॥ हरि ॐ ॥
आज आत्ता जे योगीन्द्रसिंह कडून श्रीसुक्तम् ऐकलं तर मला आज लहानपणीची आठवण झाली. तेंव्हा नवरात्री मधे सगळ्या स्त्रिया नऊवारी साड्या, आणि पुरूष पगड्या घालायचे! सर्वजण हे श्रीसुक्तम् बोलायचे... आमच्यावेळी दिवाळीपेक्षा नवरात्रीला जास्त महत्त्व होत. दिवाळीला आज जेवढं महत्त्व आहे तेवढं त्यावेळी महत्त्व नव्हतं. तेंव्हा सगळी मंडळी एकत्र येऊन जे प्रेम व्यक्त करायचे, ते वेगळं होत. तेव्हा जात वगैरे काहीच मानलं जात नव्हतं. नवीन कपड्यांची खरेदी नवरात्रीलाच व्हायची. घट बसायचे, जागरण असायचं. त्या वातावरणात सौंदर्य होत, प्रेम होत. जगद्माऊलीच्या आविष्काराबद्दल प्रेम होत. सगळ्या स्त्रिया पूजन करायच्या, पुरुष आरती करायचे, प्रसाद वाटायचे. ते दिवस परत आले पाहिजेत. आता आपण गरबा खेळायला आणि जास्त काही बघायला जातो किंवा महालक्ष्मीच्या मंदिरात जातो.
नवरात्री म्हणजे काय हे मातृवात्सल्यविन्दानम्मध्ये, उपनिषद्मध्ये शिकलोत. आपल्या मनाला माहिती पाहिजे की ‘हे नऊ दिवस किती महत्वाचे आहेत’. आम्हाला श्रीसुक्तम् म्हणता येत, तर आपण म्हणू. बाकी काही करता आलं नाही तरी ‘दुर्गे दुर्घट भारी...’ ही आरती तरी म्हणू. तीसुद्धा नवरात्रीत केली, देवासमोर रात्री म्हणायला काय हरकत आहे? प्रेमाने करा. त्या आईचं स्वागत करायला शिका. त्यासाठी घरात 'घट' हवाच, असं नाही. पण आपल्याला कळलं पाहिजे की, ह्या नऊ दिवसात आईचा वावर असतोच! आणि तिने सांगितलंय नां की, ‘ती येते’ म्हणजे ‘ती येतेच येते... आणि ती स्पर्श करतेच !’ जो रात्री पठण करतो, ग्रंथ पठण करतो त्याच्या डोक्यावर आई हात ठेवतेच. आयुष्यात अशा संध्या फार थोड्या असतात. तिने सांगितलं म्हणजे ती येतच असणार. ती येते, स्पर्श करते. हा अत्यंत सुंदर मातृत्वाचा स्पर्श असतो. शरीराला स्पर्श करण्यापेक्षा मनाला स्पर्श करणं महत्त्वाचं आहे. श्रीसूक्तम् हे महालक्ष्मी आणि लक्ष्मीचे सुक्तम् आहे; मनावर त्याचा effect (परिणाम) होतो. अर्थ कळला नाही तरीही आपल्या मनाला ह्या सुक्तम् चा स्पर्श होतोच! हे मनाला स्पर्श करत. अर्थ कळला नाही तरी करतचं. उदाहरणार्थ; एका व्यक्तीला जर संस्कृतमध्ये शिवी सांगुन 'मोठ्या आईला मंत्र म्हणुन ‘म्हण’ असं सांगितलं, तर त्या व्यक्तीला त्याच्या 'भावा'नुसार फळ मिळणार. आणि आपण त्याला चुकीचं सांगितलं, म्हणुन आपल्याला त्याच्या १०० पट उलट फरक पडणार आहे.
अर्थ कळला नाही म्हणून देवाच्या आणि तुमच्या नात्यात बिघाड येत नाही. प्रार्थनेचा अर्थ सुद्धा परमेश्वर आणि भक्ताच्यामध्ये येऊ शकत नाही. अर्थ प्रेमाने स्वीकारावा. नको तिकडे analysis करायचं नाही. इथे बुद्धी वापरायची नसते, हे हृदयाला धरून असतं. आईच्या नकळत असतं. कुठल्याही आईला तिचं मूल शेजारच्या मुलापेक्षा कुरुप आहे, हे तिच्या बुद्धीला पटतं, पण अंत:करणाला पटत नाही. तिच्यासाठी तिचं मुलं सुंदरच असतं. इतर मुलांबद्दल तिला कौतुक वाटेल पण प्रेम वाटणार नाही. स्वत:च्या लबाड मुलावर सुद्धा तिचं प्रेम असतचं आणि असायलाच पाहिजे. दुसर्याच्या मुलाला १००/१०० मिळाले आणि आपल्या मुलाला ५०/१०० मिळाले तरी आपल्याच मुलावर प्रेम असतंच असतं. आणि ते आपल्या आईचं असायलाच पाहिजे. आणि हीच मानवाची साधी गोष्टं मोठ्या आईपर्यंत नेली पाहिजे. मोठ्या आईला सगळेच जवळ आहेत. मोठ्या आईला प्रत्येकजण तिचं बाळच आहे. पण आईच्या प्रेमळपणाचा उपयोग जे बाळ सुधारायला बघतं त्याला तिच्या प्रेमाचा फायदा मिळतो. जो तिच्याशी खोटं बोलतो त्याला काही मिळत नाही. मोठ्या आईशी communicate करताना सुद्धा (संवाद साधताना) ‘मला तिच्याशी अत्यंत प्रामाणिक रहायचं आहे’ हे लक्षात ठेवलं पाहिजे.
प्रामाणिक राहणं म्हणजे
१) कान पकडणे नाही
२) आपल्या चुकांचा सारखा-सारखा पाढा वाचणे तर नाहीच
तिच्यावरचा विश्वास वाढवत न्या. मग असं लक्षात ठेवलं पाहिजे की, आपल्यासाठी आई जे करते, ते चांगलचं करते, हा विश्वास हवा. आपल्या आईवर पुर्ण विश्वास ठेवा... जे घडलं त्या दिवशी तिला सांगायचं की, "आई आज चुकलं..." आणि मनात आपल्या स्वत:ला बदलायला सुरू करायचं.
पिच्चरमध्ये सगळं चांगलंच असेल, प्रॉब्लेम नसेल, संकट नसेल तर तुम्ही पिच्चर बघायला जाल का? रामायणात फक्त सगळं चांगलच असत, फक्त रामाचा दिनक्रमच असता तर तुम्हाला ते बघावसं वाटलं असतं का? टीव्हीचा चॅनल बदलताना रामायण दिसलं की आपोआप आपला हात थांबतो. भाषा कळत नसली तरी बघायला आवडतं. आईचं आपल्यावर खूप प्रेम आहे, जे काही घडलं असेल ते आपल्यासाठी चांगलच आहे, ती आणि तिचा पुत्र नाहीत असं काही नाही हे लक्षात ठेवा. ‘त्यांना माहीत नाही’ असं वाटलं की समजायचं आपल्या अध:पतनाला सुरूवात झाली. ही चूक करू नका. ही गोष्ट घडली की मनुष्य आईच्या इच्छेच्या प्रांतातून नियमांच्या प्रांतात जातो. म्हणजे तुम्ही जेवढं पुण्य कराल तेवढंच फळ आणि जेवढ्या चुका कराल तेवढीच सजा. त्या दोघांना कळत नाही असं काही नाही. आयुष्यात काही झालं तरी ह्या दोघांवर संशय घेऊ नका की, ह्यांना काही कळत नाही. समोरची मूर्ती बोलत नसेल; मान्य आहे. पण ती मूर्ती आहे हा भावच चुकीचा आहे. ‘ती तीच आहे’ हा भाव आपल्या मनात कायमचा राहिला पाहिजे. नवरात्री मधे आम्ही आरती कधी करू? कितीही वेळा करा... जशी जमेल तशी करा! पण प्रेमाने करा. नवरात्रीत ही (दुर्गे दुर्घट भारी....) आरती करताना प्रेमाने करा. नुसतं निरांजन ठेवून आरती करू नये सोबत हळद-कुंकू नाहीतर सुपारी किंवा फुल, तुळशीचं पान ठेवायचं. देवाला काही तरी वाहायला हवं. ‘काहीतरी आरतीच्या तबकात ठेवायचं’, कारण हा संकेत लोपामुद्रेने आणि अगस्त्य ऋषींनी सांगितला आहे.
आपल्या धर्मामध्ये एक important (महत्वाची) गोष्ट सांगितली आहे. आपल्याकडे षोडषोपचाराने, 'राजोपचार पुजना' च्या वेळेला काही नसेल, तर अक्षता वाहा. ते ही नसेल तर एक पान वाहा आणि जर ते ही नसेल, तर पाणी वाहा. आई जे हवं ते नक्की घेईल!! पण आपण मोठे महाग कपडे घालून बसू आणि आईला काही देणार नाही, असं चालणार नाही. आश्विन महिन्यात अशुभनाशिनी नवरात्र असते. ह्या नवरात्रीला मला तुम्ही 'दुर्गे दुर्घट भारी' आरती म्हणताना ऐकू यायला पाहिजे. कारण तिचं स्वागत व्हायलाच पाहिजे. आईची डिलिव्हरी होते तेव्हा आई मुलाचं स्वागत करते की मूल आईचं स्वागत करतं? कोण पहिलं स्वागत करतं?
बाळाच्या जन्माच्या वेळेस बाळ बाहेर येतान आईला ज्या वेदना होतात तेव्हा तिचं बाळ जे रडतं ते आईच्या वेदना अनुभवून रडतं. ते बालक आईचं स्वागत करत असतं. बाळाचं रडणं ऐकलं की आई आनंदित होते. त्याचं रडणं म्हणजे आईच्या वेदनांना दिलेला पहिला प्रतिसाद आहे.
आता श्रीसूक्तम् पाहू या.
हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण-रजत-स्रजाम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१॥
ही सोन्याचे-चांदीचे अलंकार धारण करते. एवढी विश्वाची सम्राज्ञी चांदीचे अलंकार का धारण करते. जे सूक्त सर्व सूक्तांमध्ये मान्यता पावलेलं आहे ह्यात लोपामुद्रा पहिलाच संदेश देते की, ‘आईला सोनं आणि चांदीमध्ये फरक नाही. दहा ग्रॅम सोनं आणि दहा ग्रॅम चांदी ह्यांच्या किंमतीत फरक आहे. चांदीला चांदीचं स्थान आहे आणि सुवर्णाला सुवर्णाचं स्थान आहे. आईला जेवढं सुवर्ण प्रिय आहे तेवढंच रौप्यही प्रिय आहे. म्हणजेच तिला गरीब-श्रीमंत, पंडित-अज्ञानी, सुंदर-कुरूप ह्यात काही फरक नाही. ती दाखवते की, ‘माझ्या मनात सुवर्ण आणि रौप्य ह्यांत कधीच फरक नाही’. आयुर्वेदात सुवर्णाचा औषधी म्हणून उपयोग आहे. मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने जेवढे चांगले गुण आवश्यक आहेत तेवढे सगळे देण्याची क्षमता सुवर्णात आहे. पूर्वी घरामध्ये हेमगर्भाची मात्रा असायची. जेव्हा सगळे उपाय संपायचे तेव्हा आजारी माणसाला शेवटचा उपाय म्हणून ही मात्रा उगाळून चाटवली जायची. म्हणून सुवर्ण हे ‘महासंजीवनी’ ह्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ही मात्रा दिल्याशिवाय कोणाला ही 'मृत' म्हटले जायचे नाही. सुवर्ण मनुष्याच्या देहाच्या प्रत्येक अवयवाशी, प्रत्येक पेशीशी, प्रत्येक इंद्रियाशी अत्यंत प्रेमाने जोडलेलं आहे. मनुष्य देहासाठी जे जे चांगले धातू आवश्यक आहेत ते सगळे देण्याची क्षमता सुवर्णामध्ये आहे. जिकडे-जिकडे मनुष्याची शक्ती सुवर्णाचा प्रभाव स्वीकारण्यास कमी पडते तिथे तो इफेक्ट रौप्य करत असतं. तात्पुरतं ते तिथे इफेक्ट तयार करतं. म्हणून सुवर्ण आणि रौप्याला सूर्य-चंद्र मानलं जातं. चंद्राकडे सूर्याचा प्रकाश आहे. तो सौम्यपणे देतो. पृथ्वीवरच्या अनेक गोष्टी चंद्र प्रकाशावर अवलंबून आहेत.
ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम् ।
ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥
त्रातारं इन्द्रं म्हणजे आजार बरा करणारा आणि अवितारं म्हणजे त्यासाठी आधीच तयारी करणारा. सुवर्ण हे त्रातारं इन्द्रंच काम करतं - ट्रिटमेंट देण्याचं. आणि रौप्य - अवितारं इन्द्रं चं काम करते. ट्रिटमेंटसाठी लागणारी तयारी करण्याचं काम रौप्य करतं. शरीराची तयारी करवून घेतं. ह्यातुन आई काय दाखवते, तर हे माझे अलंकार आहेत. पण लोपामुद्रा काय सांगतेय, तर तिला काहीही न करता सुवर्ण आणि चांदीचा effect देता येतो.
‘अवधूत अंबे आंजनेया त्रिविक्रमा क्षमस्व, क्षमस्व, क्षमस्व...............’
तुम्हाला चाल येत नसली तरी त्या आवाजाबरोबर गायला हरकत नाही. त्या आवाजात तुमचा आवाज मिसळायला हवा. आईने दाखवून दिलंय ‘मला वरची-खालची प्रत माहीत नाही.’ तिला फक्त भाव माहीत आहे. हे सौंदर्य अप्रतिम आहे. हे मातृत्वाचं, अत्यंत पवित्र भावनेचं सौंदर्य आहे. आजही आपल्याला तिच्याकडे प्रेमाने पहावसं वाटतं. हे गुह्यसूक्तम् ऐकताना हळु-हळु गा. तिला सोनं-चांदी, बेस्ट-वेस्ट असा फरक नाही. तिला मनातला भाव हवा आहे, आणि तिला भाव कसा हवाय? सोन्याशी निगडीत नाही; तर जसा असेल तसा तिच्या चरणी तिला अर्पण करायचा आहे. कुठल्याही औषधाचे इफेक्ट दोन मार्गाने होतात - सुवर्ण आणि रौप्य.
‘हरिणीं’ म्हणजे सर्व दु:ख, आपदा हरण करणारी. आपण बघतो की, राजा खूष झाला की गळ्यातली माळ काढून देतो. आई तर वाटायला बसलीय. आईकडे नऊ माळा आहेत आणि समोर पंधरा माणसं आहेत तर ती कसं वाटेल. ती अक्षय्य आहे, तिचा साठाही अक्षय्य आहे. पहिली माळ देत असताना पहिल्या माळेच्या जागेवर ती माळ तशीच असते.
तिचं मुळ नाव काय? तर 'अदिती' कारण ती 'अक्षय' आहे. कधीच ‘न खंडीत होणारी’. कारण ती अखंड आहे. शुन्याणाम् शुन्य साक्षिणी... तिचं मूळ नाव ‘अदिती’ आहे. जी अखंडित आहे. ती महाप्रलय असो, निर्गुण निराकार असो, सगुण साकार असो ती अदिती आहे. दिती म्हणजे सगळं खंडित करणारी, सगळ्याला छेद पाडणारी. कश्यपाची पत्नी अदितिमति म्हणजे जिची मती अदितीप्रमाणे आहे. तिच्यामुळे मानव जात उत्पन्न झाली असं आपण मानतो. ‘ही आदिमाता कशी देणार?’ हा विचार केला तर आपण आदिमातेला ओळखलं नाही. आईला मदत कर म्हणताना, आई मदत करु शकेल का? हा विचार करायचा नाही. ती तिच्या मुलाला कशीही पाठवेल, कुठल्याही रुपात तो येईल. तुम्हाला त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही. आम्हाला खात्री पाहिजे की, ‘ती काहीही करू शकते.’ कारण ह्या विश्वावर सत्ता तिची एकटीचीच चालते पण तिची सत्ता आपल्याला मान्य पाहिजे. लहान-सहान गोष्टींसाठी आईवर, तिच्या लेकावर रागावत बसायचं नाही. आपण आता सुजाण आहोत.
आपण जसे आहोत तसे आईला आवडतो. आपण आहोत त्या वयाचं दिसणं ह्यात काही चूक नाही. पण त्यासाठी उगीच चुकीचा मेकअप करू नका. कारण आमच्या आईला आम्ही आहोत तसेच प्रिय आहोत. ज्याअर्थी तिने मानवाला वार्धक्य दिलंय ह्याचा अर्थ तिचं प्रेम बालवयाच्या, तरुणवयाच्या आणि वृद्धवयाच्या मानवावर सारखंच असतं. दिसण्यात खूप काही गोष्टी आहेत. काळानुसार व्यवस्थित कपडे घाला पण त्यात निवड असली पाहिजे. दुसरा कोणी घालतो म्हणून आपण घालायचं नाही. जे तुम्हाला सूट होईल तीच निवड करायला हवी. वय तुमच्या आड येत नाही, तुम्ही वयाच्या आड येता. आईसाठी लहान बाळं ही बालकच आहेत, तरुणही बालकच आहेत आणि वृद्धही बालकच आहेत. हे आईचं प्रेम कधीही विसरायचं नाही. मनातले दुराग्रह काढून टाका. आईच्या भावाविरोधी आमचा भाव असेल तर पहिल्यांदा आपला भाव तपासून बघा. तुमचा भाव करेक्ट करा. तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं करायचं असेल त्यासाठी जगदंबा आणि त्रिविक्रम बसलेले आहेत. ते तुमच्या शरीरात, मेंदूत घुसून काम करायला तयार आहेत. पण आम्हाला कळलं पाहिजे की, ‘ती सुवर्ण आणि रौप्य ह्यात फरक करत नाही’. तिचा पुत्र त्रिविक्रम तुमच्यासाठी वाटेल त्या पातळीवर जाण्यासाठी तयार असतो, तुम्ही चिखलात असाल तर तो चिखलातही येतो तुमच्यासाठी, तुम्हाला चिखलात आणखी बुडवायला नाही तर चिखलातून बाहेर काढायला.
॥ हरि ॐ ॥