॥ हरि ॐ ॥
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंबद्दल सांगायचं झालं तर सुरुवात कुठून करावी तेच सुचत नाही. जसं आपल्या आईचं आपल्यावर किती प्रेम आहे हे शब्दांत सांगणं कठीण आहे, अगदी तसंच बापूंबद्दल काय लिहावं हे समजत नाही. कुठल्याही स्वार्थाशिवाय माझ्या बापूंनी माझ्यासारख्या असंख्य सामान्य जीवांवर त्यांच्या अकारण कारुण्याची छाया धरली व आपलंसं करून घेतलं. मी बापूपरिवारातील आहे, मी एक बापूभक्त आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो.
मी 2003 पासून सद्गुरु बापूंच्या उपासनेला येते. या 9 वर्षांत मला असंख्य अनुभव आलेत. खरंच, हा बापू माझ्याबरोबर प्रत्येक क्षणाला असतोच असतो. फक्त त्याला प्रेमाने हाक मारायचा अवकाश तो आपल्या सोबत आहे याची ग्वाही आपल्याला रोजच मिळत राहते. मला आलेल्या असंख्य अनुभवांपैकी 3 अनुभव मला सांगायचे आहेत.
2008 मध्ये माझा धाकटा मुलगा अक्षय हा भिका-तासगांव येथून बारावी (अॅग्रीकल्चर) झाला. आता डिग्रीसाठी कुठे जायचं हाच प्रश्न होता. त्यावेळी अॅडमिशनकरिता असणार्या सिलेक्शन प्रक्रियेतील राऊंडमध्ये त्याला खूप लांबचे गाव आले. अक्षयला त्या गावी जायचे नव्हते. त्यावेळी माझ्या मिस्टरांनी जवळच एखादं कॉलेज आहे का, ह्याची चौकशी केली असता कर्हाड जवळ 10 कि.मी वर राजमाची येथे मोकाशी कॉलेज आहे असे समजले. या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळते का ते पहावे यासाठी माझे मिस्टर आणि अक्षय दोघेही तिथे जाण्यासाठी निघाले. त्या दिवशी नेमके आमच्या घरी पादुकापूजन होते. ते झाल्यावर मी मनात बापूंना म्हटले की ‘बापू, आज काहीतरी चांगली बातमी द्याच. मुलाचे अॅडमिशन होऊ दे’ आणि असं म्हणून मी 108 वेळा ‘घोरकष्टोद्धरण स्तोत्र’ म्हणण्यास सुरुवात केली. मी अक्षयला सांगून ठेवले होते की तिथे काय होतंय ते मला फोनवर कळव.
बापूंनी माझी हाक नक्कीच ऐकली होती कारण माझं ‘घोरकष्टोद्धरण स्तोत्रपठण’ संपल्यावर लगेचच अक्षयचा फोन आला की ‘आई, मला अॅडमिशन मिळणार, तू काहीही काळजी करू नकोस!’
घरी आल्यावर अक्षयने जे सांगितले ते ऐकून मी उडालेच. त्या कॉलेजचे प्रिन्सिपल पी.टी. पाटील यांनी नुसती त्याची मार्कलिस्ट पाहूनच ‘अॅडमिशन मिळेल’ असे सांगितले. इतकंच नाही, तर ‘डोनेशन वगैरे काहीही घेणार नाही, नुसती फी भर. तसेच तुझे जेवढे मित्र असतील त्या सर्वांना इथे यायला सांग, मी त्यांनाही अॅडमिशन देतो’ असे सांगितले. अशा तर्हेने त्याला व त्याच्या दहा मित्रांना तिथे अॅडमिशन मिळून गेली. मुलाच्या जीवनातील बारावीच्या महत्त्वाच्या वर्षानंतर असणारं अॅडमिशनचं ओझं बापूंनी अशा रितीने झटक्यात उतरवलं होतं!
कधीकधी तर बापूंना साकडे घालूनही गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही, अशा वेळेस नक्की समजावे की ती गोष्ट आपल्यासाठी उचित नाही व आपल्याकरिता बापूंची अधिक चांगली कुठलीतरी योजना आहे. हे मनावर पक्कं ठसविणाराच अनुभव मला आला.
माझे मिस्टर इरिगेशनला आहेत. त्यांच्या ऑफिसमधील त्यांच्याबरोबरच्या सतरा सहकार्यांना 2008 मध्ये प्रमोशन मिळाले व त्यांची प्रमोशनवर कोयना डॅमला बदली झाली. परंतु त्यावेळी फक्त माझ्या मिस्टरांना प्रमोशन मिळाले नव्हते. त्यांना ह्याचा फार मानसिक त्रास झाला. मी व अक्षयने त्यांना खूप समजावले की ‘बापूंनीच तुमच्यासाठी ह्याहून चांगले काहीतरी योजले असणार हा विचार तुम्ही का करत नाही? तुम्ही एवढे निराश का होता? त्यांनी तुम्हाला काही त्रास होवू नये असंच काही ठरवलं असणार.’ आम्ही त्यांना असे समजावले खरे, पण ते एवढे नर्व्हस झालेले पाहून आम्हीही मनोमन दुःखी होत होतो.
पण हेच विचार बरोबर होते हे काही दिवसांतच समजले कारण थोड्याच दिवसांनी, प्रमोशन होऊन कोयना डॅमला बदली झालेल्या त्यांच्या त्या सहकार्यांचे त्यांना एकामागून एक फोन यायला लागले की ‘बरं झालं तुला प्रमोशन मिळालं नाही ते! इथे आल्यावर आम्हाला फार त्रास होतोय. जेवणा-राहण्याचा खर्च, प्रवासाचा खर्च, घरच्यांचा वेगळा खर्च असे खर्च तर वाढले आहेतच, शिवाय तब्येतीचा त्रासही होतोय.’ हे ऐकून आमच्या मनात सद्गुरुंचाच विचार आला व ह्यांना का प्रमोशन मिळाले नाही, ह्याचंही उत्तर मिळालं.
पुढे उचित वेळ येताच मिस्टरांना प्रमोशनही मिळाले. त्यावेळी बदली होऊन मगच प्रमोशन होत असे. पण मिस्टरांना बरोबर 9 महिन्यांनी, आहेत त्या ऑफिसमध्येच प्रमोशन मिळाले. आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. ही तर बापूंचीच लीला! आपला बापू आपल्या भक्ताची काळजी घेत असतोच याची आपल्याला नेहमी प्रचीति येतेच.
शिवाय बापू आपल्या जीवनात असताना ‘कर्ता हर्ता गुरु एक’ हा विश्वास निरंतर ठेवणं आवश्यक आहे कारण तेच एक सत्य आहे. बापू आपल्या जीवनात असताना, आपल्या कार्यात येणार्या अडचणीदेखील आपल्याला उपकारकच ठरतात, ह्याचाही अनुभव आला.
माझा आत्मबलचा कोर्स झाला आहे (चौथे पुष्प). 2011 मध्ये तोपर्यंतच्या सर्व बॅचेसचा ‘आत्मबल महोत्सव’ होणार होता. त्यावेळी आमच्याकडून आम्ही चार जणी मुंबईला सिलेक्ट झालो. सुरुवातीला 2-3 वेळा मुंबईला जायचे होते व नंतर दर 3 दिवसांनी पुण्याला जायचे होते. आता पुन्हा ते आत्मबलचे दिवस अनुभवायला मिळणार, नंदाईचा सहवास मिळणार म्हणून मी खूप आनंदात होते.
पण अचानक माझा शुगरचा त्रास वाढला. डॉक्टरांना दाखविले असता, त्यांनी मला ‘जास्त दगदग व प्रवास करू नका’ असे सांगितले. मी मनातून चांगलीच खट्टू झाले कारण आता आत्मबल महोत्सवात सहभागी व्हायला मिळणार नव्हते. पण त्रासही भरपूर होत होता. त्यामुळे ‘बापूंची इच्छा’ असे म्हणून ‘मला जमणार नाही’ असे इतर तिघींना कळवले.
‘आत्मबल महोत्सव’ 5-6 नोव्हेंबरला होता. 4 नोव्हेंबर रोजी अचानक माझ्या मोठ्या मुलाचा - डॉ.अलंकारसिंह याचा फोन आला की ‘मी गाडी करून सातार्याला येत आहे. माझ्याबरोबर माझे 2-3 मित्र आहेत. ते लगेच निघणार आहेत. तू आमच्यासाठी जेवण करून ठेव.’ त्याप्रमाणे मी जेवण करून ठेवले. परंतु 9 वाजून गेले तरी त्याचा फोन आला नाही म्हणून मला काळजी वाटू लागली.
तितक्यात 9:30 वाजता माझ्या धाकट्या मुलाचा - अक्षयचा अचानक फोन आला की ‘भाईला (अलंकारला) जीवनज्योत हॉस्पिटलला अॅडमिट केले आहे. त्याच्या मित्रांना घेऊन मी घरी येतो. त्यांना जेवायला घालून मग आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ.’
हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हे मध्येच काय विघ्न उपटले, ह्या विचाराने घाबरून जाऊन मी बापूंचा धावा करू लागले.
अलंकारचे मित्र जेवून गेल्यावर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे गेल्यावर समजलं की अलंकारला डेंग्युची लागण झाली आहे. स्वत: डॉक्टर असल्याने, त्याला स्वतःमध्ये डेंग्युच्या लक्षणांची शंका आली म्हणून त्याने पुण्याहून येतानाच दोन टेस्ट केल्या होत्या व त्यांचे रिपोर्ट फॅक्सने येणार होते.
मी खूपच घाबरले व मला रडू येऊ लागले. पण बापूंवर माझा पूर्ण विश्वास होता. बापू सगळं काही ठीक करतील याची मला खात्री होती. डेंग्युचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्या हॉस्पिटलमध्ये त्याचे मित्र डॉ. साठे हेच ड्युटीवर होते. त्यांनी अॅडमिट झाल्यावर लगेचच ट्रिटमेंटला सुरवात केली. त्याचा प्लेटलेट सेल काऊंट 70000 पर्यंत खाली घसरल्याचे टेस्टमध्ये आढळून आले होते. तो अधिक खाली घसरला असता, तर मामला खूपच गंभीर होऊन बसला असता.
मी बापूंना हाका मारतच होते. ह्या कालावधीत मी बापूंचा जप, तसेच रामरक्षा, हनुमान चालिसा याचे पठण दवाखान्यात करतच होते. अखेर तोच त्राता होता!
बापूंनी नेहमीप्रमाणेच माझी कळवळून मारलेली हाक ऐकली होती. कारण परत दोन दिवसांनी टेस्ट केल्या असता प्लेटलेट काऊंट 1,30,000 झाल्या व तो प्रत्येक टेस्टगणिक वाढतच राहिला. आणखी चार दिवसांत त्याची तब्येत अजूनच सुधारली. ह्या आमच्या संकटाच्या काळात बापूंनीच नव्हे, तर मानवी पातळीवर बापूभक्तांनीही खूप आधार दिला. ह्या काळात बरेच बापूभक्त येऊन चौकशी करत होते. आमच्या सातार्याच्या अनिरुद्ध उपासना केंद्राचे प्रमुख सेवक प्रविणसिंह पवार यांनीही येऊन चौकशी केली. संस्थेची उदी मी मुलाच्या उशाजवळच ठेवली होती. 8-10 दिवसांत प्रकृतीत चांगली सुधारणा होऊन त्याला डिसचार्ज मिळालादेखील!
नंदाई-बापू-दादा आपल्या बाळांची किती काळजी घेतात! माझ्या मुलावर हे संकट येणार होते व त्यावेळेस त्याला माझी गरज भासणार होती, म्हणूनच बहुधा नेमक्या त्याच वेळेस माझ्या तब्येतीच्या शुगरच्या तक्रारी सुरू झाल्या व मला आत्मबल महोत्सवात भाग घेता आला नाही. पण हॉस्पिटलमध्ये असणार्या माझ्या मुलाजवळ नक्कीच राहता आले. खरंच, बापूंकडे आल्यानंतर आपल्या जीवनात जे काही होते ते चांगल्यासाठीच, हे आई-बापूंनी मला दाखवून दिले.
खरंच ह्या सद्गुरुरायाची कृपाछाया आम्हाला जन्मोजन्मी मिळो. हे बापूराया! आमच्याकडून भरपूर सेवाकार्य करून घे व मला प्रत्येक जन्मात वानरसैनिक करून घे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना!
॥ हरि ॐ ॥