॥ हरि ॐ ॥
जीवनाचं सोनं करण्याची संधी म्हणजे हा गुरुक्षेत्रम् मंत्र. ‘त्रिविक्रमा’ च्या नेतृत्वाखाली सगळी तीर्थयात्रा घडते. उत्तम, मध्यम, बरोबर विगतही आहे. विगत ह्याने अनेक पापं केलीत तरी त्याला तो टाकत नाही. त्याला अर्ध्यावरून यात्रेत घेतो. तरीही त्याला पूर्ण यात्रेचे फळ मिळते.
हा ‘त्रिविक्रम’ एकाच वेळी तीन पावलं चालतो. त्रिविक्रमाची गणित सोडवण्याची पद्धती एकच आहे. त्रिविक्रम कधी बेरीज, वजाबाकी, भागाकार करत नाही तो फक्त गुणाकाराच करतो. १,२,३,४,५,६,७,८,९,................. ही अद्भुतता आहे या एक आकड्याची. तो एकटाच विविध रूपं तयार करतो, तो कुठलीही व्हायब्रेशन्स, कुठलही रूप तयार करू शकतो.
उपनिषदामध्ये आपण कथा वाचतो वृत्रासुर आणि त्याची आई वाईट चित्र बनवतात. त्यात रेशमी वस्त्राची कथा सांगणारा तो त्रिविक्रम. तो एकाच रंगाने विविध चित्र तयार करतो. तुमची चुकीची, खराब झालेली चित्रं असतील, चित्राचा कागद फाटलेला असला तरी, तुमच्याकडे काहीही नसेल तरी, तुमच्या प्रारब्धात कोणतंही पुण्य नसेल तरीही तो तुमच्यासाठी चांगलं चित्र काढतो म्हणजेच तुम्हाला सहाय्य करतो, तुम्हाला चित्र काढण्यासाठी उत्साह देतो, चित्रात रंग भरतो.
ऋग्वेदात अनेक नावांनी ह्याचे वर्णन आहे. ह्याच्या नामाशिवाय यज्ञ संपन्नच होऊ शकत नाही. आपण गेल्यावेळेला बघितले जेव्हा पृथ्वी उत्पन्न झाली तेव्हा जे जल उत्पन्न झाले, तेव्हापासून आतापर्यंत ते जल एकच आहे. तुकाराम, रामदासस्वामी, वेद्व्यास, नरहरी सोनार, ज्ञानेश्वर आणि चार भावंडं, चोखामेळा, जनाबाई, सखूबाई, ह्या संतांनी जे पाणी प्राशन केलं तेच पाणी आज आपण बघतो आहोत. याच गंगेत श्रीरामांनी आंघोळ केली, श्रीकृष्णाने स्नान केलं, मेघा महाशिवरात्रीला बाबांना आंघोळ घालतो ते हेच पाणी. हे पाणी एक आहे आणि ते तेच आहे. तेच पाणी बाष्पीभवन होऊन वर गेलं आणि पुन्हा गंगेत येऊन मिळालं. कोट्यावधी वर्षे हे पाणी बदलेले नाही. पाणी तेच आहे म्हणून ह्या पाण्यात प्रचंड पवित्र ऊर्जाशक्ती असलीच पाहीजे. पाण्याला जीवन म्हणतात. आमचं जीवन सर्वार्थाने बदलणारी ऊर्जा पाण्यात असते. आपण पाणी पितो, आंघोळ करतो पण पाण्यातली उर्जा आपण स्वीकारतो का?
पूजा झाली की आपण तीर्थ घेतो. त्यात भाव असतो का? तीर्थ घेताना कोणाची तरी (देवाची, सद्गुरूंची) आठवण काढा. किती जणांनी गेल्या आठवड्यात एकदा तरी आचमन घेतलं आहे? जेव्हा आपण आचमन घेतो तेव्हा टाळू, घसा तोंडातली प्रत्येक पेशीन-पेशी ओली होते. ही आर्द्रता मेंदूला जाऊन पोहचते. मेंदू फ्रेश होतो. आचमन घ्या त्या पाण्याचा आदर करा. आचमन केल्याने पाण्याची power आपल्याला मिळते.
तो सगळ्यांसाठी एकच असला तरी तो प्रत्येकासाठी वेगळा आहे म्हणून तो एकच नवर्याचाही बाप आहे आणि बायकोचाही बाप आहे. नवर्याचा आणि बायकोचा बाप एक असला तरी ती दोघे भावंडे होत नाही कारण प्रत्येकाचा त्रिविक्रम प्रत्येकासाठी वेगळा आहे. इतका तो वेगळा आहे म्हणून तो एकच आहे. तो प्रत्येकासाठी स्वतंत्र आहे. तो एकच सगळ्या ठिकाणी राहू शकतो. आपल्याला जे वसिष्ठ, आदिशंकराचार्य, वेदांनीं सांगितलेलं आहे ते मान्य करा. आपण तांदूळ, गहू खातो तेव्हा त्याच्या गुणधर्मांचा अभ्यास करतो का? आईवडिलांनी खायला सांगितलं की, आपण अन्न खातोच ना. वेदांनीं सांगितलं आहे त्याअर्थी ते सुंदर आहे.
प्रत्येक अवताराच्या अंगावरूनही तेच पाणी वाहिलं आहे. हे जल एकच आहे ते बदलत नाही. ह्याच पाण्याने अनेकवेळा प्राणप्रतिष्ठा झाली आहे, ह्याच पाण्याने अब्जावधी जप झालेत, त्याची ताकद ह्या जलामध्ये आहे. ही ऊर्जा ह्या मंत्रातून प्रत्येक बाळाला मिळावी, श्रद्धावानाला मिळावी अशी आदिमातेची इच्छा आहे, कोणीही श्रद्धावान ह्यापासून वंचित राहू नये.
जरी तुम्ही २-३ बाटल्या आणल्यात तरी एकच बाटली चार्ज होणार आहे हे लक्षात ठेवा. आज अनेकांना येता आले नाही त्यांचे काय? ह्या अभिमंत्रित जलापासून कोणीही वंचित राहणार नाही. आपण प्रथम ह्याचे नियम जाणून घेऊ या. नियम म्हणजे त्रिविक्रमाचे प्रेम आणि आदिमातेची कृपा, प्रेम व क्षमा.
हे अभिमंत्रित त्रिविक्रम जल स्नान करण्यासाठी आहे. स्नान करताना दोन थेंब पाण्यात (बादलीत) टाकायचेत की मग सगळ पाणी चार्ज होणार. जे कोणी शॉवरने आंघोळ घेत असतील त्यांनी, स्टील/पितळ/सोनं/चांदी ह्यापैकी कुठल्याही धातूच्या तांब्या घ्यायचा त्याच्यात पाणी घेऊन दोन थेंब ह्या जलाचे टाकायचेत मग केस, चेहरा, कंठकूप (विशुद्धचक्र), कपाळावर मध्यभागी (आज्ञाचक्र), मस्तक ह्या भागांना ते पाणी लावायचं. काही करणास्तव पाणी कमी असल्यास कंठकूप/गळघंटी (विशुद्धचक्र), आज्ञाचक्र, मस्तकाला लावायचं आहे. हे पाणी मंगळवारपासून वापरायला सुरुवात करायची आहे. जेव्हा हे जल वापरणार त्यादिवशी त्या बाटलीतले सगळे पाणी संपवायचे, दुसर्या दिवशीसाठी पुन्हा त्यात पिण्याचे पाणी बाटलीत (३०ml ची बाटली) भरायचे. बादलीत दोनपेक्षा जास्त थेंबही टाकू शकता. तुम्हाला इतर कोणाला हे जल द्यायचे असेल तर, त्यांच्या बादलीत दोन थेंब टाका आणि बाटली परत घेऊन या. कारण ती बाटली अभिमंत्रित गुहा तयार होणार आहे. ही गुहा रोज भरायची, रोज संपवायची. ही बाटली फक्त एका वर्षापर्यंतच चार्ज राहील. एक वर्षानंतर गुरुक्षेत्रम्मध्ये बाटली चार्ज करून घेण्यासाठी आणायची. गुरुक्षेत्रम्मध्ये येऊन एकदा गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणायचा मग अकरा वेळा ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रंम् । ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥’ हा मंत्र म्हणायचा पुन्हा एकदा गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणायचा. जे इथे नाहीत त्यांच्यासाठी मी इथे एक बाटली चार्ज करून ती गुरुक्षेत्रम्मध्ये ठेवणार आहे. समजा तुम्ही चार्ज केलेली बाटली चुकून फुटली तर, नवीन बाटली घ्यायची एकदा गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणायचा की ती बाटली आपोआप चार्ज होईल. जल विकायचा प्रयत्न केला तर त्याची power जाणार. पाण्यात कसलाही व्यवहार चालणार नाही. त्रिविक्रमने तुम्हाला जल विकलेलं नाहीए. जल विकलंत तर, जल विकणारा आणि विकत घेणारा दोघांसाठी ही ह्या पवित्र जलाचा उपयोग ह्या जन्मासाठी संपलेला असेल. ज्यांची इच्छा नाही त्यांना हे जल देऊ नका. ज्यांचा भाव आहे त्यांनाच द्या.
समजा एक वर्षानंतर गुरुक्षेत्रम्ला यायला नाही मिळाले तर, एक महिना उशीर झाला तर ११ ऐवजी २२ वेळा ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम् । ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥’ मंत्र म्हणायचा.
कुठलीही गोष्ट ह्या बाटलीला बाधित करू शकणार नाही. स्त्रियांना मासिक पाळी असतानाही ह्या जलाने आंघोळ केली तरी चालेल. सुतक आहे, सोयर आहे काहीही problem नाही. समजा उंदीर मुतला बाटलीवर. शांतपणे बाटली धुवायची सद्गुरूंचं नाव घ्यायचं पाणी पुन्हा आभिमंत्रित होणार. त्याच्यासाठी सगळी बाळचं आहेत. चुकून कितीही मोठी चूक केली तर सांभाळायला मी समर्थ आहे तो बाप आहे, सख्खा बाप आहे.
ह्या पाण्याने स्नान करणंच महत्वाचं आहे. पिण्याने जास्त फायदा होणार नाही. मंत्र म्हणताना चुकलात तरी तुमच्या सगळ्या उच्चाराच्या चुका मी एकदा डोळे मिटून उघडलेत की पुसून जातात.
आता आपण मंत्राचा अर्थ बघूया.
इंद्र इथे त्रिविक्रमाला उद्देशून म्हटलेलं आहे. शरीरातील दिसणारी व न दिसणारी इंद्रियं. इंद्रशक्ती म्हणजे बी चा कोंब जो जमिनीतून बाहेर येतो. कोंब जमिनीतून आत जात नाही, पण जमीन भेदून बाहेर येतो. त्या नाजूक कोंबाची जमीन फोडून बाहेर येण्याची शक्ती म्हणजे इन्द्रशक्ती. मानव हा कोंबाप्रमाणे असतो. मानवाची संकटं म्हणजे कडक भूमी. संकटाच्या जमिनीवर भक्तीने तो कोंब जमीन फोडून बाहेर येतो.
१) मोड जन्माला घातला, २) जमिन फोडून बाहेर काढला, ३) तरीही कोंबाला काहीही झालं नाही एकाच वेळी ही तीन पावलं तो एकमेव चालतो. ही इन्द्रशक्ती.
मनाची आणि देहाची इंद्रियं, प्राण, प्रारब्ध, गोत्र ह्या सगळ्यांना ह्या जलाने स्पर्श होतो. ह्या जलाने आंघोळ केली तर ऑरावर प्रभाव होतो. ऑरा मन, बुद्धी, प्रारब्धावर कार्य करतो. पाणी प्यायल्यामुळे थोडाफार परिणाम होईल पण प्राणाची साथ नसल्यामुळे विशेष उपयोग होणार नाही.
त्रातारं म्हणजे रक्षणकर्ता. टॉयफाईड झालेला आहे हे ओळखून औषध देणारा डॉक्टर. संकट आल्यानंतर संकटातून सोडवणारा, treatment करणारा.
अवितारं म्हणजे संरक्षक इंद्र. आजार येण्याआधीच vaccine देऊन prevention करणारा डॉक्टर. संकट येण्याआधीचं बाहेर पडण्याची तजवीज करणारा.
हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम् - शूर म्हणजे जो कोणालाही घाबरत नाही. लढाईची वेळ आल्यास जो जराही न डगमगता सगळ्यांच्या पुढे जातो तो शूर. तुमच्यावर जेव्हा संकट येतं. तेव्हा त्या व्यक्तीची inner शक्ती असा विचार उत्पन्न करेल की तो या ना त्या मार्गाने पुढे जाऊ शकेल. त्या संकटात अडकून बसणार नाही. त्याला कोणाचे पाय धरावे लागणार नाहीत, कोणाला लोटांगण घालावे लागणार नाही.
ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र:
शक्र म्हणजे ज्याच्या शक्तीची तुलना इतर कोणाशीही होऊ शकत नाही. त्याला जेवढी शक्ती आदिमाता पुरवते तेवढी ती कोणालाही पुरवत नाही. म्हणून त्याच्या एवढी ताकद कोणातही नसते.
मघवा म्हणजे सर्व प्रकारची ऐश्वर्ये असणारा (अष्टबीजं). ही ऐश्वर्ये अक्षय्य आहेत. ज्याची ऐश्वर्ये कधीही संपत नाहीत असा.
पुरुहूतं म्हणजे ज्याला आतापर्यंत maximum लोकांनी आवाहन केलं आहे तो. maximum लोकांनी केलेल्या आवाहनाला हा त्रिविक्रम maximum वेळा धावत येतो. ह्याला हाक मारावीच लागत नाही. हाक मारण्याआधीच स्वत:हून धावून येतो. तो उभाच असतो त्याला कुठूनही धावत यावं लागत नाही.
असे सगळे गुणधर्म असणारा हा त्रिविक्रम आमचं सदैव कल्याण करण्यासाठी तत्पर असतो. एकाच वेळी तीन पावलं फक्त त्रिविक्रमच टाकू शकतो. भौतिक, प्राणमय, मनोमय देहात पावलं एकाच वेळी पावलं टाकण्याचं काम एकच त्रिविक्रम करू शकतो.
जो treatment, prevention करणारा आहे तो एवढा शूर आहे की त्याच्या केवळ असण्यामुळेच मी शूर होतो. अशा ह्या त्रिविक्रमाला मी आवाहन करतो की, “तू माझ्यामध्ये ये. माझ्या त्रिविध देहात तू प्रवेश कर. एकाच वेळी तुझी सगळी स्पंदनं येऊ देत.” ह्याच्या शक्तीची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. एवढी शक्ती असलेला हा माझ्या त्रिविध देहामध्ये, त्रिविध काळांमध्ये धावून येणार आहे. हा भूतकाळात घुसतो म्हणून तुमच्या भविष्यात होणारे परिणाम थांबतात. एकाच वेळी भूतकाळात, भविष्यकाळात आणि वर्तमानकाळात तिन्ही ठिकाणी लढतो तेव्हाच तुमची वाईट प्रारब्धातून, संकटातून सुटका होते.
धातू म्हणजे हे तू येऊन सगळं करणारच आहेस. मी आवाहन केल्यावर तू येणारच, तू माझं कल्याण करणारच असा माझा विश्वास आहे. तुमचा त्याच्यावर विश्वास नसला तरी, त्याचा तुमच्यावर विश्वास आहे. तुमचा जेवढा विश्वास त्याच्यावर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तो तुमच्यावर विश्वास ठेवतो म्हणून पुन्हा-पुन्हा जन्माला घालतो. लाखो जन्म चुकलो तरी तो पुन्हा-पुन्हा जन्माला घालतो की आज नाही तर उद्या हा सुधारेल. म्हणून त्याच्याशी कधीही खोटं बोलू नका, खोटं वागू नका. ही गोष्ट कायम सांभाळा कारण मग तो काहीही करू शकत नाही. त्यावेळेस जी मदत येते ती मदत आदिमाता थांबवते. तो आमच्यावर किती विश्वास टाकतो हे त्याच्या आईला माहीत असतं.
तुम्ही म्हणाल वाईट वागण्यार्यांचं कसं चांगलं होतं, तर त्यांच्या मागच्या दोन जन्मांचं पुण्य, ती ताकद असते. त्या व्यक्तीजवळ जोपर्यंत पुण्याची ताकद असते तोपर्यंत त्याची आई व तो काहीही करत नाही कारण ते त्यांच्या ताकदीविरुद्ध लढत नाहीत. श्रीकृष्णाने शिशुपालाच्या आईला वचन दिले, शंभर अपराध होईपर्यंत मी काहीही करणार नाही. शिशुपालाने ९४ नंतर ९९ पर्यंतचे आकडे स्वत:च मोजलेत शंभर म्हटल्यावर सुदर्शन चक्र सुटलं. पाप्यांना शेवटचे आकडे स्वत:च मोजावे लागतात. पण जेव्हा हजारो पापं करणार्या पाप्यातल्या पापी वाल्याकोळ्यानेदेखील प्रेमाने त्याचं नावं घेतलं म्हणून तो वाल्मिकी ऋषी झाला.
ह्या मंत्रात जे दिलयं ते सगळं जल करणार. बेसिकली आमची १) रोगप्रतिबंधक शक्ती वाढवणार, २) मन:शक्ती वाढवणार ३) जीवन उत्सहाने जगण्यासाठी प्राण आवश्यक आहे. प्राणाला कार्य करण्याची प्रेरणा देणार. प्राणाला, मनाला रोगप्रतिबंधक शक्ती पुरवणार आहे.
आंघोळ करताना ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम् । ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥’ ह्या मंत्राबरोबर ‘ॐ ग्लौं सद्गुरुनाथाय नम:’ म्हटलं तर अधिक चांगलं.
हातून कधी चूक घडली तर, शांतपणे पाण्यात दोन थेंब हे जल घाला, आणि सद्गुरुचं नाव घेत आंघोळ करा, तिथल्या तिथे सगळं नाहीस होईल. म्हणून निश्चिंत रहा, त्रिविक्रम जल, उदी, हळद आमच्याकडे आहे मग आम्हाला कोणाचीही भीती नाही.
हे जल नीट जतन केले तर पिढ्यान्पिढ्या तुम्ही हे जल पुढे देणार आहात.
माझ्या सध्याच्या उपासनेची प्रथम निष्पत्ती हे जल आहे. आज अभिमंत्रित केलेली ही बाटली अडीच हजार वर्षे गुरुक्षेत्रम्मध्ये असणार आहे.
॥ हरि ॐ॥