे चूकच आहे. बायको आजारी असली तर आपली मुलं उपाशी राहणार नाहीत एवढं जेवण तरी पुरुषांना करता यायला पाहिजे, हा अन्नपूर्णेचा सत्कार आहे. आम्ही हॉटेलमधून जेवण मागवतो ते प्लास्टिक मधूनच मिळतं. ह्या प्लास्टिकमधून estrogen चे प्रमाण शरीरात वाढते. पुरुषांमध्ये हे प्रमाण वाढले तर स्त्रीत्वाचे गुण वाढतात. estrogen मधे गर्भनिरोधकाचे गुण असतात. त्यामुळे स्त्रियांची मासिक पाळी अनियमित होते, बंद होते. म्हणून प्लास्टिकचा वापर थांबवा, घरचे डबे घेऊन जा आणि जेवण आणा.
लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा (पार्वती) त्याचप्रमाणे प्रजापती ब्रह्मा, महाविष्णू आणि परमशिव ह्यांच्यात अभेद आहे. जी लक्ष्मी आहे हीच अन्नपूर्णा पण आहे आणि हीच सरस्वतीही आहे. ‘मन अन्नमय:’ चांगल्या अन्नाने मन दणकट, चांगलं बनतं, घाबरत नाही. मन बळकट असलं की शरीरही बळकट बनतं.
वजन कमी करण्यासाठी आम्हाला ‘चट मंगनी आणि पट ब्याह’ असं हवं असतं. आपल्याला लगेच रिझल्ट हवा असतो. इंटरनेट वर बघा स्टार्व्हिंगचे काय-काय इफेक्ट होतात ते. काहीही न खाता, नुसतं पाणी पिऊन सुद्धा वजन कमी व्हायला आठ दिवस लागतात तोपर्यंत तुम्ही अशक्त होता.
आपल्याला आयुष्यात सधन व्हायचेच आहे, सुबत्ताही हवीय पण ते क्रमाक्रमाने मिळवा. जेवढं आई देईल तेवढं उचित आहे. तरीही श्रम करून अधिक मिळवायची अपेक्षा ठेवा पण श्रमाने मिळवा. तुम्ही बॉसला, आईला, सासूला चिट केलंत तर ते कदाचित त्यांना कळणार नाही पण मोठी आई आणि तिच्या पुत्राला कळतंच. सगळ्यांच्या मनाचे प्रवाह शेवटी ‘त्यांच्या’ मनालाच मिळतात. पुरुषार्थ ग्रंथराजाच्या प्रत्येक पानावर एक देवदूत आहे आणि जो नित्यनेमाने वाचतो त्याच्यासाठी प्रत्येक शब्द देवदूत असतो. ही सगळी कनेक्शन्स त्याच्या एका कॉम्प्यूटरशी जोडलेली असतात. म्हणून ईश्वराचा धाक बाळगा. फसवणूक करून पैसा कमावण्याचा मोह टाळा. धंदा करताना चोरी-लबाडी करून पैसे कमवत असाल तर ते चुकीचं आहे. त्याने अलक्ष्मी दु:ख, दुर्गुण घेऊन येते. ह्या पृथ्वीवर राज्य तिचंच आहे, धर्माचंच आहे. ‘चन्द्रां’ ह्या मार्गाने पुढे गेलात तर अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल. हे गुह्यसूक्तम् शांतपणे ऐका, त्यानेही आर्थिक परिस्थिती सुधारेल. पण एक भाव - ‘एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा।’ आणि दुसरं वाक्य लक्षात ठेवायचं ‘माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहते’. चंद्राच्या मार्गाने क्रमाक्रमाने प्रवास करीत आमचीही प्रगती होणार आहे. त्यासाठी सूर्याच्या उन्हात श्रम करायला पाहिजेत. ‘गुरुक्षेत्रम् मंत्र’ हाच खरा आधार आहे. कधीही, कुठल्याही काळात हा आधार देणारच. ह्या मंत्राचे तीन भाग आहे - बीजमंत्र, अंकुरमंत्र, उन्मीलनमंत्र. ‘गुरुक्षेत्रम् मंत्र’ म्हणजेच ‘त्रिविक्रमाचं मंत्रमय स्वरूप’.
॥ हरि ॐ ॥