॥ हरि ॐ ॥
17 डिसेंबर 2011ला माझ्या वडिलांचे निधन झाले. तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. त्या दिवशी सकाळी 11च्या सुमारास मी सहज माझ्या बहिणीला, संध्याला फोन केला. बहिण अकोल्याला असते. वडिल तिच्याजवळ रहात होते. मी फोन केला तेव्हा ती वडिलांना घेऊन दवाखान्यात आली होती. मी वडिलांना विचारले, ‘‘कशी आहे तब्येत?’’ तर ते म्हणाले, ‘‘मला काहीच झालेले नाही. थोडासा खोकला येतो. तर लगेच ही (माझी बहिण) दवाखान्यात घेऊन आली.’’ घरी गेल्यावर बहिणीने फोन करुन कळवले की वडिलांचा बी.पी. कमी झाला आहे.
मी ऑफिमावर होते. सहज घड्याळाकडे लक्ष गेले. 3.30 होऊन गेले होते. मनात विचार आला, वडिलांना परत फोन करुन विचारु, तब्येत कशी आहे? मी एरवी सारखा सारखा त्यांना फोन करत नाही. पण त्या दिवशी केला. फोन बहिणीने उचलला. ती म्हणाली, ‘‘आता त्यांची तब्येत चांगली आहे. आताच उठले आणि बाथरुमला गेलेत.’’...आणि फोनवर बोलत असतांनाच मला त्यांचा आवाज आला...‘संध्याऽऽ...’ ती मला म्हणाली, ‘‘मी फोन ठेवते.’’ तिने फोन सोफ्यावर ठेवला आणि फोन चालूच राहिला. तिने वडिलांना सोफ्यावर बसविले. काय होतय विचारले. उदी टाकून पाणी दिले. माझ्या भाचीचा ‘रामरक्षा’ म्हणण्याचा आवाज मला फोनवरून येत होता. मला काहीही कळत नव्हते. मी इकडून ‘हॅलो, हॅलो’ करत होती. मनात बापूंना म्हणते, ‘‘बापू काय करु? काहीच कळत नाहीये.’’...आणि एकदम ‘दादाऽ दादाऽ बाबाऽ बाबाऽ’ करुन रडण्याचा जोरात आवाज आला.
मी काय समजायचे ते समजले आणि फोन बंद केला. बापूंना नमस्कार केला आणि रडतच निघाले. दुपारचे 4.30 वाजले होते. मी घरी येऊन मिस्टरांना फोन करुन बोलावून घेतले. माझे मिस्टर आणि माझा भाचा (अनूप) गाडी बघण्यास गेले. कोणतीच गाडी, ट्रॅव्हलबस, एशियाड बस, काही काहीच मिळत नव्हते. सर्वांना फोन लावला, चौकशी चालूच होती. रात्रौ 8 वाजता फुरसुंगीहून एक प्रायव्हेट गाडी आली आणि आम्ही निघालो. मी आपली रामरक्षा म्हणत होते. एक एक आठवणी येत होत्या. सर्व चक्र डोक्यात चालू होती. डोके प्रचंड दुखत होते. भाऊ नसल्यामुळे अग्नीदान मीच देणार होते. वडिलांची पण इच्छा होती की मीच अग्नीदान द्यावे. 12 तासांचा प्रवास होता. कधी संपणार आणि कधी वडिलांचे शेवटचे दर्शन होणार ! बापूंना प्रार्थना केली की अग्नीदान देईपर्यंत माझी तब्येत चांगली राहू द्या.
रात्री 12वा. धाब्यावर चहा घेण्याकरिता गाडी थांबली. ड्रायव्हरने चहा नाश्ता केला. आम्ही पण थोडे खाल्ले, औषधं घेतली आणि गाडीत बसलो. मी अनूपला (भाच्याला) मागे बसण्यास सांगितले. तो दमला होता. त्याला झोप आली तर ड्रायव्हरला पण येईल म्हणून मी रामनामाची वही घेऊन पुढे बसले. तर त्या ड्रायव्हरने माझ्याकडे चमकून बघितले. मी पण मनातून घाबरले. माझी रामरक्षा चालूच होती. 5 वेळा रामरक्षा म्हणून झाली आणि मी ड्रायव्हरशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. ‘‘तू कुठला?’’ असे विचारले. तो कुर्ल्याला राहणारा होता. ‘‘मग तुला बापू माहित आहेत काय?’’ लगेच तो म्हणला, ‘‘मी 6वीत असल्यापासून बापूंकडे जातो.’’ हे ऐकून इतके बरे वाटले ! नंतर त्याने त्याला आलेले अनुभव सांगण्यास सुरुवात केली. हे सगळे ऐकत असतांना माझे डोके दुखायचे कधी थांबले कळलेच नाही.
बापू आपल्याकरता इतक्या लांब कसे धावून आले ह्या विचाराने मी सुखावले. नंतर वडिलांचे दर्शन घेऊन आम्ही सर्वच रामरक्षा म्हणत होतो. अकोल्याचे बापूभक्त पण तिथे आले होते. त्यामुळे रामरक्षा पठण खूप छान चालू होते. बापूंना हवे तसे बापूंनी सर्व काही व्यवस्थित करुन घेतले.
नंतर 10व्या दिवशी अस्थि विसर्जन आम्ही तापी नदीत करायचे ठरवले. वेळेवर निर्णय घेतला. त्यासाठी भुसावळला जावे लागणार होते. अकोला-भुसावळ तीन तास लागणार होते. 1.20 ची गाडी होती आणि घरातून निघायलाच 1.20 झाले. निघतांना अस्थिंवर पण उदी टाकावी अशी इच्छा होती. पटकन कागदात थोडीशी उदी घेतली. ओढणीलाच गाठ मारुन उदी ठेवली. अस्थिंच्या माठाला मी छान जाड फुलांचा हार गुंडाळला होता. तुळसपण होती. नदीवर पोहोचलो. माठातून अस्थि पाण्यात सोडल्या. माठाचे काय करावे कळत नव्हते. तो फोडाण्याची इच्छा नव्हती. म्हणून मी माठ पाण्यात तसाच सोडला. माठ थोडा तिरपा होऊन पूर्ण भरला आणि अर्ध्यावरच तसाच तरंगत होता. मी रामरक्षा पूर्ण होईपर्यंत माठाकडे बघत होते. तो खाली जात नव्हता. परत बापूंना म्हटले, ‘‘बापू, वडिलांची काय इच्छा राहिली असेल माहीत नाही. बापू, तुम्हीच बघा.’’ असे म्हणून नमस्कार केला. गाडीची वेळ होत होती म्हणून थांबणे शक्यच नव्हते.
15-20 पावले पुढे आले आणि आठवले की अस्थिंवर उदी टाकायची राहिली. तशीच पळत गेले. पुडीतून उदी काढली, ती स्वतःच्या कपाळाला लावली. बापूंना आठवले. बापूंचे आभार मानले आणि रामरक्षा म्हणत अस्थि दिसत होत्या त्या पाण्यावर उदी टाकली. तो माठ तरंगत काठापर्यंत आला होता. त्याला पण उदी लावली. उदी लावल्यावर हळूहळू माठ खाली गेला. वडिलांना बापूंच्या हस्ते उदी मिळाली होती. ते उदी खूप प्रेमाने लावत आणि शेवटपर्यंत उदी बरोबरच घेऊन गेले. अर्थात ती बापूंचीच इच्छा म्हणायची.
घरातून निघतांना मला सर्वांनी सांगितले होते की अस्थि विसर्जन केल्यावर मागे वळून बघू नकोस. मी तेव्हा विचारले, ‘‘काय होते?’’ तर म्हणाले, ‘‘विचित्र चमत्कार घडतात.’’ मी निघतांना म्हणाले, ‘‘बापू आमच्या बरोबर असतांना असे विचित्र चमत्कार होत नाहीत.’’
बापू, तुम्ही असेच प्रत्येकाच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत रहा हीच तुमच्या चरणी प्रार्थना !!!
॥ देवयान पंथी पार्थचा सारथी
तोच माझा साथी अखेरीचा ॥
॥ हरि ॐ ॥